खेलो इंडिया, फिट इंडिया...

    दिनांक :27-Aug-2019
बॅडिंमटनमधील एकेरीचे विश्वविजेतेपद पटकावून पी. व्ही. सिंधू हिने भारताची मान उंचावली आहे, तर स्पेनची राजधानी माद्रिद येथे झालेल्या विश्व युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या कोमलिका बारीने सुवर्णपदक जिंकत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे या दोघींनी आपल्या कर्तृत्वाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
रविवारी झालेल्या एकेरीच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या सिंधू ने आधीच्या दोन वेळच्या विजेत्या नोजोमी ओकुहारा हिला हरवीत आपल्या आधीच्या दोन वेळच्या पराभवाचा बदला घेतला. 2017 आणि 2018 च्या विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत नोजोमी ओकुहारा हिने सिंधू चाच पराभव केला होता. विशेष म्हणजे रविवारी सिंधू च्या आईचा वाढदिवस होता. सिंधू ने या दिवशी विश्वविजेतेपद पटकावीत आपल्या आईला तसेच भारतमातेलाही वाढदिवसाची अनमोल अशी भेट दिली. बॅडिंमटनच्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू भारताची पहिली खेळाडू आहे. याआधी याच स्पर्धेत सिंधू ने दोन वेळा कांस्य आणि रौप्य पदक जिंकले होते. सायना नेहवालने याच स्पर्धेत रौप्य आणि कांस्य अशी दोन पदके मिळविली.

 
 
1983 च्या स्पर्धेत प्रकाश पादुकोण यांनी या स्पर्धेत एकेरीचे पहिले कांस्यपदक पटकाविले होते. सुवर्णपदकासाठी भारताला तब्बल 36 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. या 36 वर्षांदरम्यान पी. व्ही. सिंधू , सायना नेहवाल, ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी भारताला अनेक वेळा रौप्य आणि कांस्यपदके मिळवून दिली; पण सुवर्णपदक भारताला सतत हुलकावणी देत राहिले.
यावेळी जिद्द, चिकाटी, आधीच्या चुकांपासून घेतलेले धडे आणि आत्मविश्वासाच्या बळावर सिंधू ने हे सुवर्णपदक खेचून आणले. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोिंवद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनी सिंधू चे अभिनंदन केले.
अंतिम सामन्यात सिंधू ने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. 16 मिनिटांच्या आतच पहिला गेम जिंकला. त्यामुळे नंतर सिंधू ला मागे वळून पाहावे लागले नाही. बॅडिंमटनच्या या विश्वविजेतेपद स्पर्धेत सिंधू ने आतापर्यंत पाच पदके जिंकली आहेत. यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि 2 कांस्यपदकांचा समावेश आहे.
जिंधूसारखाच गौरवास्पद विजय कोमलिका बारीने स्पेनची राजधानी माद्रिद येथे झालेल्या विश्व युवा तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत मिळविला. कोमलिकाने रविवारी झालेल्या सामन्यात जपानच्या वाका सोनोडावर मात करीत महिलांच्या कॅडेट रिकर्व श्रेणीत सुवर्णपदक पटकाविले. कोमलिका टाटा तिरंदाजी अकादमीची सदस्य आहे. 18 वर्षांच्या आतील वयोगटात तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी कोमलिका भारताची दुसरी खेळाडू आहे. याआधी 2009 मध्ये दीपिकाकुमारीने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
 
विश्व तिरंदाजी स्पर्धेत भारतावर निलंबनाची कारवाई झाल्यामुळे यापुढे कोणताही भारतीय तिरंदाज विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्या पार्श्वभूमीवर कोमलिकाची ही कामगिरी भारताचा आत्मविश्वास उंचावणारी म्हणावी लागेल.
गेल्या पाच वर्षांपासून क्रीडा क्षेत्रात भारताचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले आहेत. त्याआधी भारताची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी क्रिकेटचा अपवाद वगळता फारशी समाधानकारक राहिलेली नाही. याला एक नाही तर अनेक कारणे होती. 2014 च्या आधीच्या राज्यकर्त्यांची धोरणेही यासाठी कारणीभूत होती. क्रीडा क्षेत्रात राजकारणासोबत त्यांनी जो धुडगूस घातला, तो अतिशय लाजिरवाणा तसेच तेवढाचा संतापजनक होता. राजधानी दिल्लीत काही वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीऐवजी भ्रष्टाचाराच्या मोठमोठ्या घटनांनी गाजली होती.
कॉंग्रेसच्या शासनकाळात आशियाई, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिकमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा ठेवली तर यातील कांस्य, रौप्य आणि सुवर्ण अशी तिन्ही पदके भारताला मिळाली असती. भारतातील सर्वच खेळांच्या ज्या संस्था आहेत, त्यांचे अध्यक्षपद खेळाची एबीसीडी समजत नसणार्‍या राजकारणी नेत्यांकडे आहे.
 
