निद्रानाश

    दिनांक :30-Aug-2019
डॉ. नितेश खोंडे
 
आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे आयुर्वेदातील तीन उपस्तंभ. आज आपण ‘निद्रा’ या विषया वर बोलूया. सर्वांनाच विश्रांतीची अवश्यकता असते. चांगली झोप ही उत्तम आरोग्याचे द्योतक आहे; पण आजची बदलत्या जीवनशैलीमुळे निद्रानाशाचा आजार बळावतो आहे. चक्क तरुण क्लिनिकला निद्रानाशाची तक्रार घेऊन येतात तर किती तरी लोक सतत ही तक्रार घेऊन येतात की बेडवर पडल्यावर किती तरी वेळ झोप लागत नाही किंवा येणारी झोप ही शांत नसते. 
 
 
झोपल्याने शरीरात झालेली झीज भरून निघते. शरीराचे कार्य योग्य पद्धतीने होण्यास मदत मिळते. शांत व पुरेशी झोप झाल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो, हृदयाचे ठोके नियंत्रणात राहतात व त्यामुळे हृदय निरोगी राहते. सोबतच तणावाशी निगडित संप्रेरके कमी प्रमाणात स्रवल्या जाते. पुरेशा झोपेमुळे मेंदू दिवसभरातील घटना साठवून ठेवत असल्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रताही वाढते. झोप चांगली झाली की व्यक्ती उत्साही आणि सतर्क रहातो. जास्त प्रथिनांची निर्मिती झाल्याने पेशी, स्नायूंची दुरुस्ती होते. सेरोटोनिन हे नैराश्याशी निगडीत संप्रेरकाचे प्रमाण योग्य असल्याने नैराश्य कमी होण्यास मदत होते तर मानसिक तणावाबरोबर निर्माण होणारे शारीरिक आजार बरे होण्यास किंवा प्रतिबंध होण्यास मदत होते.
 
याउलट ही झोप एक दिवसही अपुरी झाली तर त्याचा परिणाम हृदयाच्या ठोक्यांवर पडतो, मन चलबिचल होते, चित्त जागेवर राहत नाही, कुठल्याही कामात मन लागत नाही, डोळ्यांवर सतत झापड येते, थकवा जाणवतो... म्हणजेच एकंदरीत संपूर्ण दिनचक्र बिघडते. थोडक्यात सांगायचे झाले तर शांत झोप ही एकुणात आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे.
 
निद्रानाशाच्या या चक्रामुळे दिवसेंदिवस शरीरावर किती घात परिणाम होत असेल याची कल्पनादेखील आपण करू शकत नाही.
 
निद्रानाशाची कारणे
मानसिक ताण-तणाव हे निद्रानाश मागील मोठे कारण आहे. कुटुंब, काम, आरोग्य आणि आर्थिक या पातळीवरचे ताणतणाव त्यामुळे मेंदू रात्रीच्या वेळीदेखील क्रियाशीलच रहातो. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी झोप येत नसते.
 
अजीर्ण किंवा रात्री खूप उशिरा जेवल्याने अथवा अधिक खाल्याने वायू पोटात अडून राहतो, त्यामुळेदेखील झोप लागत नाही. त्याशिवाय काही तरी- भलते सलते खाल्याने आम्लपित्ताचा त्रास होत असतो व त्यानेदेखील उत्तम झोप येत नाही.
 
झोपताना टीव्ही, मोबाईल पाहणे, व्हिडिओ गेम्स खेळणे इत्यादींमुळे झोपेच्या चक्रावर वाईट परिणाम होतो. दुपारी अधिक झोपल्यानेदेखील रात्री झोप लागत नाही. काही लोकांच्या बदलणार्‍या ड्युटीज्‌ असतात. अशा व्यक्तींची दैनंदिनी सतत बदलत असते. नोकरीतील वेळापत्रकानुसार त्यांची दिनचर्यादेखील बदलते. खाणे-पिणे, झोप... त्यामुळे शरीरातील चयापचय क्रियादेखील प्रभावित होते. परिणामी निद्रनाशाचा त्रास होतो.
 
काही प्रकारच्या औषधांमुळे झोप न लागण्याची समस्या जाणवू शकते. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा दमा, रक्तदाब यावर दिली जाणारी औषधे ही झोप न येण्यास कारणीभूत ठरतात.
 
तसेच काही आजारांमुळे जसे कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, दमा, पचनसंस्थेशी निगडीत आजार, थायरॉईड, पार्किन्सन्स, अल्झायमर झोप कमी किंवा येतच नाही.
 
शारीरिक श्रम अधिक झाल्यामुळे, शरीरातील कुठल्याही भागात दुखणे असल्यामुळे, पायात आग होत असल्यानेदेखील शांत झोप लागत नाही.
 
खूप कॉफी, चहा, तंबाखू, धूम्रपान या सारखी उत्तेजक प्येय घेतल्यामुळेदेखील शांत झोप लागत नाही, कारण ही प्येय मेंदूला सतर्क किंवा उत्तेजित करण्याचा संदेश देत असतात. तसेच झोपताना धूम्रपान, तंबाखूसेवनदेखील करू नये.
 
उपचार -
  • जीवनशैलीतील बदल हे निद्रनाशावरील प्राथमिक उपचार. तसेच निद्रानाशाची असणारी शारीरिक, मानसिक कारणे ओळखून त्यानुरूप चिकित्सा करणे गरजेचे ठरते.
  • योगा, ध्यान-धारणा, प्राणायाम यांचा दैनंदिन जीवनात समावेश करावा.सोबतच व्यायाम नीट केल्यानेदेखील फरक पडतो.
  • संध्याकाळ नंतर चहा- कॉफी सारखी उत्तेजक प्येय कुठल्याही वेळी घेण्याचे टाळणे.
  • रात्रीच्या वेळी शक्यतो हलका आहार घ्यावा. भरपोट आहार व जड आहार घेणे टाळणे चांगले.
  • झोपण्यापूर्वी मेडिटेशन केल्याने मानसिक तणाव कमी होतो, डोक्यातील विचार निघतात व शांत झोप लागण्यास मदत मिळते.
  • भरपूर व्यायाम करावा. मात्र, झोपण्याच्या वेळेपूर्वी किमान चार तास आधी व्यायाम केला पाहिजे.
  • झोपताना थंड दूध खडीसाखर टाकून घेतल्यानेदेखील शांत झोप लागण्यास मदत होते.
  • या रोगाची तीव्रता अधिक असेल तर वैद्यांकडे जाऊन परीक्षण करणे गरजेचे ठरते.
  • आयुर्वेदात सांगितलेले पंचकर्म शिरोधारा, शिरोपिचू, शिरो अभ्यंग, पादाभ्यंग, शरीराभ्यांग इत्यादीचा सतत काही काळापर्यंत उपयोग केल्यास चांगला लाभ मिळतो.
  • अश्वगंधा, शंखपुष्पी, जटामांसी, तगर, जायफळ, ब्राह्मी यासारख्या औषधी वनस्पतींचा वापर करावा.
9665052929