परतवाड्याच्या अग्रवाल ज्वेलर्समध्ये ७५ लाखाची चोरी

    दिनांक :25-Aug-2019
अचलपूर-परतवाडा शहरात चोरांचा धुमाकूळ
 

 
 
अचलपूर,
परतवाडा शहरातल्या सदर बाजार येथील ईश्वरलाल पन्नालाल अग्रवाल ज्वेलर्समध्ये अज्ञात चोरट्यांनी शनिवार मध्यरात्रीनंतर ७५ लाखांची धाडसी चोरी केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे.
अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात सध्या चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत आहे. अचलपूर शहरात देवळी पोलिस चौकीच्या जवळ असलेल्या मुख्य रस्त्यावरील दोन दुकानांना चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी लक्ष केले, त्याच दिवशी तहसील रोड वरील पतंजली व एका मेडीकल दुकानात चोरी झाली. जुळ्या शहरात वाढत्या चोरीमुळे नागरिक व व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस प्रशासनाविरोधात असंतोष निर्माण होत असतानाच रविवार २५ ऑगस्टच्या पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास परतवाड्याच्या सदर बाजार येथील ईश्वर पन्नालाल कंकराणीया (अग्रवाल) यांचे ज्वेलरीचे दूकान फोडून अंदाजे ७० ते ७५ लाखाचे गहाण असलेले दागीने चोरून नेल्याचा अंदाज वर्तवील्या जात आहे . चोरटे पांढर्‍या रंगाच्या वाहनातून उतरत दूकानाचे शटरचे कूलूप तोडतांना बाजूच्या सिसिटिव्हि कॅमेर्‍यात दिसत आहेत. चोरट्यांनी तिजोरीतिल दागीने चोरून दूकानातील संगणकातील डि.व्हि.आर सूद्धा काढून नेलेला आहे. याचवेळी परतवाडा शहरात अजून काही दुकानांना चोरट्यांनी लक्ष केल्याचे समजले. घडलेल्या घटनेने जुळ्या शहरातील व्यापार्‍यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे . विशेष म्हणजे जुळ्या शहराच्या संरक्षणाकरीता एक नव्हे तर तीन पोलिस स्टेशन आहेत. परतवाडा व अचलपूर पोलिस स्टेशन अंतर्गत या घटना सातत्याने होत आहे. या दोन्ही पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात मोठ्या बाजारपेठा असल्याने शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याचे स्पष्ट होत आहे.