‘कॉफीकिंग’चा दुर्दैवी अंत!

    दिनांक :03-Aug-2019
चौफेर  
 सुनील कुहीकर 
  
अंत दु:खद, दुर्दैवी, हृदयद्रावक अन्‌ वेदनादायी असला, तरी त्यांच्या इथवरच्या प्रवासाची संघर्षमय गाथा मात्र प्रेरणादायी आहे. एखाद्या सर्वसामान्य घरातला पोरगा हजारो कोटी रुपयांचे साम्राज्य निर्माण करू शकतो, हा दुर्दम्य विश्वास त्यांनी केवळ सार्थ ठरवला नाही, तर कर्तबगारीतून सिद्ध करून दाखवला. एरवी, ‘एक माणूस होता. तो खूप गरीब होता’ अशा कुठल्याशा कहाणीत अन्‌ दारिद्र्याशी चाललेल्या त्याच्या संघर्षातच रमणारा समाज आपला. त्याला अर्थार्जनाची ही सरळमार्गी सुरस कथा तशी नवलाईचीच! पचनी पडणारी तर अजीबात नाही. पण, वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी मुंबईतील एका अर्थविषयक कंपनीत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झालेला हा तरुण, नंतरच्या काळात बंगळुरूत परततो अन्‌ वडिलांनी दिलेल्या प्राथमिक भांडवलातून स्वत:ची एक फायनान्स कंपनी स्थापन करतो. स्वत:च्या मेहनतीच्या बळावर सुरुवातीचे स्थानिक पातळीवरचे त्याचे स्वरूप बदलून ‘वे टू वेल्थ’ नावाची कंपनी तयार करण्यापर्यंतची त्याची मजल तशीच कौतुकास्पद असते.
 
दरम्यानच्या काळात 1994 मध्ये ‘कॅफे कॉफी डे’ हा भारतीय शहरांमधून प्रचलित पावलेला अत्याधुनिक पद्धतीचा, फेसाळलेल्या कॉफीपासून तर चवदार सॅण्डवीचपर्यंत अन्‌ दिमाखदार आसनव्यवस्थेपासून तर इंटरनेटपर्यंतच्या बाबी उपलब्ध असलेला कॉफीशॉपचा भारतीय उद्योग साखळीस्वरूपात उभारण्यात त्यांना आलेलं यश तर कौतुकानं जीव ओवाळून टाकावा इतकं दिव्य. पण, कुठे काय चुकलं कुणास ठाऊक, नियतीनं वेगळाच डाव मांडला आणि आयुष्याचा डाव अर्ध्यावरच संपला. भारतातल्या निदान अडीचशे शहरांमधून ‘कॅफे कॉफी डे’चे किमान पावणेदोन हजार कॉफी शॉप्स उघडून ते यशस्वीपणे चालवण्याची, त्यातून चार हजार कोटींची उलाढाल साकारण्याची किमया सिद्ध करणारे व्ही. जी. सिद्धार्थ यांचे गेल्या पंधरवड्यात आधी बेपत्ता होणे आणि नंतर नेत्रावती नदीच्या पात्रात त्यांनी उडी घेतल्याचे स्पष्ट होणे, होगी बाजारच्या समुद्रकिनारी त्यांचा मृतदेह गवसणे... एकूणच, नखशिखान्त हादरवून टाकणारा हा सारा घटनाक्रम होता.

 
 
