दुरावलेला निसर्ग

    दिनांक :29-Aug-2019
नितीश गाडगे 
 
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा सर्वात बुद्धिमान प्राणी. इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त बुद्धिमत्ता असल्याने तो पृथ्वीवर अधिराज्य गाजवतोय्‌. बुद्धी चातुर्याचे निसर्गदत्त वरदान मनुष्याला मिळाल्याने त्याने विज्ञान आणि अध्यात्माचे अनेक पैलू उलगडले खरे, पण तरीही आज जगातल्या या सर्वात बुद्धिमान प्राण्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. पृथ्वीवर एकटा माणूस सोडला तर प्रत्येक घटक हा निसर्गाच्या नियमांचे पालन करतो. माणसासारखे बुद्धी चातुर्य न लाभणे हे कदाचित त्यांच्यासाठी वरदान असावे. जे पेराल तेच उगवेल हा निसर्गाचा सगळ्यात सरळ साधा नियम आहे. असे असतानाही माणूस मात्र हा नियम सपशेल विसरलेला आहे. 

 
 
आपल्या वाटेला येत असलेले भोग विशेषतः वाईट भोग हे अकारण आणि न केलेल्या चुकीची शिक्षा असल्याची तक्रार न करणारा कदाचित भेटेल. निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवेल! असे असताना निसर्गाने हा नियम फक्त माणसासाठी बदलविला का? पूर्वी केलेल्या कर्माचे फळ भविष्यात भेटणे निश्चित आहे. कुठलेही काम करताना त्या होणारे परिणाम लक्षात घेत कुठलाही निर्णय घेणे किंवा एखादे काम करणे खरंच इतके कठीण आहे का ? की निसर्गाचा नियम लागू न होण्याइतपत माणूस स्वतःला महामानव समजू लागला आहे? निसर्गाच्या नियमांची पुरचुंडी बांधून माणूस आता त्याने तयार केलेल्या नियमांवर चालतोय्‌. त्याचे नियम हे निसर्गाच्या नियमांपेक्षा वेगळे आहेत. घातकही आहेत.
 
माणसाने स्वतःच्या सुखसोयीसाठी इतकी प्रगती केली केली की आता तो पिण्याचे पाणी विकत घेतो . दिल्लीमध्ये तर शुद्ध हवा सुद्धा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. निसर्गाच्या नियमांना धरून चालणारे इतर प्राणी मात्र या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ आहेत. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन माणसाने केलेली ही प्रगती ? की अधोगती ? या बद्दल प्रत्येकाचे मतं वेगवेगळे असू शकतात. असे असले तरी, एक गोष्ट मात्र ठामपणे सांगता येण्यासारखी आहे, ती म्हणजे निसर्गाचे नियम डावलून स्वतःच्या नियमावर चालणारे आपण सर्व जण निसर्गापासून फार दूर लोटले गेलेलो आहोत. विकासाची कास धरत माणसाने इतकी प्रगती केली आहे की, खरोखरचे जंगल पाहण्यासाठी आता त्याला त्याने बनविलेल्या सिमेंटच्या जंगलापासून कोसो दूर जावे लागते. हे सत्य बदलता येण्यासारखे जरी नसले, तरी किमान मान्य करण्यासाठी कुणाला कमीपणा वाटू नये.