माध्यान्हीचा सूर्यास्त!

    दिनांक :26-Aug-2019
दिल्ली दिनांक  
 रवींद्र दाणी 
 
सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत असे मानले जाते. अर्थात प्रत्येक बाबीला अपवादही असतात. तसाच अपवाद याही नियमाला होता आणि तो होता अरुण जेटली. या नेत्याला सरस्वतीचे वरदान लाभले होते आणि त्यांच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त होता. एखादा दस्तावेज हाती घेतल्यावर कोणत्या पृष्ठावर काय आहे हे पाहण्यासाठी जेटली यांना त्या दस्तावेजाची पृष्ठे पालटावी लागत नसत तर बरोबर त्यांची नजर त्या पृष्ठाचा वेध घेत असे. हा जेटलींना लाभलेला दैवी गुण होता. याने त्यांना देशातील एक नामवंत वकील बनविले आणि त्यांच्यावर लक्ष्मीचा जणू वर्षाव सुरू झाला. अशा या विलक्षण प्रतिभाशाली नेत्याचे शनिवारी अकाली निधन झाले.
 
 
14 व्या लोकसभेत-राज्यसभा व लोकसभा दोन्ही सभागृहात विरोधी नेत्याची भूमिका बजावणारे दोन्ही नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली एकाच महिन्यात केवळ काही दिवसांच्या अंतराने काळाच्या पडद्याआड गेले.
देशाच्या राजकीय क्षितीजावर भाजपचा उदय आणि भाजपच्या राजकीय क्षितीजावर जेटलींचा उदय या बाबी सोबतच सुरू झाल्या. 1989 च्या निवडणुकीत भाजपाला 89 जागा मिळाल्या. केंद्रात भाजपाच्या पािंठब्याचे व्ही. पी. िंसग सरकार आले आणि त्या सरकारमध्ये अतिरिक्त सॉलिसीटर जनरल म्हणून जेटली यांची नियुक्ती झाली. हा जेटलींचा राजकीय उदय होता, ज्याला अरुणोदय म्हटले जात आहे. त्यानंतर जेटली यांनी मागे वळून पाहिले नाही. जेटली यांचे सुदैव म्हणजे त्यांना लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्याचा आशीर्वाद लाभला होता.
तीन पैलू
जेटली यांच्या व्यक्तिमत्वाचे तीन प्रमुख पैलू होते. एक- राजकीय नेता, दुसरा- एक क्रिकेटप्रेमी आणि तिसरा एक नामवंत वकील. क्रिकेट हे माझे पहिले प्रेम आहे, वकिली हे दुसरे आणि राजकारण तिसर्‍या क्रमाकांवर असे ते अनेकदा बोलून दाखवित. या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी आपला डाव खेळला आणि जेव्हा ते राजकीय आघाडीवर मोठी खेळी खेळणार असे वाटत होते, त्यांचा डाव अर्ध्यावरच मोडला.
जेटली राजकीय विषयांचे विश्लेषण गंभीरतेने करीत! विषय समजण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती. राजकीय विषय हाताळीत असताना, राजकीय विनोद करण्याची हातोटी त्यांना लाभली होती. एका राजकीय घटनाक्रमाच्या संदर्भात जेटली एक विनोद नेहमी ऐकवित. जंगलात, एका हत्तीणीवर बलात्कार झाला. सारे हत्ती ‘आरोपीचा’ शोध घेण्यासाठी निघाले. हत्तींचा झुंड- बलात्कारीचा शोध घेण्यासाठी धावत होता आणि त्याच जंगलात एक उंदीर जिवाच्या आकांताने धावत होता. कुणीतरी त्याला विचारले, हत्ती का धावत आहेत हे तर आम्हाला माहीत आहे. पण तू का धावत आहेस? उंदीर उत्तरला, हत्तीणीवर बलात्कार केल्याचा संशय माझ्यावरही घेतला जात आहे. जेटली हा किस्सा रंगवून सांगत.
जेटलींची मैफिल
गप्पांची मैफिल रंगविणे हा जेटली यांचा स्वभाव. जेटलींचा दरबार भरला की त्यांच्या गप्पा - विनोदांना सुरुवात होई. राजकीय किस्से सांगत, राजकीय घटनाक्रमासाठी नेमका शब्द वापरण्याचे कसब त्यांना साधले होते.
राजकारणात वावरताना काही मर्यादा असतात असे मानणार्‍यांपैकी ते एक! भाजपाचा एक आधुनिक चेहरा म्हणून ते ओळखले जात होते. वेगवेगळ्या विषयांवर सरकारची व पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जात असे आणि ते ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडीत असत. राजकारणात भाषेची मर्यादा पाळली जाण्याचा आग्रह धरणार्‍यांपैकी ते एक होते. भाजपाच्या एका महासचिवाने एक वादग्रस्त विधान केले होते. त्यावर त्यांनी भर बैठकीत त्या नेत्याला कानपिचक्या दिल्या होत्या.
