क्रेडिट कार्ड रद्द करताना...

    दिनांक :26-Aug-2019
क्रेडिट कार्डामुळे आयुष्य बर्‍याच अंशी सुलभ झालं आहे. हातात रोख रक्कम नसतानाही आपण कार्डाचा वापर करून मोठी खरेदी करू शकतो. एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड असतील तर बिलांच्या तारखा सांभाळताना चांगलीच त्रेधातिरपीट उडते. अशावेळी एखाददुसरं क्रेडिट कार्ड रद्द करण्याचा निर्णय ेघेतला जातो. प्रत्येक निर्णयाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होतात. क्रेडिट कार्ड रद्द करण्याच्या निर्णयाबाबतही असंच म्हणावं लागेल. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी क्रेडिट कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेणार असाल तर तो अर्थपूर्ण आहे, असं म्हणता येईल. मात्र कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेण्याआधी काही गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे. 

 
 
क्रेडिट कार्ड रद्द केल्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होईल, याचा आढावा घ्या. समजा तुमच्याकडे एकमेव क्रेडिट कार्ड आहे. त्यातच दुसरं कोणतंही कर्ज तुम्ही घेतलेलं नाही. अशा परिस्थितीत क्रेडिट ब्युरोला तुमच्या क्रेडिट हिस्टरीची कोणतीही माहिती मिळणार नाही. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअरच तयार होणार नाही. तुमच्याकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड असतील तर जुन्याऐवजी नवं क्रेडिट कार्ड रद्द करण्यावर भर द्या. जुनं क्रेडिट कार्ड रद्द केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअरची घसरण होऊ शकते.
 
विविध बिलं भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर होतो. काही बिलं क्रेडिट कार्डमार्फत थेट भरली जातात. त्यामुळे कार्ड रद्द करण्याआधी बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन ऑटो पेमेंटचा पर्याय रद्द करणं गरजेचं आहे. कार्ड रद्द करण्याआधी कार्डाशी संबंधित सर्व देणी फेडून टाका. कार्डाशी संबंधित सवलतींचा आढावा घ्या. तुम्हाला मिळालेले रिवॉर्ड पॉईंट्‌स रिडिम करून घ्या.
 
क्रेडिट कार्ड रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर बँकेला याची माहिती द्या. बँका हा निर्णय रद्द करण्याची विनंती करतील. पण तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम रहा. कोणत्याही सवलतींना भुलू नका.