क़्रीडा क्षेत्रातील भारताच्या उज्ज्वल कामगिरीचे श्रेय खर्‍या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायला पाहिजे. याआधी एकाही पंतप्रधानाने भारताच्या क्रीडा क्षेत्राकडे लक्ष दिले नव्हते. त्यामुळेच आशियाई, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्पर्धेत 125 कोटींच्या लोकसंख्येच्या आपल्या देशाचा क्रमांक सर्वांत खाली राहायचा. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी सुवर्णपदकेही भारताला कधी मिळाली नाहीत. याउलट भारतापेक्षा कितीतरी लहान देश डझनांनी सुवर्णपदके जिंकायचे; पण याची खंत कधी भारतीय राज्यकर्त्यांना वाटलीच नाही.
ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारताने अनेकदा सुवर्णपदक जिंकले होते. भारतीय हॉकीचा तो खर्‍या अर्थाने सुवर्णकाळ होता. नंतर भारताची हॉकीमध्येही घसरण झाली. हॉकीला पुन्हा सोनेरी दिवस आणण्याचा विचार देशातील कोणत्याच राज्यकर्त्यांनी कधी केला नाही. आम्ही यावर चित्रपट काढण्यातच समाधान मानत राहिलो.
 मोदींनी मात्र सत्तेत येताक्षणी क्रीडा क्षेत्रात भारताची अधोगती का होतेय्‌, याकडे लक्ष दिले आणि भारताला सोनेरी दिवस आणण्याच्या दृष्टीने पावले टाकली. त्याचाच एक भाग म्हणून मोदी सरकार एकमध्ये कर्नल राज्यवर्धन राठोड यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्याचाही चांगला परिणाम दिसून आला. क्रीडा क्षेत्रात आपल्या देशात जेवढा भेदभाव केला जातो, तेवढा खचितच अन्य दुसर्‍या देशात होत असावा. भारतात क्रिकेटला जेवढे महत्त्व दिले जाते, तेवढे दुसर्‍या कोणत्याच खेळाला मिळाले नाही. क्रिकेटपटूंना जेवढा पैसा आणि प्रसिद्धी मिळते, त्याच्या एक टक्काही अन्य खेळ तसेच खेळाडूंना मिळत नाही. क्रिकेटव्यतिरिक्त भारतात हॉकी, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, बॅडिंमटन, टेबल-टेनिस, लॉनटेनिस, बुद्धिबळ, कबड्डी आणि खो-खोसारखे अनेक खेळ आहेत; पण क्रिकेट इतकी प्रभावळ इतर खेळांना लाभत नाही.
क्रिकेटला मिळणारे महत्त्व कमी करा असे कुणी म्हणणार नाही, पण अन्य खेळांकडे तसेच खेळाडूंकडे दुर्लक्ष करू नका, अशी कळकळीची विनंती कराविशी वाटते. मुळात क्रिकेटमध्येही लिंगभेद केला जातो. पुरुष क्रिकेटपटूंना जेवढे मानधन मिळते, त्याच्या एकदशांशही महिला क्रिकेटपटूंना मिळत नाही. प्रसिद्धी आणि जाहिरातींमध्येही पुरुष क्रिकेटपटूंनाच प्राधान्य असते. त्यामुळेच अन्य खेळ आणि खेळाडू सावत्रपणाच्या वागणुकीमुळेच फुलत नाहीत, त्यांची प्रगती होत नाही.
पंतप्रधान मोदींची भूमिका क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचीच राहिली आहे. नव्या शैक्षणिक धोरणात क्रीडा क्षेत्राचाही समावेश करण्याची गरज आहे. शाळांपासूनच मुलांना खेळांची आवड लावायला पाहिजे. कोणत्याही मुलाने खेळण्याचे नाव काढले की पालकांच्या कपाळावर आठ्या येतात. हे योग्य नाही. शाळांमधून विद्यार्थ्यांना कोणत्या तरी एका खेळाची निवड करण्याची सक्ती केली पाहिजे. त्या खेळाच्या दृष्टीने त्याला प्रशिक्षित करून चांगला खेळाडू म्हणून तयार केले पाहिजेत. खेळांचे गुण परीक्षेत ठेवले पाहिजे, हाच पंतप्रधान मोदींच्या खेलो इंडिया, फिट इंडिया चळवळीचा संदेश आहे.