"...अन्यथा निवडणुकांवर ब्राह्मण समाजाचा बहिष्कार"

    दिनांक :03-Aug-2019
नागपूर, 
आचारसंहितेपूर्वी ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करा. अन्यथा विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालावा लागेल. राज्यात ५० विधानसभा मतदारसंघ असे आहेत की तेथे ब्राह्मण मते निर्णायक ठरू शकतात, असा गर्भित इशारा समस्त ब्राह्मण समाज समन्वय समितचे विश्वजित देशपांडे यांनी आज मुख्यमंत्र्यांना दिला. 
 
 
नागपुरातील समस्त ब्राह्मण समाजातर्फे संविधान चौकात घंटानाद व शंखनाद आंदोलन करण्यात आले. घंटानाद, शंखनाद तसेच भारत माता की जय, जय परशुराम, हम सब एक है, इन्कलाब जिंदाबाद आदी घोषणांना हा परिसर दणाणून सोडला. शेकडो विविध भाषक ब्राह्मण पुरोहित, तरुण-तरुणी, पुरुष, महिलांनी तसेच संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदवित समस्त ब्राह्मण एकजुटीचे दर्शन घडविले.
 
एका मोठ्या व्यासपीठावर घंटा लावण्यात आली होती. व्यासपीठाच्या मागील पडद्यावर भगवान परशुरामाचे छायाचित्र होते. शिवाय उपस्थित ब्राह्मण बंधू-भगिनींनी झांज, शंख आणले होते. घंटानाद व शंखनाद करून या सर्वांनी समस्त ब्राह्मण समाज एकजूट झाला असल्याची पावती दिली. आंदोलन सुरू होताच पावसानेही काही क्षण उपस्थित दर्शवत आंदोलनात सहभाग दर्शविला, हे विशेष.
 
स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ, पुरोहितांना मानधन, महापुरुषांच्या बदनामीविरोधी कायदा, वर्ग २ जमिनी वर्ग १ करण्यासाठी कायदा, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार, दादोजी कोंडदेव व राम गणेश गडकरी यांचे पुतळे सन्मानाने प्रस्थापित करणे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे श्रीवर्धन येथील स्मारकाचे काम पूर्ण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकर व्हावे, शनिवार वाड्यात श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या ४४ लढ्यांचे युद्ध स्मारक निर्माण करणे, या मागण्यांसाठी आजचे आंदोलन होते.
 
याप्रसंगी झालेल्या प्रमुख भाषणात विश्वजित देशपांडे यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला होता वगैरे आजवर ब्राह्मणांबद्दल, पेशवाईबद्दल, सावकरांबद्दल अनेक कपोकल्पित, खोटे-नाटे पसरविले गेले. मात्र, आता खुप झाले. ब्राह्मण वा हिंदूंवरील अन्याय आता बस झाला. आता समस्त ब्राह्मण समाज एकजूट झाला आहे.
 
जानेवारीत मुंबईत झालेल्या धरणे आंदोलनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्या तत्वतः मान्य केल्या होत्या.
मात्र, आजपर्यंत त्यावर कुठलीच पावले उचलली गेलेली नाहीत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करा. अन्यथा विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालावा लागेल. राज्यात ५० विधानसभा मतदारसंघ असे आहेत की तेथे ब्राह्मण मते निर्णायक ठरू शकतात, असा गर्भित इशारा देशपांडे यांनी दिला.