हे सरकार तुमचं आहे, जनादेश द्या पुन्हा येणार!

    दिनांक :03-Aug-2019
धानाला पुन्हा 500 रुपये बोनस देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

भंडारा,
पाच वर्षात आम्ही जे केलं ते फक्त जनतेसाठी केलं. काम करताना आपलं साम्राज्य आम्ही उभे केलं नाही. हे सरकार तुमचं आहे, जनसामान्यांची कामे करण्यासाठी. गाव असो वा शहर विकास कामाचा ओघ प्रत्येक ठिकाणी प्रवाहित केली. पुढेही करीत राहणार. मागील पाच वर्षापासून सतत आम्ही धानाला बोनस देत आहोत. मागच्या वर्षी पाचशे दिला. आगामी काळातही धानाला 500 रुपये बोनस देऊ अशी जिव्हाळ्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा येथील जाहिर सभेत केली.
मोझरी येथून निघालेली महाजनादेश यात्रा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्ह्यात पोहचली. यावेळी येथील शिवाजी क्रिडा संकूल परिसरात आयोजित विशाल जाहिर सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
सुरवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पाक्षिक मनोगत’ च्या मोबाईल अ‍ॅपचे विमोचन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक करताना जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके यांनी विविध मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या. भंडारा जिल्ह्यातील लोक प्रामाणिक आहेत. एक-दोन स्वार्थी असलेले लोक निघून गेले. त्यामुळे या जिल्ह्यातील जनता आपल्या पाठिशी असून जिल्ह्याच्या विकासासाठी आपली मदत सतत अपेक्षित असल्याचे फुके यांनी सांगितले.

 
 
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, भंडा-यातील अभूतपुर्व स्वागताने मी भारावून गेलो आहे. पाच वर्षात सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे अनेक निर्णय आम्ही घेतले. आमच्यासाठी समोर बसलेली प्रजा हीच आमचा राजा आहे. या राज्यासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी मी आज येथे आलो आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने पंधरा वर्षात जेवढी कामे केली नाहीत, त्यापेक्षा कितीतरी अधिक कामे आम्ही पाच वर्षात करून मोकळे झालो. आज विरोधकांकडे विरोध करायला मुद्दा नाही, म्हणून ईव्हीएम चा मुद्दा करून रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. आम्ही सामान्य लोकांसाठी आंदोलन करतो आणि विरोधक ईव्हीएमसाठी आंदोलन करण्यासाठी पुढे येत आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सिंचनाचा व्याप वाढविण्याचा प्रयत्न केला. गोसेखुर्दची सिंचन क्षमता पुढील वर्षी एक लाखापर्यंत पोहचविणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. दुर्लक्षित असलेल्या विदर्भाकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक होत असून भविष्यात होत असलेले तणसापासून इथिनॉल निर्मितीचा प्रकल्प याचाच भाग आहे. या प्रकल्पामुळे प्रचंड प्रमाणावर रोजगार मिळणार असल्याचे सांगताना आजच निर्धारित करण्यात आलेली जागा केंद्राच्या पेट्रोलिअम कंपनीला हस्तांतरीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
शेतकरी हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कधीही कमी पडणार नाही. सलग पाच वर्षापासून धानाला बोनस देत आलो आहोत. येत्या वर्षातही धानाला 500 रुपये बोनस देणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी करताच उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवून स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चैतन्य उमाळकर तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष चंद्रशेखर रोकडे यांनी केले. सभेपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पेट्रोलपंप ठाणा येथे उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. हजारोच्या संख्येने जनसमुदाय स्वागतासाठी उभा होता.
...मग, देणार ना जनादेश!
सतत पाच वर्षापासून तुमच्यासाठीच काम करत आलो. पुढेही काम करीत राहणार आहे. जे करेल, ते जनतेसाठी असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायाला देणार ना जनादेश? असा प्रश्न करताच उपस्थितांनी तेवढ्याच उत्स्फुर्तपणे होकार देत टाळ्या वाजवून मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला सकारात्मक प्रतिसाद दिला. जनादेश घेऊन जातोय, पुन्हा सरकार स्थापन करून आशिर्वाद घ्यायला येईल, असेही जाताना सांगण्यास ते विसरले नाही.