सुपरफुड सत्तू

    दिनांक :30-Aug-2019
पावसाळ्याच्या दिवसांत पचनक्रियेशी निगडित समस्या आणि रोगप्रतिकारशक्ती पुरेशी नसल्याने सर्दी, खोकला, ताप, इत्यादी समस्या नेहमीच आढळून येत असतात. या समस्या टाळण्यासाठी आहाराद्वारे योग्य पोषण मिळेल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढेल हे पाहण्याची आवश्यकता असते. यासाठी कोणतीही टॉनिक्स, किंवा औषधांची आवश्यकता नसून, खास पावसाळ्याच्या दिवसांत सुपरफुड समजल्या जाणार्‍या सत्तूचा समावेश आपल्या आहारात करण्याचा सल्ला सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर देतात. चणे भट्टीमध्ये भाजून त्याचे पीठ करण्यात येते. हे पीठ दळून झाल्यानंतर चाळणीने चाळून घेऊन सत्तूचे पीठ तयार केले जाते. भारतामध्ये अनेक प्रांतांमध्ये सत्तू निरनिराळ्या प्रकारे तयार करण्यात येत असते. काही ठिकाणी भाजलेल्या चण्यांसोबत थोडे गहू आणि तांदूळ मिसळले जाऊन त्याचे पीठ तयार करण्यात येते. सत्तू आरोग्यास अतिशय उपयुक्त असल्याचे आहारतज्ज्ञांचे मत असून, विशेषतः महिलांना यांपासून मोठा फायदा आहे. सत्तू, चण्याची डाळ भाजून केल्याने हे पचण्यास हलके असतेच, शिवाय प्रथिनांनी परिपूर्ण असते. 

 
 
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, विशेषतः श्रावण महिन्यात पालेभाज्यांवर मोठ्या प्रमाणात कीड दिसून येत असल्याने या भाज्या खाणे टाळले जाते. तसेच या दिवसांमध्ये पचनशक्ती मंदावल्याने व मुबलक प्रमाणात फायबर असलेल्या पालेभाज्या पचण्यास कठीण असल्याने पचनाशी निगडित समस्या उद्भवू शकतात. पचनशक्ती मंदावल्याने मांसाहार टाळणेही श्रेयस्कर ठरते. अशा वेळी प्रथिनांचे मुख्य स्रोत असणार्‍या पालेभाज्या किंवा मांसाहार आपल्या भोजनामध्ये समाविष्ट नसताना शरीराला भासणारी प्रथिनांची कमतरता सत्तू भरून काढते. यामध्ये फॉलिक ॲसिड आणि इतर आवश्यक ॲमिनो ॲसिड्सही मुबलक प्रमाणात असल्याने गर्भवती महिल्यांच्या आहारामध्ये याचा समावेश केला जाणे उत्तम.
 
सत्तूमध्ये कॅल्शियम, आणि लायसीन नामक जीवनसत्व, महिलांच्या मासिक धर्मामध्ये होणारी कंबरदुखी, किंवा पोटदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. सत्तुचा वापर केवळ रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आणि शरीराला पोषण मिळविण्यासाठी नाही, तर त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीही केला जाऊ शकतो. सत्तू पाण्यामध्ये कालवून डोळ्यांभोवती हलक्या हातांनी ही पेस्ट चोळल्याने डोळ्यांच्या भोवती असणारी काळी वर्तुळे कमी होतात, व चेहर्‍यावरील पिग्मेंटेशनही कमी होते. केस गळत असल्यास ते रोखण्यासाठीही सत्तू उपयुक्त आहे. सत्तू लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारे असल्याने मधुमेहींच्या आहारामध्ये याचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच यामध्ये सोडियमची मात्रा ही कमी असल्याने उच्चरक्तदाब असणार्‍या मंडळींसाठीही याचे सेवन उत्तम आहे.
 
सुट्टीच्या निमित्ताने किंवा एखाद्या समारंभाच्या निमित्ताने खाल्ल्‌या गेलेल्या चमचमीत, तेलकट पदार्थांमुळे शरीरामध्ये अनेक विषारी घटक साठत असतात. ताकामध्ये सत्तू मिसळून त्यामध्ये जिरे, कढीपत्ता घालून सत्तुचे सरबत तयार करून त्याचे सेवन केले असता, शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. सत्तूमध्ये फायबर असल्याने याच्या सेवनाने भूक लवकर शमते. त्यामुळे वजन घटविण्याच्या दृष्टीने याचे सेवन उपयुक्त आहे. सत्तू ताकामध्ये मिसळून त्यामध्ये जिरे आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी तयार करून त्यापासून चविष्ट पेय तयार करता येते, तसेच यापासून लाडू, किंवा सत्तूचे सारण भरून पराठेही तयार करता येतात.