सिंधूच्या बायोपिकमध्ये दीपिका?

    दिनांक :26-Aug-2019
मुंबई,
भारताची नवी 'फुलराणी' असलेल्या पी. व्ही. सिंधूनं बॅडमिंटनच्या विश्वात सुवर्णाक्षरांनी लिहावी अशी कामगिरी केली. सिंधूनं जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. सुवर्णपदकाबद्दल तिचं अनेकांनी अभिनंदन केलं. परंतू अभिनेता सोनी सूद यांने सिंधूला दिलेल्या शुभेच्छा खास आहेत. कारण सोनू सिंधूच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती करत आहे. 

 
सोनू सूद मागील काही दिवसांपासून या चित्रपटाची तयारी करतोय. चित्रपटाचं नाव 'सिंधू' असं आहे, अशी चर्चा सुरू आहे. चित्रपटाचं शुटिंग लवकरच सुरू होणार होतं. मात्र, जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद पटकवल्यानंतर चित्रपटाची संहिता बदलण्यात येणार आहे.
'एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती करत असताना सर्वात अवघड असतं ते म्हणजे लिखाण आणि त्यातील कलाकारांची निवड. संहिता तयार आहे. सिंधूवर चित्रपट बनवायचा असल्यानं प्रत्येक गोष्टीत न्याय व्हायला हवा' असं सोनूनं म्हटलं आहे.
सिंधू आणि तिचे कोच पुलेला गोपीचंद यांच्या भूमिकेसाठी कलाकारांची निवड सुरू असून या खेळाला समजू शकणाऱ्या कलाकारांना प्राधान्य असेल असंही सोनूनं सांगितलं. आमची पहिली पसंती ही दीपिका पादुकोण हिच असेल, कारण तिला खेळ जवळून माहित आहे. तिला चित्रपटाची संहिता पाठवण्यात आली असल्याचंही त्यानं सांगितलं.
पुलेला गोपीचंद यांच्या भूमिकेसाठी सोनू स्वत: इच्छूक आहे. 'सिंधू आणि गोपीचंद यांचं गुरू-शिष्याचं नातं खूप खास आहे. मला हे मोठ्या पडद्यावर साकाराला मिळणार असेल तर आनंदच होईलं'. असं सोनूनं म्हटलं आहे.