शेतकर्‍यांच्या उपोषणाकडे प्रशासनाने फिरविली पाठ

    दिनांक :28-Aug-2019
उपोषणाचा आज चवथा दिवस
 
कारंजा लाड, 
कारंजा तालुक्यातील शेवती, देवचंडी व मांडवा येथील शेतकर्‍यांनी विविध मागण्यांसाठी 26 ऑगस्ट पासून कारंजा तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. आज बुधवारी उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी प्रशासनाने दखल न घेतल्याने उपोषण सुरूच आहे.
 
 
 
26 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, तालुकाध्यक्ष मनोज कानकिरड, संभाजी बि‘गेडचे माणिकराव पावडे पाटील, श्रीकांत ठाकरे व माजी जिप सदस्य तथा शेतकरी नेते गजानन अमदाबादकर तर 28 ऑगस्ट रोजी पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या व प्रगत मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण मंडपास भेटी देऊन उपोषणकर्त्यांनी मागण्या जाणून घेतल्या. शिवाय उपोषणास पाठिंबाही दर्शविला. कारंजा तालुक्यातील उपरोक्त तीन गावातील शेतकर्‍यांचे अत्यल्प पावसामुळे पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ मदत देण्यात यावी शिवाय 2017-18 व 2018-19 या वर्षाचा पिकविमा देण्यात यावा. सन 2016-17 व 2017-18 या वर्षातील पिककर्ज माफ करून सातबारा कोरा करण्यात यावा. कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळग्रस्तांना मिळणार्‍या सवलती लागू कराव्या. तातडीने पिककर्ज उपलब्ध करून द्यावे. या व इतर मागण्यांसाठी उपरोक्त तीन्ही गावातील शेतकरी आमरण उपोषणास बसले आहे. उपोषणककर्त्यात देवानंद देवळे, गजानन ढोरे, कैलास गांजरे, दिलीप देवळे, मंगेश सावके यांच्यासह इतर शेतकर्‍यांचा समावेश आहे.
 
 
उपरोक्त मागण्यांसंदर्भात शेतकर्‍यांनी 15 जुलै रोजी प्रशासनाकडे निवेदन दिले होते. परंतु, सदर निवेदनाची दखल न घेतल्याने अखेर शेतकर्‍यांना आमरण उपोषणाचे हत्यार उपसावे लागले. दरम्यान या संदर्भात स्थानिक प्रशासनाशी या संपर्क साधला असता उपोषणकर्त्यांच्या मागण्या वरिष्ठ पातळीवरील असल्याने मान्य करणे आपल्या हातात नाही. यापुर्वी सदर भागाचे सर्व्हेक्षण करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. उपोषणकर्त्याच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने तिसर्‍या दिवशी वृत्त लिहेस्तोवर उपोषण सुरू हेाते.