चार बिबट्यांचा जनावरांच्या गोठ्यावर हल्ला

    दिनांक :25-Aug-2019
एका गाईची शिकार, एक जखमी
 
अमरावती, 
येथील वडाळी-पोहरा जंगलात बिबट्यांची दहशत चांगलीच वाढली आहे. वैष्णवदेवी मंदिर परिसरात हिल टॉप कॉलनी येथील गाईच्या गोठ्यावर चार बिबट्यांनी शुक्रवारी रात्री हल्ला चढवला. यात एका गाईची शिकार झाली. तर दुसरी गाय गंभीर जखमी आहे. या परिसरात पंधरा दिवसात बिबट्यांने केलेल्या शिकारीची ही चौथी मोठी घटना आहे.
शहरापासून अवघ्या काही अंतरावर चांदुर रेल्वे मार्गावर वडाळी-पोहर्‍याच्या जंगलात वैष्णवदेवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर हिल टॉप कॉलनी आहे. अवघ्या चौदा-पंधरा घरांच्या या कॉलनीत बांगरे यांचा गाईंचा गोठा आहे. या गोठ्यात शुक्रवारी दोन गाई असताना, रात्री दहा वाजेच्या सुमारास या गोठ्यावर बिबट्यांनी हल्ला केला. हल्ला करणार्‍या बिबट्यांची संख्या चार असल्याचे काहीजणांचे म्हणणे असून गोठ्या शेजारीच घर असणार्‍यांनी मात्र आम्ही आठ बिबटे पाहिलेत असे सांगितले.

 
 
बिबट्यांनी गोठ्यात असणार्‍या दोन गाईंवर हल्ला चढवला. या हल्ल्यात एक गाय जखमी झाली आणि तिने पळ काढला. दुसर्‍या गाईवर मात्र बिबटे तुटून पडले. भल्यामोठ्या गाईला गोठ्यातून बाहेर खेचत आणून बिबट्यांनी तिची शिकार केली. या परिसरात राहणार्‍या अनेकांनी घराचे दार बंद करुन खिडकीतून हा सारा प्रकार पहिला. गाईला मारुन बिबटे निघून गेलेत. शनिवारी सकाळी या घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यावर आधी वन कर्मचारी पाहणी करण्यासाठी आले. त्यानंतर वन कर्मचार्‍यांनी शिकार केलेल्या गाईला खाण्यासाठी बिबट्या परत येईल म्हणून गोठ्यात कॅमेरा बसवला आहे.