करोगे याद तो हर बात याद आयेगी...

    दिनांक :25-Aug-2019
रत्नाकर लि. पिळणकर
निधनाच्या बातम्या कानावर येतात, वाचल्या जातात, पाहिल्या जातात. त्यावर लगेच धक्कादायक प्रतिक्रिया किंवा अस्वस्थता निर्माण होतेच असं नाही. कारण मृत्यू अटळ आहे. तो आसपास रेंगाळतच असतो आणि त्याच्या इच्छेनुसार तो ‘अंत:स्थ’ व्यक्तीला आपल्या सोबत नेतो. ती व्यक्ती कोण? यावर आपण आपल्या भावना व्यक्त करतो. खय्यामसाहेबांचं निधन झाल्याची बातमी कुणीतरी फोन करून लगेच मला कळवायला हवी होती, कारण तेवढ्याच वेगाने ती प्रसिद्धी माध्यमावर पसरली होती. परंतु, ती मला कुणी आमच्या संगीतक्षेत्रातील मित्रांनी कळवली नाही. याची इतकी चर्चा करण्याचं कारण एवढंच, ‘खय्याम’ संगीतकार म्हणून आमच्या इतके जवळचे होते की नात्याला या, संगीत परिवाराशी जोडायला हवं. आम्ही अनेक मित्र, चाहते हिंदी सिनेसंगीताचे वेडे. खय्यामसाहेबांच्या अनेक जुन्या गाण्यांनी आम्हाला आमच्या जीवनाच्या प्रवासात साथ दिली आहे. या गाण्यांचे उपकार कधी फेडता येणार नाहीत. ही गाणी सजीव असतात, ती आपल्याशी बोलतात, संवाद साधतात, इतकंच नव्हे, तर जिवलग मित्राच्या नात्याने धीर देतात आणि नैराश्यातून आशेचा मार्ग दाखवितात. खय्यामसाहेबांचं एक गाणं नेमकं आपल्या संगीतविश्वातील ‘मार्गदर्शक’ म्हणावं असं गाणं आहे, जे आमच्या वयातील वळणावळणावर नेहमी सोबत असतं. ‘वह सुबह कभी तो आयेगी’ हे ते गाणं. ते कायम लक्षात असण्याचं कारण त्यातील ‘अर्थ’ आणि ‘फिर सुबह होगी’ चित्रपटातील राज कपूर-माला सिन्हाचं एकाच ‘अँगलने’ चित्रित केलेलं दृश्य. मुकेश व आशाजींनी गायिलेलं हे गाणं ‘अभ्यासून’ ऐकायला हवं. 

 
 
खय्यामसाहेबांच्या जीवनातील ‘सकाळ’ आता पुन्हा उगवणार नाही. ज्या गाण्याने त्यांच्या संगीत कारकीर्दीचा यशस्वी प्रारंभ करून दिला ते गाणं त्यांच्याही जीवनाचं ‘थीम सॉंग’ असणार. खय्यामसाहेबांना संगीताचं आणि सिनेमाचं वेड बालपणापासून. स्वातंत्र्यपूर्वकाळातील पाकिस्तानातील पंजाबमध्ये राहणार्‍या खय्यामचं खरं नाव महंमद झहूर ‘ख्ययाम’ हाश्मी. शाळेत असल्यापासूनच त्यांना हिंदी सिनेसंगीताची आवड. त्या वेडापायी त्यांनी अनेकदा घर सोडून पळ काढला, असं बर्‍याचदा घडलं. शालेय शिक्षणाला कंटाळून दिल्लीला ते पळाले. परंतु, त्यांना पुन्हा पाकिस्तानात आणलं गेलं. अखेर त्यांचं संगीतावर असणारं प्रेम पाहून पंजाबी संगीतकार ‘बाबा चिश्ती’ यांच्याकडे त्यांनी पंजाबी ढंगाच्या संगीताचं शिक्षण घेतलं. तिथे ते बाबा चिश्तींना संगीतात मदत करू लागले. एका गाण्याची जबाबदारी चिश्तींनी त्यांच्यावर टाकली असता खय्यामने त्या गाण्यात प्रचंड मेहनत घेतली. ते काम पाहून चिश्तींनी त्यांना स्वतःचे सहायक संगीतकार केले. तिथे खय्यामने काही महिने काम केलं व ते लुधियानाला आले. मधल्या काळात ते लष्कारात दाखल झाले. तिथे ते दुसर्‍या महायुद्धात भाग घेऊन नंतर तडक आले ते मुंबईत.
 
