पुराच्या विळख्यातील महाराष्ट्र...

    दिनांक :25-Aug-2019
सुधीर पाठक
8888397727
 
यावेळी महाराष्ट्रात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, अतिपूर्वेकडील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात न भूतो पूरस्थिती निर्माण झाली. अतिशय कमी दिवसात विक्रमी पावसाचा अनुभव यावेळी सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनी घेतला; तर त्याच वेळी मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयास सुरू होते. विदर्भात पाऊस पडला नाही असे नाही, पण तृषार्त भूमी धडपणाने शांतवलेली नाही. अशी स्थिती महाराष्ट्रात कधीही आली नव्हती.
 
सामान्यत: महाराष्ट्रावर एखादे संकट येऊन आदळते त्या वेळी अख्खा महाराष्ट्र एकदिलाने उभा राहतो, हा यापूर्वीचा अनुभव आहे. पण, यावेळी मात्र तो मंत्र प्रथमच महाराष्ट्र विसरलेला दिसत आहे. दोन महिन्यांवर निवडणुका आल्या आहेत म्हणून की काय, एकदिलाने लढण्याचा मंत्र महाराष्ट्र विसरल्यागत झाला आहे. माध्यमे व वाहिन्यांनाही आपला टीआरपी वाढविण्याची चांगली संधी गावली आहे, असे वाटत आहे. त्यामुळे आम्हीच पहिले पोहोचलो, जिथे प्रशासनही नाही तिथे आम्ही आहोत, पहिले आहोत म्हणून रोज वृत्तमालिका दाखविल्या जात आहेत. ज्यांचे सर्वस्व गमावलेले आहे, समोर फक्त काळाकुट्ट भविष्यकाळच दिसत आहे त्यांना त्यांची मते, आपबिती विचारली जात होती. त्यातून त्यांना प्रश्नही असे विचारले जात होते की, ज्यामुळे उत्तरातून फक्त नकारात्मक भानच सर्वत्र पसरते.
 
हे संकट खरोखर विलक्षण होते. भयावह होते. संकटाचे रूप अतिशय रौद्र होते, अशा वेळी संकटग्रस्तांना दिलासा देणे, लढण्यासाठी पुन्हा उभे करणे या मूळ कर्तव्याचा विसर पडला आहे. राजकीय पक्षातही एकमेकांवर मात करण्याचा जीवघेणा प्रयास सुरू होता. या चिखलफेकीतून महाराष्ट्राला दिशा देणारे, असे प्रसंग समोर ठाकले असताना ज्यांचा वस्तुपाठ समोर आदर्श म्हणून ठेवला जातो ते जाणते राजेही स्वत:ला अलिप्त ठेवू शकले नाहीत. महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांच्याबाबत वेगवेगळी मते असू शकतात. पण, त्यांच्या कर्तृत्व व कर्तबगारीबाबत मात्र वादच नाही. मुंबईचे बॉम्बस्फोट असो की लातूरचा भूकंप असो. अतिशय तडफेने त्यांनी कारवाई केली. शुक्रवारला मुंबईत आणि थेट शेअर बाजारात बॉम्बस्फोट होतो व सोमवारी शेअर बाजार पूर्ववत्‌ सुरू होतो, हा चमत्कार फक्त पवारच करू शकतात. लातूर भूकंपाच्या वेळीही पहाटे त्यांनी मंत्रालयाचे कामकाज सुरू करायला लावले व स्वत:, जगाला ते वृत्त कळण्याआधी लातूरला पाहोचलेही होते. पण, या दोन्ही घटनांची तीव्रता मापण्याचे मापदंड ठरले होते. पुराचे तसे होत नाही. पूर आला. त्याची पातळी इतकी आहे, हे कळले तरी त्याची परिणामकारकता वा तडाखा यांचा अंदाज लावता येत नाही. 
 
