सत्तेत असू किंवा नसु” शिवसेना शेतकर्‍यांच्या सदैव पाठीशी - आदित्य ठाकरे

    दिनांक :29-Aug-2019
कारंजात जनआशिर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत
शेतकरी युवक युवतींशी साधला संवाद
 
कारंजा लाड,
जनआशिर्वाद यात्रा ही गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार्‍या मतदारांचे आभार मानण्याकरिता तर मतदान न करणार्‍यांचे मने जिंंकण्यासाठी तसेच नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी काढण्यात आल्याचे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कारंजा येथे 28 ऑगस्ट रोजी केले.
मतदार राजाचे आभार मानण्यासाठी आणि त्यांची मने जिंकण्यासाठी शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. या यात्रेच्या तिसर्‍या टप्प्याला विदर्भातील नागपूर येथून 27 ऑगस्ट रोजी सुरूवात झाली. 27 ते 31 ऑगस्ट या दरम्यान सेनेची जनआशिर्वाद यात्रा विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना भेटी देऊन त्या जिल्ह्यातील विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
शिवसेनेची ही जनआशिर्वाद यात्रा 28 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजता कारजा बायपास परिसरातील झाशी राणी चैकात दाखल होताच शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड क्रमांक 2 मध्ये जाहीर सभा पार पडली. त्यापुर्वी सदर परिसरात उभारलेल्या रयतेच्या राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार भावना गवळी, पालकमंत्री संजय राठोड, माजी आमदार प्रकाश डहाके, आमदार गोपीकिशन बजोरिया, जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, तालुका प्रमुख, शहर प्रमुख कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, कारंजा खरेदी विक्री केंद्राच्या संचालकांसह नगरसेवक, महिला पदाधिकारी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

 
 
या जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या कामांशी एकनिष्ठ राहून पुन्हा भगवा फडकविण्याचा विजय संकल्प आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. त्यांनी आपल्या 19 मिनिटांच्या मनोगतात शेतकर्‍यांच्या समस्या, कर्जमाफी, पिकविमा, बेरोजगारी, जागतिक मंदी, याविषयी बोलून यावर उपाय काढण्यासाठी शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. शिवाय शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी होणारच आणि समस्या ह्या जीवनात येतच असतात. त्यामुळे समस्यांना सामोरे जा मात्र जीवाचे बरे वाईट करण्याचा विचार मनात आणू नका असे आवाहन उपस्थित शेतकायांना केले.
जनआशिर्वाद यात्रेदरम्यान पारंपारिक वेशभुषा परिधान करून युवतींनी आदित्य ठाकरे यांचे केलेले औक्षण, ढोल पथकांच्या ढोलांचा नाद, रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळा अनावरणावेळी उपस्थितांनी केलेला जय भवानी जय शिवाजीचा जयघोष, महिलांची उपस्थिती, हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. रात्री 9 वाजता आदित्य ठाकरे यांचे होणारे आगमन झाले. तरी शिवसेनेवरील प्रेमापोटी कार्यक्रमाला कारंजा, मानोरा, मंगरूळनाथ, वाशीम, रिसोड व मालेगाव येथील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसहीत शिवसैनिकांची भरगच्च उपस्थिती होती.