मुंबईत त्यांना वर्माजी नावाचा जोडीदार मिळाला. त्यामुळे दोघांनी मिळून शर्माजी-वर्माजी नावाने काम करायला सुरुवात केली. अशाप्रकारे 1948 साली शर्मा-वर्माचा एक चित्रपट आला. ज्याचं नाव होतं ‘हिर-रांझा.’ त्याच सुमारास त्यांच्या सहकार्‍यांनी हिंदुस्थान सोडून पाकिस्तानात घरोबा केला. पण, खय्यामने मात्र आपलं काम एकट्याने करायचं ठरवलं आणि ‘बीवी’ नावाच्या चित्रपटात कामं केलं संगीतकाराचं व त्यांना बर्‍यापैकी यश मिळालं. ते गाणं होतं- ‘अकेले में वो घबराते तो होंगे.’ रफीसाहेबांनी गायलेलं हे गाणं बर्‍यापैकी लोकप्रिय होत असतानाच ‘फिर सुबह होगी’ प्रदर्शित झाला आणि साहिर लुधियानवी यांच्या लेखणीतून अवतरलेलं एक गीत ‘वह सुबह कभी तो आयेगी’ने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. संगीतकार नावाने मोठा होतो, तेव्हा त्या यशाचे वाटेकरी असतात गीतकार आणि गायक. खय्यामसाहेबांच्या आजवरच्या यशाचं श्रेय त्यांच्या गीतकारांनाच द्यावं लागेल. कारण उत्तम साहित्यिक गुण असलेल्या कवींनाच ते आपल्यासोबत बैठकीत पाचारण करीत. त्यापैकी अग्रस्थानी होते साहिर.
 
‘जीत ही लेंगे बाजी हम तुम’-‘शोला और शबनम’मधील हे गीत ऐकताना चित्रपटाचं दृश्यच आपल्या नजरेसमोर येतं. त्या वेळी बर्‍याचशा अव-ङळल म्हणजेच प्रारंभी गाण्याचा मथळा चार ओळीत कोणत्याही तालवाद्याशिवाय म्हटला जाई आणि त्यानंतर मुखडा सुरू होत असे. अशी बरीच गाणी लोकप्रिय झालेली आढळतील. खय्यामसाहेब आणि इतर अनेक ‘समांतर’ संगीतकारांनी आपल्या गाण्यात ही पद्धत अवलंबिलेली असल्याचे दिसेल. सुरवातीच्या काळात, बड्या निर्मात्यांचे चित्रपट मिळेपर्यंत बर्‍याच संगीतकारांना जे मिळतील ते चित्रपट करावे लागतात आणि त्यातून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करावं लागतं. चित्रगुप्त, इक्बाल कुरेशी, एस. एन. त्रिपाठी, असे बरेच चित्रपट चाचपडत असताना उत्तरार्धात खय्यामसाहेबांना बर्‍याच मोठ्या निर्मात्यांचे आणि नामांकित कलाकार असलेले चित्रपट मिळत गेले. आपल्या साधारण 1953 ते 1990 या चाळीसेक वर्षांच्या कालावधीत खय्यामसाहेबांना 1970 सालच्या ‘आखरी खत’ने मोठी ओळख दिली.
 
