प्राचीन काश्मिर प्रांताचा अज्ञात इतिहास

27 Aug 2019 06:00:24
डॉ. अशोक नेने
9404082547
 
5 ऑगस्ट 2019 रोजी घटनेचे 370 कलम रद्द झाले व काश्मिर प्रांताची दोन केंद्रशासित भागांत विभागणी झाली. तेव्हापासून या प्रांताबद्दल लोकांत उत्सुक्तता निर्माण झाली आहे. काही विशिष्ठ अटींसह हा प्रांत भारतात विलिन झाला एवढीच जुजबी माहिती होती पण या प्रांताला सुमारे 2500 वर्षांचा समृध्द इतिहास आहे हे काही लोकांनाच माहित असावे. 
 
 
1. पौराणिक इतिहास : ऋग्वेदातील नदीस्तुती सुक्तात उत्तर भारतातील ज्या दहा नद्यांचा उल्लेख आहे त्यात वितस्ता(आजची झेलम) नदी आहे.
इमं मे गङगे यमुने सरस्वति शुतुद्रि सतेमं सचता परुष्ण्या
असिक्न्‌या मरुद्व्र्‌धे वितस्तयार्जीकीये शर्णुह्यासुषोमया ऋ.10.75.5
 
या विषयावरचा सर्वात जुना संदर्भ ग्रंथ म्हणजे नीलमत पुराण. त्यात काश्मिरचा पौराणिक इतिहास सापडतो. त्यानूसार हा संपूर्ण भाग म्हणजे सतीसार नावाचा एक विस्तिर्ण जलाशय होता व त्यात जलौद्भव नावाचा राक्षस रहात असे. त्याला शंकराचे वरदान होते, की पाण्यात असेपर्यंत त्याचा कोणीही वध करू शकणार नाही. या वरदानामुळे तो ऋषी मुनी, स्त्री-पुरुष यांची हत्या करू लागला. तेव्हा सर्व ऋषी मुनी काश्यपमुनीकडे गेले. काश्यप मुनींनी जलाशयाच्या भोवताली असलेले पर्वत फोडून पाणी प्रवाहित केले व नंतर जलौद्भव असूराचा नाश केला व तो राहण्यास योग्य असा केला. म्हणून तो प्रदेश काश्यप-मीर िंकवा काश्मिर या नावाने ओळखला जावू लागला. याच पुराणात महापद्मसार जलाशयाचे (आजचा वुव्हर तलाव) वर्णन आहे. रामायण व महाभारत या ग्रंथातही काश्मिरबद्दल उल्लेख आढळतात.
 
2. भौगोलिक इतिहास : दुसरा संदर्भ ग्रंथ म्हणजे संस्कृत पंडित कल्हन याने रचलेला राजतरंगिणी. यात नील पुराणात वर्णन केलेल्या काश्मिर प्रदेशातील मुख्य पर्वत, नद्या, तिर्थक्षेत्रे यांचे सविस्तर वर्णन आढळते.
 
पाणिनीच्या अष्टाध्यायी (ख्रिस्तपूर्व 5वे शतक) या ग्रंथात काश्मिरचा उल्लेख आढळतो. 
वराहमिहिराच्या बृहतसंहिता (ख्रिस्त पश्चात 5वे शतक) या ग्रंथात काश्मिर प्रांतातील रहिवासी लोकांचे (अभिसार, दर्द, दर्व, खाशा आदि जमतीचे) वर्णन आहे. असेच वर्णन काही उपनिषदे व ब्राम्हण ग्रंथात आढळते. त्यात स्थानिक जमातींची नावे गंधर्व, कैकेय किंवा अंभाष अशी सांगितली आहेत.
 
क्षेमेंद नावाच्या कादंबरीकाराच्या साम्यमात्रिका नावाच्या कादंबरीची नायिका काश्मिरात भ्रमंती करत असताना तीने पाहिलेल्या प्रदेशाचे भौगोलिक वर्णन आढळते. असेच वर्णन सोमेंद्राचा कथासरित्सार या ग्रंथात आढळते. त्यात वर्णन केलेली तिर्थक्षेत्रे म्हणजे, नंदी क्षेत्र, विजय क्षेत्र व वराह क्षेत्र. यांची आजची नावे अनुक्रमे नंदकोल, विजब्रोर आणि बारामुल्ला अशी आहेत.
Powered By Sangraha 9.0