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई, ही बिरुदावली त्यांना त्यांची प्रतिमा अधिक उंचावर नेण्यास साह्यभूत ठरली, हे वास्तव नाकारण्याचे कारण नाही. पण, मुळातच हे व्यक्तिमत्त्व उद्यमी होतं. घरची पार्श्वभूमी उद्योजकांची नसतानाही त्या माणसानं उद्योजक बनण्याचं स्वप्न बघितलं. शर्थीचे प्रयत्न करून ते खरं करून दाखवलं. फायनान्सच्या क्षेत्रातल्या नामवंत कंपन्या उभ्या केल्या. बंगळुरूत पहिले कॉफी शॉप सुरू करून ‘कॅफे कॉफी डे’चा साखळी उद्योग उभारला. वडिलांनी दिलेल्या तीस हजार रुपयांपासून केलेली सुरुवात आजघडीच्या 25 हजार कोटी रुपयांच्या संपदेपर्यंत विस्तारली. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. विश्वासू सहकार्‍यांची टीम उभी केली. सन्मार्गाने पैसा उभा केला. कॉफी पावडर तयार करणारी कंपनी खरेदी केली. स्वत:च्या त्याच कौशल्यातून त्याचीही भरभराटच केली. जगाच्या पाठीवर कोणत्याही उद्योजकाला सतावू शकतील अशा अडचणींचा अपवाद वगळता एकूण वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक आणि औद्योगिक, अशा सर्वच स्तरावर सारेकाही छान सुरू असताना एक दिवस अचानक सिद्धार्थ यांच्या बेपत्ता होण्याची वार्ता वार्‍यासारखी पसरते अन्‌ काही दिवसांतच सारंकाही संपलं असल्याची ग्वाही... सारंच अजब, अतर्क्य...
 
उद्योगांचे इतके मोठे साम्राज्य उभे करणारा, स्वत:च्या उद्यमशीलतेवर ठाम विश्वास असणारा, मेहनतीची तयारी राखणारा, लागतील तेवढे पैसे उभारण्याची ताकद कमावणारा, जिथे स्वत:ची भागीदारी होती, त्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करू शकलेला, एरवी ‘स्टारबक्स’सारख्या अमेरिकन कॉफीशॉपमध्ये बसून कॉफीची चव चाखण्याची कल्पना करू धजणार्‍या भारतीय जनमानसाला झगमगाटात लखलखणार्‍या आल्हाददायी कॉफी शॉपची ओळख करून देणारा, एका राजकीय नेत्याचा जावई असण्यापलीकडे स्वत:ची स्वतंत्र ओळख स्वकर्तृत्वातून साकारणारा, आयुष्याच्या अवघ्या साठ दशकांच्या काळात स्वत:चे आर्थिक साम्राज्य निर्माण करणारा एक हरहुन्नरी माणूस एका क्षणी, स्वत:चे आयुष्य संपवून टाकण्याइतका हताश व्हावा? परिस्थितीपुढे इतके हतबल व्हावे त्याने? काय घडले असेल असे? कंपनीची विस्कळीत आर्थिक स्थिती, शासकीय-प्रशासकीय अधिकार्‍यांची नकारात्मक भूमिका, सध्या आरोप होतोय्‌ त्याप्रमाणे आयकर विभागाच्या वरिष्ठांनी मांडलेला संभाव्य छळवाद, त्याचा भार सहन करू शकत नसल्याची खंत...
 
या बाबीही तर्काच्या कसोटीवर अविश्वसनीय ठराव्यात अशाच. आपल्या देशातली राजकीय, पोलिस, न्याय, प्रशासन अन्‌ पतपुरवठा व्यवस्था कुणाचाही छळवाद मांडू शकते, याबाबत शंका नाही. या तमाम यंत्रणांमधील अधिकार्‍यांना झालेली ग ची बाधा इतकी तीव्र आहे की, स्वत:चा इगो जपण्यासाठी ती कुणालाही, कोणत्याही पातळीपर्यंत तुकवू शकते. संबंधित व्यक्तीचा छळवाद मांडू शकते. व्ही. जी. सिद्धार्थ नावाचे प्रसिद्ध उद्योजकदेखील प्रशासनाने मांडलेल्या त्याच छळवादाचा बळी ठरले असतील, तर यापेक्षा दुर्दैवी बाब दुसरी असू शकणार नाही. या आत्महत्येमागील खरे कारण उघड होईलच कालौघात. पण, या देशाने एक चांगला उद्योजक अकाली, अकारण गमावल्याचे जनामनातील शल्य नामशेष होण्याची शक्यता मात्र दिसत नाही कुठेच. परिस्थिती असो वा मग कुणी अधिकारी, या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या कुणालाच माफ करू नये कुणीच- लोकांनीही अन्‌ नियतीनेही...
 
