संततधार पावसाने समुद्रपुर तालुका जलमय

    दिनांक :26-Aug-2019
 सावंगी,वडगाव,गोडवायगाव गावाचा संपर्क तुटला
 समुद्रपुर वर्धा मार्ग ठप्प
 वडगाव सावंगी गावाला पुराचा वेढा
समुद्रपुर, 
गेल्या ३६ तासा पासुन सुरू असलेल्या पावसाच्या बॅटिंगने समुद्रपुर तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या पावसाने तालुक्यातील बऱ्याच लहान मोठ्या नदी नाल्याला पुर आल्याने सकाळ पासून अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.  सकाळी ८ वाजताच्या सुमारास हिंगणघाट उमरेड बस धोंडगाव पुलाजवळ पुराच्या पाण्यातून थोडक्यात बचावली.  

तालुक्यातील वडगाव सांवगी या दोन्ही गावांतील नदीला पूर आल्याने गावाजवळ पाणी शिरले असून या दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. मंगरूळ गावातही पुराचे पाणी कित्येक घरात शिरले असुन गावाचा संपर्क तुटला आहे. समुद्रपुर वर्धा मार्गावरील शेडगाव नदिला आलेल्या पुराने हा मार्ग बंद झाला आहे. तर हिंगणघाट उमरेड मार्गावरील धोंडगाव गावा जवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा सुद्धा मार्ग बंद झाला आहे. वाघाडी नदिला पुर आल्याने समुद्रपुर वायगाव गोंड मार्ग बंद झाला आहे, तर लालनाला प्रकल्पाच्या पाण्याच्या विसर्ग सुरू असल्याने कोरा गावाशी चिमुर हिंगणघाट,गिरड गावाचा संपर्क तुटला आहे. या पावसाने नदी-नाल्या काठावरील शेत जमीनीला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. हिंगणघाट उमरेड बस धोंडगाव पुला जवळ पुराच्या पाण्याने बस धोडक्यात बचावली चालकाच्या सतर्कतेने बस मधिल प्रवाशीही थोडक्यात बचावले. पुराचे पाणी ओसरल्यावर या बसला मार्गक्रमण करण्यात आले. या मुळे तालुक्यातील कित्येक हेक्टर जमिनीतील पिकही धोक्यात आले आहे. कित्येक गावातील लहान मोठे नदी नाले तुडुंब भरून असुन कित्येक ठिकाणी वाहतूक खोळंबल्याची माहिती आहे.या अतिवृष्टीने कित्येक घराची सुध्दा पडझड झाल्याची प्राथमिक माहिती आहे.