लढवैय्या गुंजन सक्सेना यांच्या भूमिकेत जान्हवी कपूर

    दिनांक :29-Aug-2019
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’चे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून चित्रपटाच्या प्रदर्शनाती तारीखही समोर आली आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने जान्हवी कपूरच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. पोस्टरमध्ये जान्हवी कपूरने रंगीबेरंगी स्वेटर परिधान केले असून हसत कागदाचे विमान उडवत आहे.
  
 
 
हे पोस्टर शेअर करत करण जोहरने ‘मुली वैमानिक होऊ शकत नाही असे तिला सांगण्यात आले होते. परंतु ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली आणि आज पहिली महिला वैमानिक ठरली. गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल हा चित्रपट १३ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे’ असे कॅप्शन दिले आहे.
 
 
गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल या चित्रपटात जान्हवी कपूरसह पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीता कुमार आणि मानव विज हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करत आहेत. अंगद चित्रपटात जान्हवीच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. कारगिल युद्धात गुंजन फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. त्यामुळे त्यांची ही साहसाची गाथा चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
 
 
 
पहिल्यांदा जान्हवी एका धाडसी महिलेची भूमिका साकारणार असून तिला या भूमिकेमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. धडकमध्ये जान्हवीने वठविलेली भूमिका आणि करणच्या या आगामी चित्रपटातील भूमिका पूर्णपणे वेगळी असल्यामुळे जान्हवीला या भूमिकेसाठी फार मेहनत घ्यावी लागली होती.