पत्र बाप्पाचे भक्तांना!

    दिनांक :30-Aug-2019
गौरी साटोणे 
 
नमस्कार, भक्तजनहो...
तर काय आहे की मागच्या वर्षी तुम्हीच म्हणाला होतात की, ‘पुढच्या वर्षी लवकर या...!’ मलाही निघताना त्यामुळे आनंद झाला होता. तशी ही घोषणा म्हणा की घोषणावजा आवाहन म्हणा तुम्ही दरवर्षीच देत असता. ‘पुढच्या वर्षी लवकर या...’ मलाही आधी कळेना यातली मेख; पण आता कळू लागली आहे. ‘पुढच्या वर्षी’ म्हणजे आता यावर्षी पुन्हा यायचे झाले तर यायचे नाही, यायचे ते थेट पुढच्याच वर्षी. आपली ही भेट वार्षिक असते ना! तरीही मखलाशी अशी की, पुढच्या वर्षीच; पण लवकर या... म्हणजे आधी येऊ नका अन्‌ उशीरही करू नका... काय आहे ना की गणपती आधी येऊन गेले की मग दिवाळीही लवकर येते ना. यंदा तसे होते आहे थोड्याफार प्रमाणात. 

 
 
आता निघण्याच्या आधी म्हटलं तुमच्याशी संवाद साधावा. तुम्हाला काही सांगावे. नंतर आल्यावर काय होते की मला काही सांगताच येत नाही. एकतर कल्ला खूप असतो आणि त्या गोंगाटात बर्‍याचदा मला तुमच्या प्रार्थना, आरत्याही ऐकू येत नाही. बरे! मी आलो असतो तो तुमची गार्‍हाणी ऐकायला. तुमच्या सुख-दु:खात सहभागी व्हायला. त्यामुळे मग मी माझे काही सांगत नाही. मग निघण्याची वेळ होते. त्यावेळी मग आपले काय दुखणे सांगायचे म्हणून मी आपला गप्प असतो.
 
दरवर्षी हे असेच होते. त्यामुळे माझे मनातल्या मनातच राहून जाते, म्हणून मग मी आता ठरविले की निघण्याच्या आधी सांगून टाकावे, यासाठी मग मी हा पत्रप्रपंच मांडला आहे. आजकाल तसेही काही सांगायला फार वेळ लागत नाही. व्हॉटस्‌अॅप, फेसबुकवर सगळे सांगून टाकता येते. आजकाल तर मोबाईलवर टाईपही करावे लागत नाही, टॉक आणि टाईप, ही सोयही आली आहे. तुम्ही बोलायचे आणि ते टाईप होऊन जाते... तर मी हे पत्र माझ्या फॉलोअर्सना पाठवतो आहे, ज्यांना ते मिळाले त्यांनी ते फॉरवर्ड करा... अर्थात न वाचता नाही, आधी नीट वाचून घ्या. मला रीप्लाय करा नि मगच समोर सरकवा. नाहीतर बाप्पांचे पत्र मिळाले म्हणून ‘डन’चा अंगठा दाखवायचा अन्‌ द्यायचे चार ठिकाणी धाडून, असे करू नका.
 
तरच मी आता येतो आहे. दरवर्षी सारखाच यंदाही माहोल राहणार, यात काही शंका नाही. अर्थात यंदा पर्जमान जरा विचित्र होते. भाद्रपदात पाऊस जरा शहाण्यासारखा वागायला हवा. यंदा तिकडे पश्चिम महाराष्ट्रात महापुरानं थैमान मांडलं होतं. आता थोडी उसंत मिळाली आहे. अवघ्या महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेर देशांत आणि जगांत असलेल्या मराठी बांधवांनी, भारतीयांनी पूरग्रस्तांना मदत केली आहे. म्हणूनच यंदा गणेशोत्सवही साधेपणाने साजरा करून हा पैसा पूरग्रस्तांसाठी द्यायचा, असे अनेक गणेशमंडळांनी ठरविले आहे, असे माझ्या ऐकिवात आले नि मला खूप आनंद झाला आहे. काय आहे की तिकडे इतका पाऊस की गावेच्या गावे पाण्याखाली आलीत अन्‌ इकडे विदर्भात पावसानं काही भागांत अशी दडी मारली की कोरडा दुष्काळ पडतो की काय, अशी स्थिती होती... तर पर्यावरणाचा हा असमतोल तुमच्या लक्षात यावा. संकटाच्या काळांत आपण सारे एकदिलाने एकत्र आलात. जात, धर्म, पंथ असे सारेच मतभेद विसरून एक झालात, यावरून लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने मला तुमच्या घरच्या देव्हार्‍यातून बाहेर काढून गणेशोत्सव सार्वजनिक केला तो सफल होताना दिसतो आहे.
 