‘बहारो मेरा जीवन भी सवारो’प्रमाणेच रफीसाहेबांचं ‘और कुछ देर ठहर’, ‘तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो’, ‘है कली कली के लब पर मेरे हुस्सका फसाना’... अशा अनेक उत्तमोत्तम गाण्यांचे चित्रपट ‘बी ग्रेड’ असल्याचे दिसून येते. मात्र, खय्याम साहेबांचं नशीब चमकलं ते त्यांच्या उतारवयात. ज्या काळात आरडी, एसडी, लक्ष्मी-प्यारे, ओपी, मदन मोहन अशा दिग्गज संगीतकारांच्या साथीने नदीम-श्रवण, रेहमान, अन्नू मलिक, आनंद-मिलिंद, जतीन-ललित अशा तरुण पिढीतील संगीतकारांचाही उदय होत होता. म्हणजेच शंकर-जयकिशनच्या सुवर्णयुगापासून ते थेट नव्या पिढीतील बहुतेक संगीतकारांशी त्यांची स्पर्धा असतानाही खय्यामसाहेबांची गाणी लोकप्रिय ठरली ती त्यांच्या ‘संगीत शैलीमुळे.’ खय्यामसाहेबांची वाद्यांची निवड आणि ऑर्केस्ट्रेशन हे खास ‘खय्यामी’ पद्धतीचं होतं, असंच म्हणायला हवं आणि पाश्चात्त्य वाद्यांचा ‘जोर’ असताना व हॉलीवूडच्या संगीताने आपल्या संगीतात घुसखोरी केली असतानाही खय्यामसाहेब आपल्या तत्त्वांशी ठाम राहिले. नौशादजी आणि खय्यामसाहेब यांची गाणी ‘ब्रँडेड’ नसतील, त्याचे मार्केिंटग करण्यासाठी त्यांनी त्यांचे प्रतिनिधीही ठेवले नसतील किंवा अवॉर्ड मिळविण्यासाठी ‘लॉबी’ही तयार केली नसली, तरीही त्यांच्या गाण्यातील ‘दर्जेदार’ शैलीने ‘खय्याम’ नावाला आदर निर्माण करून दिला.
 
1976 साली ‘कभी कभी’ प्रदर्शित झाला आणि खय्यामसाहेबांचं नशीब खर्‍या अर्थाने फळफळलं. त्यानंतर सर्वकाही चांगलंच घडत गेलं. ‘नूरी’, ‘त्रिशूल’, ‘थोडीसी बेवफाई’, ‘नाखुदा’, ‘दर्द’, ‘आहिस्ता-आहिस्ता’, ‘दिले नादान’, ‘बाजार’, ‘रझिया सुलतान’, ‘मेहंदी’, ‘लोरी’, ‘परबत के उस पार’... अशा बर्‍याच चित्रपटांनी त्यांना वयाच्या सत्तरीनंतरही स्वस्थ बसू दिलं नाही आणि ते कायम आपल्या संगीतविश्वात रमले ते रमले. त्यातच त्यांना पुरस्कारांनीही सन्मानित केलं गेलं. ‘कभी कभी’चा फिल्मफेअर पुरस्कार, ‘उमराव जान’लाही पुन्हा 1982 साली फिल्मफेअर पुरस्कार, ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार. 2010 साली फिल्मफेअरने त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केलं, तर 2011 साली त्यांना देशाने ‘पद्मभूषण’ देऊन त्यांच्या श्रेष्ठत्वावर शिक्कामोर्तब केलं.
 
खय्यामजींबद्दल चित्रपटजगतात प्रत्येक जण आदरानेच बोलताना दिसेल. एक सुंदर, संपन्न, सुसंस्कृत जीवन, सर्वच सहकारी, संगीतप्रेमी आणि नव्या पिढीनेही स्वीकारलेले त्यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सुरावटीवर आधारित असलेले ‘आधुनिक युगातील संगीत’ जे त्यांच्या ‘शतायुषी’ आयुष्याला ‘अर्थ’ प्राप्त करून देणारे ठरले. ‘कलावंतातील माणूस किंवा माणसातील कलावंत’ त्यांनी कायम जागवला आणि म्हणूनच त्यांच्या श्रीमंत संगीताने त्यांना मिळवून दिलेल्या संपत्तीचा एक ‘ट्रस्ट’ तयार केला आणि ती दहा कोटी रुपयांची संपत्ती त्यांनी चित्रपटसृष्टीतील गरीब-गरजू-उपेक्षित-दुर्लक्षित कलावंतांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी दान करण्यात यावी, अशी व्यवस्था केली आहे. असं कर्तृत्व जे चित्रपटसृष्टीतील झगमगटात कधीकधी झाकोळलं जाऊ शकतं, परंतु खय्यामसाहेब अखेरपर्यंत कार्यरत राहिले. त्यांच्या प्रत्येक कार्याचा, गोष्टीचा त्यांनी ‘सूर’ बेसूर होऊ दिला नाही. जगताना याचं भान प्रत्येक कलाकाराने राखायला हवं...
••