‘‘आजवरच्या या प्रवासात शक्य होतं ते सर्वस्व देण्याचा प्रयत्न मी केला. मेहनतीत कुठेच कमी पडलो नाही. पण, या क्षणी मात्र मी मनात खंत बाळगून माघार घेतो आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांना मान खाली घालायला लावताना माझ्या मनाला असह्य वेदना होताहेत. देणेकरांची देणी आणि आयकर अधिकार्‍यांकडून मांडला गेलेला छळ... मी केलेल्या चुकांसाठी मीच जबाबदार आहे. पण, आपण सारे मिळून नव्या व्यवस्थापनाच्या नेतृत्वात हा उद्योग जोमाने चालवा. त्याला अजून पुढे न्या...’’
 
हे आणि असले बरेच काही... सिद्धार्थ यांच्या त्या अखेरच्या पत्रातील हळवा, भावनिक संवाद मन सुन्न करणारा आहे. थरकाप उडवणारा आहे. आयुष्यात सर्वच क्षेत्रात कमालीचा यशस्वी ठरलेला, कसब पणाला लावत, ते सिद्ध करीत, असेल तेथून यश खेचून आणण्याची ताकद बाळगणारा निधड्या छातीचा माणूस, सरकारातील कुण्या अधिकार्‍याने चालवलेल्या छळाला कंटाळून थेट आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतो, हा सारा प्रकार अविश्वसनीय सदरात मोडणारा आहे. पण, सिद्धार्थ यांच्या खर्‍याखुर्‍या मृत्यूचे वास्तव तरी कसे नाकारायचे? आता आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी सिद्धार्थ यांच्या ‘त्या’ पत्रातील स्वाक्षरी खरी नसल्याचा खुलासा करीत, स्वत:वरील झेंगट दूर ढकलण्याचा प्रयत्न करणे वगैरे बाबी फारशा सुखावह नाहीत. समर्थनीय तर नाहीच नाही. असल्या प्रकरणात सरकारी अधिकार्‍यांचे काहीच जात नाही. त्यांच्या आडमुठ्या वर्तनाचे, खाबुगिरीचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात. सरकारची नाहक बदनामी त्यातून होते ती वेगळीच.
 
 
या प्रकरणात, इतके मोठे साम्राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण आयुष्यभर ताठ उभे राहात मार्गातील सर्वच प्रसंगांना खंबीरपणे सामोरे जाण्याची हिंमत दाखवणारे सिद्धार्थ, एवढ्यातेवढ्या विपरीत परिस्थितीने जीव देण्याइतके गर्भगळीत झाले असतील, एवढ्या एका संकटापुढे गुडघे टेकत, आपण एक उद्योजक म्हणून अपयशी ठरलो असल्याची ग्वाही त्यांना जगापुढे द्यावीशी वाटली असेल, याची सुतराम शक्यता वाटत नाही. त्यामुळे या मृत्यूचे गूढ उकलले जाणे महत्त्वाचे आहेच. पण त्यासोबतच, एकूणच व्यवस्थेसंदर्भात जे प्रश्न या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपस्थित झाले आहेत, त्याचाही साकल्याने विचार होणे गरजेचे आहे. कारण, अशा रीतीने उमेदीचे उद्योजक गमावणे कुणालाच परवडणारे नाही. विजय माल्या, निरव मोदीसारख्या उद्योजकांना बँकेचे कर्ज बुडवून इथून पळून जाणे सोपे वाटते अन्‌ सिद्धार्थ यांच्यासारख्यांना देणेकरी, आयकर विभागाच्या अधिकार्‍यांच्या ससेमिर्‍याच्या तुलनेत मरण पत्करणे सुलभ होऊन बसते... कुठेतरी काहीतरी चुकत आहे, एवढाच याचा अन्वयार्थ!
 
9881717833