शनीची पूजा करताना...

    दिनांक :24-Aug-2019
शनीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण पूजा करतो. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू असतो. तो आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करतो. िंहदू धर्मात तब्बल 33 कोटी देवीदेवता असल्याचं मानलं जातं. त्यापैकी एक म्हणजे शनीदेव. शनीच्या साडेसातीच्या काळात तसंच महादशेच्या काळात अनेक विघ्न येतात अशी भीती घातली जाते. त्यामुळे पीडा मागे लागू नये यासाठी शनीची आराधना केली जाते. शनीबाबत भक्तांच्या मनात एकप्रकारची दहशत असते. पण प्रत्यक्षात शनी ही न्यायप्रिय देवता आहे. धर्माने वागणार्‍याला शनी कधीच त्रास देत नाही, उलट त्याचा उद्धारच करतो. शनी प्रत्येकाच्या कर्मानुसार फळ देतो. शनीची पूजा करताना तेल अर्पण केलं जातं. राईच्या तेलाचा दिवा लावला जातो. शनीला तेल अर्पण करण्याबाबतचा संदर्भ काही पौराणिक कथांमध्ये आढळतो.
 

 
 
 
 
पहिली कथा अशी की, शनीदेवाला स्वत:च्या शक्तीचा प्रचंड गर्व झाला होता. त्यामुळे त्याने हनुमानाशी युद्ध करायचं ठरवलं. अर्थात हनुमानापुढे शनीचं काही चाललं नाही. या लढतीदरम्यान शनी मूर्च्छित झाला. त्यावेळी हनुमानाने त्याला तेल दिलं आणि शनी शुद्धीवर आला. त्यामुळे शनीला तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. तेलामुळे शनीची पीडा दूर झाली. शनिवारी शनीला तेल अर्पण केल्याने भक्तांच्या सगळ्या पीडा, संकटं दूर होतात या श्रद्धेचं मूळही याच कथेत आहे.
 
 
याबाबतची दुसरी कथा अशी की, अहंकाराने मातलेल्या रावणाने सर्व ग्रहांना बंदी बनवलं होतं. त्यात शनीदेवही होता. त्यावेळी हनुमान लंकेत दाखल झाला होता. रावणाने हनुमानाच्या शेपटीला आग लावली. त्यानंतर हनुमानाने रावणाची लंका जाळली. या दरम्यान शनीदेवांना लंकेतून पळून जात आलं नाही. आगीच्या तावडीत सापडल्याने शनीला प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्याचवेळी हनुमानाने शनीच्या अंगाला तेल लावलं. यामुळे शनीच्या अंगाचा दाह शमला. श्रद्धा आणि भक्तीभावाने मला तेल अर्पण करणार्‍या भक्ताची सगळी संकटं दूर होतील, असं शनीने त्यावेळी सांगितलं. म्हणून शनीला तेल अर्पण केलं जातं.