श्रावणातील वार विशेष

    दिनांक :03-Aug-2019
 
1 ऑगस्ट पासून हिंदू श्रावण महिना सुरू झाला आहे. हा व्रते, अनुष्ठाने, उपवास आणि सणवार या साठी अत्यंत गजबजलेला महिना आहे. चार्तुमासातला अत्यंत महत्त्वाचा असा हा महिना आहे. या महिन्यातील प्रत्येक वार हा काहीतरी विशेष असतो. आठवड्यातील सातही दिवसांना आपले एक महत्त्व आहे. ऐरवी बुधवारला तसे काही नसते मात्र श्रावणात बुधवारचेही आपले महत्त्व आहे. तर पाहुया आठवड्यातील प्रत्येक वाराचे श्रावणी महत्त्व. 

 
  • रविवार : श्रावणातील प्रत्येक रविवारी गभस्ती नावाच्या सूर्याचे पूजन करण्यास सांगितले आहे. हे पूजन मौनाने करावे, असेही शास्त्रात सांगितले आहे.
  • सोमवार : श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवांचे पूजन करण्यास सांगितले आहे. तसेच प्रत्येक सोमवारी शिवमुठ नावाचे व्रत करावे. हे व्रत विवाह (लग्न) पश्चात पाच वर्षे करावे. सोमवारी एकभुक्त (एक वेळ जेवण) राहून शिविंलगाची पूजा करावी. प्रत्येक सोमवारी धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या. जे धान्य घेणार त्याच्यापैकी तांदूळ असल्यास त्याचा एक दाणा रुप्याचा व इतर ध्यान्यामध्ये एक सोन्याचा दाणा अर्पण करावा. मूठ वाहताना म्हणावयाचा मंत्र असा
                                                             नम: शिवाय शान्ताय पञ्चवक्त्राय शूलिने ।
शृङगभङ्‌गिमहाकालगणयुक्ताय शम्भवे । ।
पहिल्या सोमवारी -तांदूळ, दुसर्‍या तीळ, तिसर्‍या मूग, चौथ्या जवस, पाचव्या सातू अशा मुठी वाहत असतात. या व्रताची पाच वर्षे झाल्यावर उद्यापन करतात.
  • मंगळवार : श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगलागौरी यांचे व्रत केले जाते. हे व्रत नवोढा (नवविवाहित) मुलींचे नित्य आहे. विवाहानंतर 5 किंवा 7 वर्षे हे व्रत करतात. या व्रताच्या देवता शिव, गणेश यांचे बरोबर गौरी आहे. पूजनाचा मंत्र असा-
पुत्रान्‌ देहि धनं देहि सौभाग्यं देहि मङले । अन्यांश्च सर्वकामांश्च
देहि देवि नमोऽऽस्तुते । ।
पूजन झाल्यावर या व्रताची कहाणी ऐकावी.
  • बुधवार : महाराष्ट्रात श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुध बृहस्पती पूजनाचे व्रत केले जाते. बुध बृहस्पतीचे (गुरू) चित्र घेतात किंवा रेखाटतात. त्यांची पूजा करतात. दही भाताचा नैवेद्य दाखवतात. सात वर्षांनंतर काही स्त्रिया याचे उद्यापन करतात.
  • गुरुवार : श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी बृहस्पती पूजन करण्यास सांगितले आहे. यांची देवता बृहस्पती (गुरू) आहे.
  • शुक्रवार : श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका पूजन करण्यास सांगितले आहे. ही बालसंरक्षक आहे. पहिल्या शुक्रवारी केशर किंवा गंधाने भिंतीवर जिवंतिकेचे चित्र काढतात. आता सर्वत्र छापील चित्र मिळते. जिवंतिकेचे ध्यान असे आहे 
जरे जिवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनि ।
रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोऽस्तुते । ।
 
जीवंतिकेची पूजा करून देवीला ओवाळतात. व देवीची प्रार्थना करतात. ‘अक्षतां निक्षिपाम्यम्ब यत्र मे बालको भवेत्‌ । तत्र त्वया रक्षणीयो जीवन्ति करूणार्णवे !!’ हे करूणामयी माते मी जिकडे अक्षता टाकते, त्या दिशेला असणार्‍या माझ्या बालकाचे तू रक्षण कर... अशी ही प्रार्थना माता आपल्या अपत्यांसाठी करत असते. आपल्या इकडे जरा -जिवंतिका म्हणतात. यात जरा ही देवीसुद्धा बालकांची रक्षण करणारी आहे .
  • शनिवार : श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी शनीपीडेचा त्रास होऊ नये म्हणून हे व्रत केले जाते. शनीची लोखंडाची मूर्ती बनवावी व पंचामृती पूजा करावी. शनीच्या कोणस्थ, पिंगल, बभ्रू, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरी शनैश्र्चर आणि मंद या नावांचा जप करावा. उडीद-तांदूळाची खिचडी करावी, पायस, आंबिल, पुर्‍या यांचा नेवैद्य अर्पण करावा.
या व्रताचा पर्याय : प्रत्येक शनिवारी लक्ष्मी-नृसिंह, शनी, हनुमान यांची पूजा करावी. मारूतीला रुईच्या पानांची माळ अर्पण करावी. लक्ष्मी नृसिंहाप्रित्यर्थ ब्राह्मण सवाष्ण भोजनाला बोलवावे. शनीप्रित्यर्थ सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करावी. मुंज्या मुलाला अभ्यंगस्नान व भोजन द्यावे. एकभुक्त राहावे. श्रावणातील शनिवाराला संपत शनिवार म्हणतात.