जिनिअस लोकांचा देश

    दिनांक :27-Aug-2019
निलेश जठार
9823218833
 
आकाराने दिल्लीएवढा पण लोकसंख्येच्या बाबतीत दिल्लीच्या एक चतुर्थांश असलेला स्कॉटलंड हा देश जिनिअस लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. या छोट्याशा देशाचे वैशिष्ठ असे, की जगातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात या देशाचा काही ना काही संबंध आहे, कारण मानवतेच्या कामी येणार्‍या अनेक गोष्टींचा शोध या देशाने लावला आहे. असे शोध लावणार्‍यांना ‘जिनिअस’ असे म्हणतात. इंग्लंडचा शेजारी असलेला हा देश यूकेचा स्कॉटलंड हा भाग आहे. या ठिकाणी अनेक सुंदर ठिकाणं बघण्या सारखे आहेत. वर्षातून हजारो पर्यटक स्कॉटलंडला येतात खासकरून स्कॉटलंडचा ख्रिसमस उत्सव फार भव्य आणि सुरेख असतो. त्यासाठी जगभरातील पर्यटक डिसेंबर महिन्यात स्कॉटलंडमध्ये दाखल होत असतात. 

 
 
प्रत्येकाने कधी ना कधी कॅलेंडर अथवा एनसायक्लोपिडीयाचा वापर केला असतो, टॉयलेटचा फ्लश, फ्रिज, सायकल वापरलेली असते. या सर्व शोधांसाठी आपल्याला स्कॉटलंडच्या जिनिअस लोकांचे आभार मानावे लागतील. सर्जरीची करताना ती वेदना रहित केली जाणे या तंत्राची देणगी याच देशाने दिली आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारा जेम्स वॉट याच देशाचा. अर्थशास्त्री अॅडम स्मिथ याच देशाचा. हुशारी व क्रिएटिव्हीटी क्षेत्रात स्कॉटलंडने मिळविलेले यश मोजणे अवघड असल्याचे म्हटले जाते. अर्थात काही जणांच्या मते या ठिकाणी थंडी प्रचंड असल्याने लोक फारसे घराबाहेर पडत नाहीत व त्यामुळे घरात बसल्याबसल्या काय करायचे म्हणून काही तरी नवे करायला जातात व त्यातून अनेक शोध लागतात. पण असे संशोधन केलेल्या ठिकाणांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून स्कॉटलंडच्या सरकारने उत्पन्नाचा नवा सोर्स विकसित केलाय्‌ अनेक देशातील इंजिनियर डॉक्टर आपल्या इंडस्ट्रीयल विझिटसाठी स्कॉटलंडला आपली पहिली पसंती ठेवतात अशा इंडस्ट्रीयल विझिट करीता स्कॉटलंडच्या सरकारने अनेक चांगले पॅकेज देखील तयार केले आहे. 

 
 
स्कॉटलंडची राजधानी एिंडबर्ग हे एक शांत, सुंदर शहर आहे. येथील गल्ल्या, सुप्त ज्वालामुखी, पुस्तकांची दुकाने रमतगमत पाहावीत. हॅरी पॉटरचा जन्म इथल्याच ‘एलिफंट हाऊस’ या रेस्टॉरंटमधला. या पुस्तकाची लेखिका जेके रोिंलगला येथेच यशाची चव चाखायला मिळाली. दोन मुलांची जबाबदारी असलेल्या रोिंलगने याच रेस्टॉरंटमध्ये हॅरी पॉटरचे लिखाण करून जगप्रसिद्धी मिळविली. रहस्य लेखक इयान रँकिग, लेडिज डिटेक्टीव्ह सिरीज लिहिणारा अलेक्झांडर मॅकल येथलाच. येथे सिलीकॉन ग्लेन ही हायटेक रिसर्च संस्था असून विज्ञानातील नवनवीन शोध येथे लागले आहेत. एंडिबर्गमध्ये दरवर्षी भरणार्‍या विज्ञान मेळ्यात ते प्रसिद्ध केले जातात. तसेच येथे दरवर्षी ‘फ्रिंज फेस्टीव्हल’ हा जगातला सर्वात मोठा कला मेळा भरतो. एंडिबराचा किल्ला व त्यावर महोत्सवा दरम्यान होत असलेली सैनिकी लुटूपुटूची कवायत आवर्जून पाहायला हवी अशीच असते.