 
सांगली, सोलापूर, कोल्हापूरला असेच झाले. पण, प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येताच भाजपाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेली महाजनादेश यात्रा स्थगित केली. हा निर्णय घेण्यात काही तासांचा विलंब कदाचित झालाही असेल. पण, म्हणून त्यावरून राजकारण करायचे काय? पवार स्वत: संयमित भाषेत बोलले, पण त्यांचे चेले, सहकारी यांची भाषा राजकारण करण्याचीच होती. त्यात अजून भर पडली होती ती हातकणंगले येथून पराभूत झालेले खासदार राजू शेट्टी यांची. मनसेबद्दल तर विचारायलाच नको. त्यांनी सरळ निवडणुकाच लांबणीवर टाकण्याची मागणी केली. यापूर्वी असा अनुभव महाराष्ट्राने कधीही घेतला नव्हता. पुण्याला पानशेत झाले तेव्हा सर्वांनी एकदिलाने काम केले होते. पानशेतएवढा मोठा प्रलय महाराष्ट्रात त्यानंतरही झालेला नाही. कै. यशवंतराव चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते. स. गो. बर्वे यांनी पुण्याला सावरले. त्या वेळी महाराष्ट्र विधानसभेत झालेले जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी यांचे भाषण अप्रतिम होते. तिळमात्र राजकीय अभिनिवेश न येऊ देता त्यांनी पुनर्वसन कार्यात संपूर्ण सहकार्य दिले होते. कोयना धरणाला भूकंपाचा धक्का बसला तेव्हा बाळासाहेब देसाई महिनाभर पाटणला ठाण मांडून बसले होते. अगदी विदर्भातील मोवाड पुराच्या वेळीही आज झाले तसे राजकारण झाले नव्हते. उलट, ही आपत्ती म्हणजे एक संधी मानून सर्वांनी पुण्याचे रूप बदलून टाकले. सर्व आपत्तीत महाराष्ट्र असाच वागला होता. फक्त ही वेळ त्याला अपवाद होती.
 
सांगलीला हा पहिल्यांदा आलेला जलप्रलय नाही. यापूर्वी 2005 साली अशीच कृष्णा कोपली होती. पण, यावेळी कृष्णेचे रूप जास्त रौद्र होते. 2005 साली पुराची जी धोक्याच्या पातळीवरील मर्यादा होती, तीही यावेळी कृष्णेने पार केली होती. कृष्णेचे खोरे महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश अशा तीन राज्यांत पसरले आहे. 2,58,984 चौ. किमी.चा हा परिसर आहे. महाराष्ट्रात सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत 15 हजारावर चौ. किमी. परिसरात कृष्णा खोरे आहे. या खोर्‍यातून 21,324 दलघमी पाणी मिळते. या जिल्ह्यात सरासरी पाऊस 600 ते 1900 मिमी. पडतो. कृष्णा नदी महाराष्ट्रात 304 किमी. इतकी वाहते, तर कोयना 155 किमी. प्रवास करून कराडजवळ कृष्णेला मिळते. तो परिसर प्रीतिसंगम म्हणून ओळखला जातो. कृष्णा खोर्‍यात जवळजवळ 41 धरणे आहेत, तरीही सांगली जिल्ह्यातील 922 चौ. किमी. एवढा भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो.
 
2005 साली 25 जुलै ते 8 ऑगस्ट या दरम्यान जोरदार पाऊस झाला होता. एकाच दिवसात नदीच्या खालच्या भागात 24 तासांत 250 मिमी., तर धरण पाणलोट क्षेत्रात 500 मिमी. पाऊस झाला होता. तो विक्रमही पावसाने यावेळी ओलांडला आहे.
 
यावेळच्या महापुरासाठी अलमट्टी धरणाला दोष दिला जातो. जर त्या धरणातून वेळीच विसर्ग जास्ती झाला असता तर सांगली, कोल्हापूरमधील जलप्रलय झाला नसता, असे बोलले जाते. पण, आपण या आरोपापूर्वी कर्नाटकातील पूरस्थितीही बघितली पाहिजे. अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 519.6 मीटर राखण्याचे ठरले आहे. त्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील सरकारी अधिकार्‍यांची एक समिती आहे. ही समितीच ठरविते की, अलमट्टीला पाण्याची पातळी किती ठेवायची. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही पातळी गाठली गेली नव्हती. तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे, कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांच्याशी बोलले व अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग 5 लाख क्युसेक पावेतो वाढविण्यात आला. कर्नाटकात पूरस्थिती गंभीर असताना व पूरबळींची संख्या जास्ती असतानाही अलमट्टीतील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे सांगली, कोल्हापूरचा पूर ओसरू लागला.
 