जेटली खाण्याचे दर्दी!
निवडणुकीच्या धामधुमीत पत्रकारांना आपल्या गाडीत बसवून, थेट चांदणी चौकाच्या पराठेवाली गल्लीत जावून पराठे खाण्याचा त्यांचा आनंद पाहण्यासारखा असे. मात्र, हीच बाब त्यांना नडली. 14 वर्षांपूर्वी त्यांच्यावर बायपास शल्यक्रिया करण्यात आली. त्यानंतर तरी ते आपल्या प्रकृतीकडे लक्ष देतील असे वाटले होते. ते त्यांनी केले नाही. दुपारच्या जेवणापूर्वी ते आपल्या खिशातून एक चांदीची डबी काढीत. त्यात दुपारी घ्यावयाच्या गोळ्या असत. गोळ्यांनी भरलेली ती डबी रिकामी केल्यावर ते जेवण घेत. जेटलीचा मार्निंग वॉक म्हणजे एक वेगळे प्रकरण होते. अनेकदा ते नवी दिल्लीच्या लोधी गार्डनमध्ये मॉर्निंग वॉकसाठी जात. हा वॉक सुरू होऊन काही मिनिटे होत नाही तोच त्याचे मित्रवर्तुळ गोळा होई. आणि मॉर्निंग वॉकला- समोसा- जिलेबी पार्टीचे स्वरूप केव्हा येई हे कळतच नसे. सकाळचे फिरणे राहिले बाजूला, जेटलींचा दिवसच समोशाने सुरू होई. याचा परिणाम त्यांचे वजन वाढण्यात झाला. ते कमी करण्यासाठी त्यांनी एक शल्यक्रिया करविली. त्यात त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली.केवळ निष्काळजीपणा असेच त्याचे वर्णन करावे लागेल. त्यांना एम्समध्ये दाखल करावे लागले आणि डॉक्टरांनी मोठ्या निकराचे प्रयत्न करून त्यांचे प्राण वाचविले. मात्र, सत्ता मिळूनही त्यांना सत्तेचा आनंद घेता आला नाही. त्यांच्या पत्नीला कर्करोगाने ग्रासले. त्यातून ते सावरत नाहीत, तोच जेटली यांना मूत्रिंपडाचा त्रास सुरू झाला. त्यांच्यावर मूत्रिंपड रोपणाची शल्यक्रिया करण्यात आली. त्यातून ते सावरत आहेत असे वाटत असतानाच, सरकोमा या दुर्मिळ अशा कर्करोगाने त्यांना ग्रासले. आणि शेवटी त्यातच त्यांचे निधन झाले.
राजकारणात 66 हे काही काळाच्या पडद्याआड जाण्याचे वय नाही. त्यातही केंद्रात सरकार असताना! 2019 च्या लोकसभा निवडणुका झाल्यावर त्यांनी सरकारमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला होता. आपली प्रकृती आपली साथ देणार नाही हे त्यांच्या लक्षात आले होते. माझा परमेश्वरावर व डॉक्टरांवर पूर्ण विश्वास आहे असे ते बोलून दाखवित. मात्र, आपल्याजवळ- तीन चार महिन्यांपेक्षा अधिक काळ नाही हे त्यांच्या लक्षात आले होते. ते एका चमत्काराची प्रतीक्षा व अपेक्षा करीत होते. केवळ दैवी वा वैद्यकीय चमत्कारच आपल्याला वाचवू शकतो हे त्यांना दिसत होते. क्रिकेटमध्ये जसा चमत्कार होतो आणि सामन्याचा रंग बदलतो, तसे आपल्या बाबतीब व्हावे असे त्यांना वाटत होते. दिल्लीच्या राजकीय क्षितिजीवर भाजपाचा सत्तासूर्य तळपत असताना, जेटलींना आपला सूर्यास्त स्पष्टपणे दिसत होता आणि शनिवारी दुपारी 12 वाजता बरोबर माध्यान्हाच्या प्रहरी हा सूर्यास्त झाला.
मोदी सरकारचा अर्थसंकल्प मांडताना, देशाच्या अर्थव्यवस्थेला बिकट अवस्थेतून बाहेर काढण्याचे कसब सरकारजवळ आहे हे सांगण्यासाठी जेटली यांनी लोकसभेत एक शेर ऐकविला होता,
कश्ती चलानेवालोंने
जब हारकर दी पतवार हमे
लहरलहर तुफान मिले
और मौज मौज मझधार हमे!
फिर भी दिखाया है हमने
और फिर दिखा देंगे सबको,
इन हालातों में आता है
दरिया पार करना हमे!
जेटली देशाच्या अर्थव्यवस्थेला तर सांभाळू शकले, सुरक्षित ठेवू शकले. मात्र, स्वत:च्या प्रकृतीचे ‘जहाज’ मात्र त्यांना सांभाळता आले नाही.