मोदींची मुत्सद्देगिरी...!

    दिनांक :28-Aug-2019
कलम 370 रद्द करण्याच्या मुद्यावरून एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातून व्यापक समर्थन मिळत असताना तिकडे पाकिस्तान मात्र एकाकी पडत चालला आहे. काश्मीरच्या मुद्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यात आपल्याला यश आल्याची डिंग  हाकत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मात्र स्वत:च्याच धुंदीत वावरत आहेत. इम्रान खान अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले होते. त्यावेळी बोलताना ट्रम्प यांनी, मोदी यांनी आपल्याला काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची विनंती केली होती असे सांगत वादळ उठवले होते. पण, त्याच ट्रम्प यांनी आता घूमजाव केले आहे. काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे आणि तो भारत-पाकिस्तान यांनी परस्पर चर्चेतूनच सोडवायचा आहे, असे ट्रम्प यांनी प्रत्यक्ष नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत स्पष्ट केल्याने सगळे मळभ दूर झाले आहे. शिवाय, पाकिस्तानला मोठी चपराकही बसली आहे. जी-7 राष्ट्रांच्या शिखर परिषदेेच्या निमित्ताने नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात परवा एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि त्या बैठकीत मोदी यांनीही काश्मीरबाबतची भारताची भूमिका स्पष्ट केली. जगातल्या अतिशय बलाढ्य अशा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपुढे आपली भूमिका स्पष्ट करायला धाडस लागते. ते धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवले, यासाठी त्यांचे अभिनंदन हे व्हायलाच पाहिजे. इम्रान खान अमेरिकेत गेले असताना त्यांना मिळालेली वागणूक आणि मोदी हे ट्रम्प यांना जगात कुठेही भेटले असताना मोदींना मिळत असलेली वागणूक यात मोठी तफावत आहे. या तफावतीवर पाकिस्तानातील विविध वाहिन्यांवर जोरदार चर्चा होत असते आणि त्यात मोदी व इम्रान खान यांची तसेच, भारत व पाकिस्तान यांची तुलना केली जाते. त्यात चर्चांमध्ये सहभागी होणारे सगळेच इम्रान खानला झोडपून काढतात. त्यामुळे इम्रान खान यांची पाकिस्तानात छी-थू झाली आहे, होत आहे. स्वत:ची लाज कशी राखायची असा प्रश्न पडलेले इम्रान खान हे आता अक्षरश: बावचळले आहेत. काय करावे, भारताला आणि मोदींना कसे रोखावे, हे त्यांना कळेनासे झाले आहे. त्यातून निराश झालेल्या इम्रान खान यांनी भारताला थेट अणुयुद्धाची धमकी दिली आहे. देशात अठराविश्वे दारिद्र्य आहे, जगातून भीक मिळण्यावर निर्बंध आले आहेत, देशातील जनता महागाईने पोळून निघाली आहे, अशा परिस्थितीत इम्रान खान भारतासारख्या मजबूत शेजार्‍याला अणुयुद्धाची धमकी देऊन स्वत:चे व पाकिस्तानचेही हसे करून घेत आहेत.
 

 
 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दुबई अर्थात युनायटेड अरब अमिरातीचा दौरा केला. या दौर्‍यात त्यांना तिथल्या शासकांकडून, तिथल्या जनतेकडून जो अभूतपूर्व असा सन्मान मिळाला, तो भारताच्या प्रतिष्ठेत भर टाकणाराच म्हटला पाहिजे. काश्मीरच्या मुद्याला पाकिस्तानकडून धार्मिक रंग दिला जात असताना आणि आपल्याला मुस्लिम देशांचा पाठिंबा मिळेल असा दावा केला जात असल्याच्या पृष्ठभूमीवर युएईसारख्या अनेक देशांकडून भारताला जो सन्मान मिळत आहे, तो लक्षणीय आहे. पाकिस्तानच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. ज्या इम्रान खान यांना स्वत:चे घर नीट सांभाळता येत नाही, त्यांनी भारतासारख्या शक्तिशाली देशाला धमकी देणे, काश्मीरच्या मुद्याचे धार्मिकीकरण करणे, या बाबी निव्वळ हास्यास्पद आहेत. पाकिस्तान कसा बेईमान देश आहे, दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठीच्या