वास्तविक बघता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील काही गावे ही नेहमीच पुराच्या छायेत असतात. पावसाळ्यात तेथे नेहमीच पूर येतो व कधीकधी महापूर येतो. नृसिंहवाडी हे असेच गाव. यालाच नरसोबाची वाडी म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणीच कृष्णा व कोल्हापूर जिल्ह्यातून येणारी पंचगंगा या नद्यांचा संगम आहे. हे अत्यंत पवित्र स्थान आहे. पावसाळ्यात श्री दत्तांच्या पादुका कुठे हलवायच्या, याची मानके निश्चित आहेत. पूर अमुक पायरीवर आला की पादुका वर न्यायच्या, असे गणित आहे. पण, तरीही कृष्णेने पादुकांचे प्रक्षालन केले की, कृष्णेचा पूर ओसरतो, अशी मान्यता आहे. कुरुंदवाडजवळच्या कृष्णा काठच्या घाट कमानीवर आजवरच्या पुराच्या नोंदी कोरल्या आहेत. सर्वात उंचीवरची खूण ही 1914 सालची आहे. नंतर 2005. या वर्षी ही खूण 1914 लाही पार करून गेली आहे. नेहमी पूर येतो त्यामुळे पाणी वाढले की कुणी काय करायचे हे ठरले असते. शेतातला पंप हटविणे, गुरे सुरक्षित जागी हलविणे व दत्ताची उत्सवमूर्ती हलविणे, हे काम असते. अखेरीस वर्षीली ज्याची असते त्याच्याकडे मूर्ती जाते. ही कथा नृिंसहवाडीची. तशीच कथा खिद्रापूर, कुरुंदवाड, शिरटी, औरवाड, गौरवाड, हासूरची. त्यामुळे पूर आला म्हणून घर सोडणे, हा या भागात न पाळला जाण्यासाठीचा नियम. त्यामुळे काही जण तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर गेलेत आणि तिथेच अडकून पडलेत.
 
10 ऑगस्टला मदतसामग्री घेऊन येणारे पहिले हेलिकॉप्टर कुरुंदवाडात उतरले. दुसर्‍या दिवशी एनडीआरएफची चमू दाखल झाली. त्यानंतर या तीन हजार लोकसंख्येच्या कुरुंदवाडची पूरकथा जगाला समजली. हेलिकॉप्टरचा ओघ वाढला. रस्ता मार्गे गावांचा संपर्क बंद होता. त्यामुळे मदतीचे ट्रक पाठविणे हा भाग सुरू झाला. अशीच कथा वेगवेगळ्या गावांची आहे. सामान्यत: 25 वर्षांत पुराचे पाणी ज्या ठिकाणी पोहोचते, त्याला रेडझोन म्हणतात. पण, या सगळ्या गावांत रेडझोनमध्ये इमारती उभ्या झाल्या. पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्याचा मार्ग बंद झाला. हे कुठेही एका दिवसात झाले नाही. पण ही प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू होती. तिने तडाखा दिला. अलमट्टी धरणातून पाण्याचा कमी विसर्ग होणे यापेक्षाही अभूतपूर्व पाऊस व पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद होणे, हे महत्त्वाचे कारण होते.
 
सरकारी यंत्रणा कार्यरत होती. प्रशासन वेगवेगळे मार्ग काढत होते. पण, संकटच एवढे भीषण होते की, ते हात अपुरे पडत होते. जवळजवळ चार लाखांवर लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अनेक ठिकाणी अनुभव आला की, नेहमीच तर येतो म्हणून फुशारकी मारीत लोक घराबाहेर, वस्तीबाहेर पडले नाहीत. पण, नंतर मात्र पाणी बघून त्यांचा धीर सुटला व मिळेल त्या मार्गाने बाहेर पडण्याचे प्रयास सुरू झालेत. होडी घेऊन येणारे आलेत की झुंबड उडत असे. ते पहिल्यांदा स्त्रिया, मुले व वृद्ध यांना घेऊन जात. त्यामुळे मागे जे उरत ते अक्षरश: मृत्यूच्या छायेत जगत होते. ब्रह्मनाळला बोटीत जास्त लोक चढलेत आणि त्यातून ती बोट उलटली व 20 वर व्यक्तींना जलसमाधी मिळाली.
 
