शेफ पराग कान्हेरे पुन्हा येणार

    दिनांक :03-Aug-2019
‘बिग बॉस मराठी पर्व २’च्या घरातील सर्वात जास्त चर्चेत असणार आणि सर्वात स्ट्राँग स्पर्धक म्हणून पराग कान्हेरे ओळखला जात होता. परागने घरातील स्पर्धकांना त्याचा जेवणाने खूश केले होते तर प्रेक्षकांचे त्याच्या वर्तवणुकीमुळे मनोरंजन केले होते. परंतु एका टास्कदरम्यान परागने नेहासोबत गैरवर्तन केल्याने त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले.
 
 
काही दिवसांपूर्वी परागने सोशल मीडियावर ‘येतोय मी. आता सगळ्यांचा हिशोब होणार. तू, तो आणि ती पण जाणार’ असे लिहित एक पोस्ट लिहिली होती. त्याच्या या पोस्टवरुन पराग बिग बॉसच्या घरात परत येणार असल्याचे म्हटले जात होते. पण परागने नुकताच केलेल्या एका पोस्टवरुन सर्वांचा गैरसमज दूर केला आहे. तो बिग बॉसच्या घरात परतणार नसून त्याची नवी वेब सीरिज येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही वेब सीरिज किचनसूत्रा या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.
‘मी येणार… सगळ्यांबद्दल बोलणार… असे काही दिवसांपूर्वी मी पोस्ट केले आणि त्याचा सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने अर्थ लावला… असो… मी येणार म्हणता म्हणता तो दिवस येऊन ठेपलाय… मी येतोय माझ्या किचनसूत्रा या चॅनेलवर एक अनोखी सिरीज घेऊन… हॅशटॅग कूक विथ पराग कान्हेरे… थोड्याच वेळात पहिला एपिसोड तुमच्या भेटीला येईल… प्यार की खिचडी….’ असे परागने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
नेहा शितोळेसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपानंतर परागला बाहेरचा रस्ता दाखवला होता. पराग घरातून गेल्यानंतर सोशल मीडियावर त्याला परत आणण्याची चर्चा सुरू झाली होती. ‘BringBackParag’ हा हॅशटॅगसुद्धा ट्विटरवर ट्रेण्ड होत होता.