परप्रांतीय गांजा तस्कर गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात

    दिनांक :25-Aug-2019
नागपूर,
कारमधून गांजाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका तस्कराला अटक करून त्याच्याजवळून ४ लाखांचा गांजा आणि कार असा १० लाख ८४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बाळकृष्ण नानकचंद जैन (४०) रा. त्रिमूर्तीनगर, जबलपूर (म.प्र.) असे अटक करण्यात आलेल्या गांजा तस्कराचे नाव आहे.
बाळकृष्ण जैन हा जुना गांजा तस्कर आहे. यापूर्वी गांजा तस्करीत पोलिसांनी दोन तीनदा पकडले होते. दोन महिन्यांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा आपला धंदा सुरू केला होता. चार दिवसांपूर्वी त्याने आणि अवधेश अज्जू विश्वकर्मा (३०) ब्रिजगळा चौकीजवळ, जबलपूर यांनी ओरीसा येथून २ हजार रुपये प्रती किलोने ४० गांजा खरेदी केला होता. एमपी २० सीएफ १०८८ क्रमांकाच्या टाटा जेस्टा कारमध्ये गांजाचे पुडे भरून तो नागपूरमार्गे जबलपूरला जात होता. बाळकृष्ण हा गांजा तस्करी करणार आहे अशी माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पो. नि. राजू बहादुरे यांना मिळाली होती.
 
 
त्यानुसार शनिवारी दुपारी ४.२५ च्या सुमारास कळमना हद्दीतील जबलपूर-हैदराबाद मार्गावर सापळा रचला. कापसी पुलावरून चुकीच्या मार्गाने येत असताना पोलिसांनी कारला थांबविण्याचा इशारा दिला. तोच गाडी थांबवून अवधेश हा पळून गेला. बाळकृष्णने पळून जाण्याच्या प्रयत्नात कापसी पुलावरून खाली उडी घेतली. त्यामुळे त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला आणि डाव्या पायाच्या टाचेला मुका मार लागून तो जखमी झाला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात सहा पाकिटांमध्ये ४० किलो ४४ ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी कार आणि गांजासह १० लाख ८४४० हजाराचा माल जप्त केला. याप्रकरणी कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून बाळकृष्णला अटक केली. ही कारवाई पो. नि. राजू बहादुरे, सहायक उपनिरीक्षक राजेश ठाकूर, हे. कॉ. विनोद मेश्राम, सतीश मेश्राम, शिपाई सचिन शेलोकर, राहुल गुमगांवकर, कामठी वाहतूक शाखेचे पो. नि. रोशन यादव, उपनिरीक्षक संदीप आगरकर, शिपाई गोपीचंद निनावे, निरज पाठक यांनी केली.