कोल्हापूर जिल्ह्यातील लहान लहान गावातील बँकांमधील रोख रकमा व लोकांनी गहाण ठेवलेले सोने अन्य बँकेत हलविणे, हा अनुभवही अनेक बँक शाखांनी घेतला. पाणी ओसरू लागल्यावर घरांची सफाई सुरू झाली. साफसफाई करणे, फेकून देण्यासारखे सामान बाहेर काढणे हेच काम सुरू होते. नळाला पाणी नव्हते. त्यामुळे पुराचे पाणी, डबके यातील पाणी घेऊन या परिसरात सफाई सुरू होती. जवळजवळ दहा-बारा दिवसांनंतर वीजपुरवठा सुरू झाला. त्यामुळे मोबाईल चार्जिंग झाले व जनतेचा आपल्या नातेवाईकांशी, सुहृदांशी संपर्क सुरू झाला. पुन्हा संसार थाटण्याचे आव्हान या भागाला पेलायचे आहे.
 
गावोगावात झालेले नुकसान खूप मोठे आहे. गुरेढोरे, सालबेगमीला घेतलेले तांदूळ, गहू, ज्वारी पाण्यात भिजले होते. गुरांना दाव्याला बांधलेल्या अवस्थेतच मृत्यू आला. हे सर्व नुकसान भरून येणे कठीण आहे. पण तेही भरून येईल. मात्र, सांगली नगर वाचनालयातील दुर्मिळ पुस्तके, त्यांचा अक्षरश: लगदा झाला आहे. ती ग्रंथसंपदा आता कशी परत येणार, हा खरा प्रश्न आहे. या निमित्ताने शंभरी पूर्ण झालेल्या ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथ ‘डिजिटल’ करून ठेवणे हे मोठे आव्हान आहे. राज्य सरकारने त्यासाठी योजना तयार केली पाहिजे.
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय तडफेने पावले उचललीत. केंद्राची मदत मिळवून घेतली. कर्नाटकमधून जलविसर्ग वाढवून घेतला. त्यांना चंद्रकांतदादा पाटील, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांनी चांगली साथ दिली. गिरीश महाजनांनी बोटीतून हात दाखवणे, सेल्फी काढणे हे माध्यमांनी गाजवले. मात्र, त्यांनी ज्या जिद्दीने, मेहनतीने काम केले, त्याला तोड नाही. नुकतेच काही निर्णय घेतले ते असे-
  • ज्या शेतकर्‍यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे, त्यांना एक हेक्टर मर्यादेपावेतो पीक कर्ज बँकांनी दिले ते माफ केले आहे.
  • ज्यांनी कर्ज घेतले नाही, त्यांना शासकीय मदतीसाठी जी नुकसान भरपाई दिली जाते, त्याच्या तीन पट नुकसान भरपाईचा निर्णय.
  • शेती पंपाच्या वीज बिलवसुलीला तीन महिने स्थगिती.
  • ज्यांची घरे पडली वा क्षतिग्रस्त झाली, त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून नवीन घरे दिली जाणार. केंद्राकडून मिळणार्‍या मदतीव्यतिरिक्त एक लाख राज्य सरकार देणार.
  • नवीन निवारे बांधून होत नाही, तर पर्यायी निवार्‍यासाठी ग्रामीण भागात 24 हजार, तर शहरी भागात 36 हजार रु. देणार.
  • पुरामुळे बाधितांना तीन महिने मोफत धान्यपुरवठा.
  • पूरस्थिती का उद्भवली व त्यावर उपाययोजना यासाठी तज्ज्ञ समिती गठित.
  • छोटे व्यापारी यांना नुकसानीच्या 75 टक्के वा 50,000 रु. महत्तम मदत.
  • गहाळ कागदपत्रे मोफत नव्याने तयार करून देणार.
सरकारशिवाय अनेक सार्वजनिक संस्था पुनर्वसन कार्यात लागल्या आहेत. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक त्यात आघाडीवर आहेत. संकट फार मोठे आहे. त्यावर मात करण्यासाठी खूप जिगर लागणार आहे. सरकारी यंत्रणा तर कार्यरत करावीच लागेल. पण, मला महत्त्वाची वाटते ती बाब वेगळीच आहे. मला आलेल्या व्हॉटस्‌अॅप संदेशात ती फार चांगल्या पद्धतीने मांडली आहे.
 
