चला ‘सोशल’ बनूया !

    दिनांक :29-Aug-2019
सर्वेश फडणवीस
8668541181
 
माणूस हा समाजशील प्राणी आहे, असं आपण जेव्हा म्हणतो. तेव्हा प्रत्येक काळामध्ये किंवा संस्कृतीमध्ये त्याच्या या समाजशीलतेचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला हमखास दिसून येतं. अर्थात काळानुरूप जे काही सामाजिक, आर्थिक बदल होत गेले, त्यानुसार माणसाच्या संस्कृतीही बदलत गेल्या आहेत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल नेटवर्किंग साईटच्या आविष्काराने तर अवघे जग जवळ आले आहे. जगाच्या या टोकावरील व्यक्ती दुसर्‍या टोकावरील व्यक्तीशी क्षणात सवांद साधू शकतो. सर्वात वेगवान प्रसिद्धीसाठी अथवा अभीव्यक्तीसाठी इतकं अप्रतिम व्यासपीठ यापूर्वी कधीच उपलब्ध नव्हतं. आजची पिढी एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी याच माध्यमाचा वापर अधिक करते. तुम्ही तुमच्या अकाऊंटचे मालक! सवांद साधण्याचे पूर्ण स्वातंत्र्य!! कुणी तुम्हाला काहीही करू शकत नाही वा दबावही आणू शकत नाही. एखाद्याचे विचार पटत नसतील तर त्याला आपण सरळ डिलीट करू शकतो. ऐवढ स्वातंत्र्य सोशल मीडियाने आपल्याला दिलं आहे आणि त्यामुळेच ते आज प्रत्येकाच्या गळ्यातील ‘ताईत’ बनले आहे. 

 
 
व्हॉट्स अॅप, फेसबुक, टि्‌वटर आदी प्रभावी सोशल साईटमुळे दिलखुलास अभिव्यक्त होण्याचं एक व्यासपीठ आपल्याला आज सहज मिळालं. त्यावर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रश्नावर तदवतच समाजातील विविध घडामोडीवर वैचारिक मतभेद होऊ लागले. अनेकांना आपले विचार व्यक्त करता येऊ लागले. समाजातील अनेक ज्वलंत समस्यांना या माध्यमातून उपायही निघाले आहेत. इतकेच नव्हे, तर या माध्यमांमुळे काहींचे जीव सुद्धा वाचले. परंतु जसा माध्यमाचा सदुपयोग होतो, तसा दुरुपयोगही होतो. कारण शेवटी एक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे ते स्वत:च्या मर्जीनं चालणारं नाही. त्या तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करतो, यावरच त्याचा उपयोग ठरणार आहे.
 
आपली जीवन जगण्याची सुलभता अधिक व्यापक करण्यासाठी कालपरत्वे वेगवेगळ्या साधनांचा शोध लागला, मात्र या निर्माण केलेल्या आभासी जगात किती मग्न व्हायचे? याची मर्यादा त्याला न ठरवता आल्याने हेच तंत्रज्ञान आज त्याच्या जीवावर उठू लागले आहे. आज आपण शिकून सवरून सुशिक्षित झालो, परंतु सोशल मीडिया नेमका कसा हाताळावा, त्यातून काय करावं आणि मुख्य म्हणजे काय टाळावं, हे अजूनही आपल्याला समजलेलं दिसत नाही. त्यामुळेच सुशिक्षितांकडून अशिक्षितांसारखा या मीडियाचा वापर केला जात असल्याचे प्रकर्षानं जाणवत आहे. हे फक्त आपल्याकडेच होत नाही तर परदेशातही या मीडियाचा गैरवापर केल्याच्या घटना दररोज घडतात. हत्या करून त्याचे अपडेट सोशल मीडियावर टाकण्यापासून ते दंगली भडकविण्याच्या भडक पोस्ट टाकल्याची अनेक उदाहरणे यासाठी देता येतील. सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांना आपण काय करतो, याचे भान राहलेले नाही. आज सकारात्मक विचारांसाठी हे भान राखणे महत्त्वाचे आहे.
 
मुळात सोशल मीडियाला गेटकीपर नाही. त्यामुळे प्रत्येक जण त्याला हवे तसे प्रकट होतो आणि यातून मग समाजासमाजात द्वेष, विकृती पसरविली जाते. याला बंधन घालण्यासाठी आयटी अॅक्टचीही निर्मिती करण्यात आली, परंतु सोशल माध्यमांना देशाच्या सीमेत बांधून ठेवता येत नसल्याने तोही कुचकामी ठरत आहे. तसेही कायद्याने कुठल्याच गुन्हेगारीला आजपर्यंत पायबंद घालता आलेला नाही. सायबर क्राईमला तर मर्यादाच नाहीत. त्यामुळे या तंत्रज्ञानाला कसे नियंत्रित करणार.
 
सोशल मीडिया हे ‘सोशल’ होण्याचं प्रभावी साधन आहे. वर्षांन्‌ वर्षे न बोललेली माणसे या निमित्ताने परत संपर्कात येतात. लांब अंतरावर असलेली माणसे सहज एकमेकांशी संपर्क साधू शकतात. आपले आनंद -दुःख वाटू शकतात. चांगले विचार मांडू शकतात, जनजागृती घडवू शकतात. हे जनसंपर्काचे प्रभावी माध्यम आहे. ही आपली जबाबदारी आहे, की आपण या माध्यमात कसे व्यक्त व्हावे. या मीडियावर आलेल्या बातमीचा किंवा पोस्टचा किती परिणाम करून घ्यायचा. आलेल्या पोस्टची आधी शहानिशा करावी, त्यात किती तथ्य आहे ते पाहावे मग कृती करावी. धामिक तेढ, व्यक्ती द्वेष, धर्मद्वेष, वर्णद्वेष, अश्लीलता पसरविणार्‍या पोस्ट पासून आपण दूरच राहिले पाहिजे, आपल्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. कारण ‘सोशल मीडिया’ हा ‘सोशल’ होण्यासाठी आहे. ‘अॅन्टी सोशल’ होण्यासाठी नाही...
 
आपण आपल्या जबाबदारीचे पूर्ण भान ठेवून याचा वापर करावा. कायम सकारात्मक विचार व व्यक्त होण्याचे हेच आज प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातूनच आज अनेक नावीन्यपूर्ण विचार बघायला मिळतात आहे. सर्वांचे कल्याण व्हावे, हीच आज काळाची गरज आहे.