रानू मंडलचे बॉलिवूडशी जुने कनेक्शन

    दिनांक :29-Aug-2019
सोशल मीडिया एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कशाप्रकारे बदलतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे रानू मंडल. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणं गाणाऱ्या रानू यांनी आपल्या सुरेल आवाजाने नेटकऱ्यांची मनं जिंकली आणि त्यांचा व्हिडीओ अल्पावधीतच तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे रानू रातोरात स्टार झाल्या. संगीतकार-गायक हिमेश रेशमियासाठी त्यांनी पार्श्वगायन केलं तर अभिनेता सलमान खानने त्यांना घर दिलं. पण हे फार क्वचित लोकांना माहित असेल की, सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या रानू यांचं बॉलिवूडशी फार जुनं कनेक्शन आहे.


 
 
अभिनेते फिरोज खान यांच्या घरी रानू मोलकरीण म्हणून कामाला होती. फिरोज खान यांच्या घरी साफसफाई, स्वयंपाक करण्याचं काम रानू करत होत्या. याबद्दल त्यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितलं. त्यांच्याकडे काम करत असताना रानू गुणगुणत असत. तेव्हा फिरोज यांनीसुद्धा रानू यांच्या सुरेल आवाजाची स्तुती केली होती.
”फिरोज खान खूप चांगले व्यक्ती होते. ते नेहमीच सगळ्यांना मदत करायचे. मी मुंबईत असताना त्यांनी माझी आणि पतीची खूप मदत केली होती. माझी हिंदी सुधारण्यासाठीही त्यांनी मदत केली,” असं त्या म्हणाल्या.
रानू यांना पहिल्यावहिल्या गाण्यासाठी हिमेशने जवळपास सहा ते सात लाख रुपये मानधन दिले आहे. इतकंच नव्हे तर नेहमी अनेकांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या सलमान खानने रानू यांना देखील मदत केली आहे. सलमानने डोक्यावर छत नसणाऱ्या रानू यांना ५५ लाखांचे घर भेट म्हणून दिले असल्याचे म्हटले जात आहे.