लढाईत कसा नुसता देखावा करतो आहे, हे आता जगाला कळून चुकले आहे. मध्यंतरी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथिंसग यांनी जे विधान केले होते, ते तर पाकिस्ताच्या वर्मावर बोट ठेवणारेच होते. आता काश्मीरप्रश्नी पाकिस्तानशी चर्चा करायचीच असेल तर ती त्यांनी बळकावलेल्या प्रदेशाबाबत केली जाईल, भारताचा अविभाज्य घटक असलेल्या काश्मीरवर बोलण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही, अशी जी भूमिका घेतली आहे, त्यामुळे पाकिस्तान घाबरला आहे. भारताकडून केव्हा हल्ला केला जाईल आणि आपण बळकावलेला काश्मीरचा प्रदेश कधी हातचा निसटून जाईल, या भीतीपोटी पाकिस्तानी पंतप्रधान आणि तिथले नेते बरळत सुटले आहेत. भारताने आगळीक केलीच तर उत्तर द्यायला समर्थ आहे, अशी दर्पोक्ती पाकने केली आहे. पाकिस्तानला भारताच्या ताकदीचा अंदाज आधीच आला आहे. विशेषत: बालाकोटवर हल्ला करून तेथील अतिरेक्यांचे अड्डे भारतीय वायुसेनेने उद्‌ध्वस्त केल्यापासून तर पाकिस्तान बिथरला आहे, घाबरलाही आहे. पाकिस्तानातील राजकारण हे भारतद्वेषावरच चालते हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे स्वत:चे सरकार टिकविण्यासाठी इम्रान खान यांच्याकडून सतत भारताला धमक्या दिल्या जातात. पण, ह्या सगळ्या धमक्या पोकळ आहेत आणि त्यात दम नाही, हे स्वत: इम्रानलाही माहिती आहे. शिवाय, भारताच्या बाबतीत काही ना काही बोलत राहायचे, देशातील जनमत भडकवत राहायचे म्हणजे आपली राजकीय पोळी नीट शेकली जाते हे इम्रान खान यांना चांगले ठाऊक आहे. त्यातूनच ते आता शेवटची धडपड करीत आहेत. यापुढे पाकिस्तानने भारताची खोडी काढली तर त्याचे परिणाम काय होतील, याबाबत ते जागरूक आहेत. त्यामुळे केवळ खोट्या प्रतिष्ठेसाठी आणि देशातील जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठीच इम्रान खान भारताला धमकावण्याची भाषा करीत आहेत, हे समजून घेतले पाहिजे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत भारताची भूमिका स्पष्ट शब्दात मांडल्याने आता मोदींच्या भूमिकेविषयी संशय घेणारे भारतीय राजकारणातील त्यांचे विरोधकही उघडे पडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नरेंद्र मोदींना झोडपून काढताना देशहिताचे भान विसरलेले कुपमंडूक वृत्तीचे राजकीय विरोधक आता काश्मीरच्या मुद्यावर पुन्हा मोदींच्या विरोधात बोलतील तर जनताच त्यांना जोडे मारल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
ज्याप्रमाणे मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरीची चुणूक दाखवत पाकिस्तानला एकाकी पाडले, त्याचप्रमाणे ट्रम्प आणि अन्य सर्व जागतिक नेत्यांकडून 370 रद्द करण्याच्या भूमिकेला समर्थन मिळविले. सोबतच मोदींनी देशांतर्गत राजकारणात सक्रिय असलेल्या पण, सदैव देशविरोधी भूमिका घेणार्‍या विरोधकांनाही उघडे पाडले आहे. वास्तविक, कलम 370 ही एक ऐतिहासिक चूक होती. काळाच्या ओघात ती चूक आपण सत्तर वर्षे कायम ठेवली. नेहरूंनी केलेली चूक मोदींनी दुरुस्त केली हे मान्य केले तर राजकारणातील आपली सद्दी संपेल या भीतीपायी कॉंग्रेसची गाळण उडाली आहे. स्वत:ची चूक झाकण्यासाठी आणि मोदींना व भाजपाला राजकीय फायदा मिळू नये यासाठी कॉंग्रेस पक्ष कारण नसताना बदनाम करत आहे. असे करताना आपण देशहित नजरेआड करतो आहोत याचेही भान त्यांना राहिलेले नाही, हे दुर्दैवीच होय. काहीही असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या कार्यकाळात जगभरातील प्रमुख देशांचे दौरे करून जे मित्र तयार केले, त्याचा फायदा आता अनुभवास येत आहे. मोदी आज जागतिक नेत्यांच्या पंक्तीत मानाचे स्थान मिळवून बसले आहेत आणि विरोधक गाळात फसतच चालले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.