आज दुपारी मी, कुंभारगल्लीत राहणारा माझा मित्र अमोलकडे गेलो होतो. पंचगंगेच्या महापुराचे पाणी त्याच्याही घरी आले होते. त्याची भेट घेण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो होतो. प्रत्येक वर्षीप्रमाणे त्याने याही वर्षी गणपतीच्या मूर्ती बनविल्या होत्या. जागेअभावी तो 200 घरगुती छोट्या मूर्ती बनवतो. अंतिम टप्प्यात आलेल्या, अर्धे रंगकाम झालेल्या मूर्ती- या सर्व मूर्ती पुरामुळे पूर्णपणे खराब झाल्या होत्या. त्याने त्याला शक्य तेवढी गुंतवणूक या मूर्तीत केली होती, पण ती महापुराने व्यर्थ ठरविली.
 
मी तिथे गेलो तेव्हा त्याच्या घरात त्या सर्व खराब झालेल्या मूर्ती या तुटक्या, मोडक्या, फक्त पीओपीरूपी मूर्तीचा ढीग असावा तसा ढीग होता. आमचं दोघांचं बोलणं सुरू होतं तेवढ्यात एक माणूस दारात मोटारसायकल लावून, बूट काढून घरात आला. चांगला शर्ट इन केलेला, 30-35 वयाचा. चांगल्या कोणत्यातरी ऑफिसमध्ये असावा. अमोलला ‘‘नमस्कार भाऊ’’ म्हणाला. अमोल थोडा वेळ चाचपडला. कारण हा कोणी त्याला त्याच्या ओळखीचा वाटत नव्हता. वाटलं पूर येऊन गेला म्हणून अनेक जण भेटून जातात. बघायला येतात तसा हा पण आला असेल. आता तो माणूस अमोलशी बोलू लागला. मी तिथेच उभा राहून ऐकत होतो.
 
तो माणूस अमोलला म्हणाला- ‘‘भाऊ, प्रत्येक वर्षी श्रींची मूर्ती मी आपल्याकडून घेऊन जातो आणि दहा-बारा दिवस आधी येऊन मूर्ती ठरवून जातो म्हणून आज आता आलो होतो.’’ असे बोलल्यावर अमोल त्याला म्हणाला, ‘‘या वर्षी माझ्याकडे मूर्ती नाही हो मिळणार दादा. सगळ्या मूर्ती पुराच्या पाण्याने खराब झाल्यात. मातीच झाली आहे त्यांची.’’ मग तो माणूस अमोलला म्हणाला, ‘‘मला यावेळी नेहमीसारखी रंगीत गणपतीची मूर्ती नको आहे. फक्त चिखलाची गणोबाची छोटी मूर्ती हवी आहे.’’ बोलता बोलता त्याने दोन हजाराची नोट काढून अमोलच्या हातात ठेवली व म्हणाला, ‘‘हा घ्या ऍडव्हान्स.’’ अमोल म्हणाला, ‘‘चिखलाचा गणोबा दहा रुपयाला आहे. मग हे दोन हजार कशाला? कशापायी?’’ अमोलचे बोलणे मध्ये तोडत तो माणूस म्हणाला, ‘‘भाऊ, तुमचे हात मूर्ती नाही तर आमचे देव बनवतात. हे देव बनविणार्‍या हाताला बळकटी येण्यासाठी!’’ एवढंच बोलून तो माणूस निघून गेला. अमोलचा ऊर भरून आला होता. त्याच्या नकळत त्याच्या डोळ्यांतून अश्रूचा थेंब गालावरून ओघळून टपकन मातीमोल झालेल्या मूर्तींच्या पाण्यात पडला.
 
आज असे हात हाच आधार आहे. असे हजारो, लाखो हात महाराष्ट्रातून पुढे आले आहेत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी. हीच बाब लाख लाख मोलाची आहे.