बसची दुचाकीला धडक; दोन ठार

    दिनांक :29-Aug-2019
 
 
 
 
कारंजा - दारव्हा मार्गावरील घटना
 
कारंजा लाड, 
एसटीने दुचाकीला दिलेल्या धडकेत  एक जण जागीच ठार तर दुसर्‍याचा अमरावती येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना  कारंजा दारव्हा मार्गावरील 132 केव्ही वीज केंद्राजवळ 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार, एमएच 29 डी 9595 क्रमांकाची दुचाकी कारंजाकडून दारव्ह्याकडे जात असतांना दुचाकीच्या आडवा कुत्रा आल्याने दुचाकी चालकाने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे मागून येणारी एमएच 6 एस 8927 क्रमांकाची अकोला - पांढरकवडा ही बस दुचाकीला धडकली. या धडकेत प्रकाश सदाशिव ठक (वय 50) रा. रामगाव रामेश्‍वर हे जागीच ठार झाले तर पप्पु मेकॅनिकल रा. कारंजा यांचा अमरावती येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मानव सेवा हेल्पलाईनच्या सदस्यांनी जखमी व्यक्तीला उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे रवाना करण्यात आले.
अमरावती येथे उपचारा दरम्यान जखमी पप्पु मेकॅनिकलचा मृत्यू झाला. दरम्यान कारंजा शहर पोलिसांनी मृतकाचे काका पवन रमेश ठक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास ठाणेदार एस. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनात गजानन ढिसळे करीत आहे.