उत्पन्नाचा सुगंधी मार्ग

    दिनांक :28-Aug-2019
पारंंपरिक पिकांच्या लागवडीवर भर देणं आता पुरेसं फायदेशीर ठरत नाही, हे वेळोवेळी दिसून येत आहे. त्यादृष्टीने शेतकर्‍यांनी नवनवीन पिकांच्या लागवडीवर भर द्यावा, अशा स्वरूपाचा आग्रह धरला जात आहे. त्यादृष्टीने सुगंधी वनस्पतींच्या लागवडीचा विचार अवश्य केला जायला हवा. खरं तर सुगंधी वनस्पतींची शेती आपल्यासाठी आता नवी राहिेली नाही. अनेक राज्यांनी या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. तामिळनाडू, कर्नाटकमध्ये जिरॅनियम, उत्तर प्रदेशात वाळा, पंजाबमध्ये पुदिना, केरळ राज्यात गवती चहा, आसाम, मेघालय, आंध्रप्रदेशात सिट्रोनेला, उत्तरप्रदेश-कर्नाटकमध्ये रोशा, आंध्रप्रदेश, कर्नाटकमध्ये दवणा तर पश्चिमघाट प्रदेशात पाचौली या सुगंधी वनस्पतींची शेती वाढीस लागली आहे. सुगंधी तेलांना देशांतर्गत तसेच निर्यातदृष्ट्या मोठी मागणी असून या तेलांच्या विघटनातून तयार केल्या जाणार्‍या उत्पादनांच्या निर्मिती, व्यापार आणि निर्यातीत अनेक कंपन्या कार्यरत आहेत. 
 
 
सद्यस्थितीत सुगंधी तेलाचं जागतिक उत्पादन साधारणपणे दोन लाख टनांच्या आसपान असून त्यातून देशाला मिळणारं मूल्य फारच कमी आहे. अशा परिस्थितीत सुगंधी तेलाची मागील काही वषार्ंची मागणी पाहता निर्यातमुल्यात वाढ होणं आवश्यक आहे. कारण या तेलांची देशांतर्गत मागणी कमी तर परदेशातील मागणी अधिक राहत आली आहे. एवढंच नाही तर त्यात वरचेवर वाढही होत आहे. असं असलं तरी ंया क्षेत्रातील भारताचा वाटा कमी असून अमेरिका, कॅनडा, युरोपीय संघ इत्यादी देशांमध्ये निर्यातीच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. अत्तरे, साबण, डास/कीटक प्रतिबंधक रसायनं, केशतेल, वनस्पतीजन्य सौंदर्यप्रसाधनं, गंधचिकित्सा आदी उद्योगांमध्ये सुगंधी तेलाची मागणी वाढत आहे. आपल्या देशात 60 टक्के सुगंधी तेलाचा वापर सुगंधी द्रव्ये आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. 20 टक्के सुगंधी तेल औषधांमध्ये तर 20 टक्के खाद्य पदार्थांना स्वाद देण्यासाठी वापरलं जातं. महाराष्ट्रात जिरॅनियम, पुदिना, क्लॉसिमम, पाचौली, गवती चहा, सिट्रोनेला, रोशा, कस्तुरभेंडी, दवणा, वाळा या सुगंधी वनस्पतींची शेती व्यापारीदृष्ट्या करता येऊ शकते, असं कृषीतजज्ञांंचं म्हणणं आहे.