मी जळी, स्थळी, काष्ठी पाशाणी! प्रत्येक प्राणी मात्रात माझं प्रतििंबब. बरं! निर्जिव दगडातही देव शोधण्याची आपली परंपरा आहे. दगडापुढे नतमस्तक होतो. एवढा विश्वास आपण दगडावर ठेवतो. त्यात प्राण ओततो. माझा उत्सव म्हणजे तसा लेकुरवाळाच! लोकमान्यांनी समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी मला देव्हार्‍यातून बाहेर काढले. किती उदात्त विचार होते त्यांचे... परंतु, हळूहळू तुम्ही त्यांच्या उद्देशालाच हरताळ फासत आहात. यात कुणाचे नुकसान आहे? पंतप्रधान मोदी यांनी आता प्लॅास्टिकबंदीचे आवाहन केले आहे, त्यांनी ‘स्वच्छ भारत’ ही संकल्पनाही मांडली होती, आता त्यांनी पाण्यासाठी जागृक होण्याचेही आवाहन केले आहे. माझ्या उत्सवाच्या काळांत यावर विचार व्हावा. विचारमंथन व्हावे आणि मग एक कृती आराखडा समाजानेच म्हणजे तुम्ही माझ्या भक्तांनी तयार करावा... कारण, गणेश ही विद्येची, विवेकाची देवता आहे, असे तुम्हीच म्हणता तर मग या काळात पर्यावरण रक्षणाचा विचार का नाही करायचा? आता त्याची प्रचंड गरज आहे. वातावरणात असमतोल निर्माण झाल्याने कुठे खूप पाऊस तर कुठे टिपूसही नाही, अशी स्थिती आहे. प्लास्टिक, थर्मोकोल आणि मग प्लास्टर ऑफ पॅरीस सारख्या रासायनिक आणि विघटन न होणार्‍या वस्तूंनी काय हानी होते आहे, हे सार्‍यांना माहिती असूनही निसर्गावरच घाला घातला जातो. मी लांब सोंडेचा, सुपासारख्या कानाचा मात्र मी अधीक कसा सुंदर दिसेल, त्यासाठी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीचा तुम्ही अट्टाहास करता. मातीच्या छान मूर्ती तयार होतात. दहा दिवसांतच त्या जलार्पण करायच्या असतात. यांत पर्यावरणाला हानी पोहोचत नाही. सजावटीतही प्लास्टिक, थर्मोकोल यासारख्या वस्तू वापरू नका.
 
विद्या आणि सद्सद्विवेक हे सोबतीने वावरत असतात. तुम्ही सुविद्य आहात अन्‌ तरीही विवेक सोडून वावरता. स्वस्त मूर्तींसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पसंत करता... तुमच्या श्रद्धेचा खेळ मला बघवत नाही. देवघरातील माझी प्रतिमा सोडून तुम्ही विविध ठिकाणी दर्शनाकरिता तासन्‌ तास पाण्यापावसात रांगेत ताटकळत उभे राहता. पण, ते कशासाठी? मला बघायला ना? हो, बघायलाच. दर्शन तर घरीही होऊ शकते. कुठेही होऊ शकते. डोेळे मिटा अन्‌ आत बघा, तुम्हाला मीच दिसेल. तुम्ही गावात विविध ठिकाणी देखाव्यात हरविलेला मी शोधत फिरता अन्‌ थकून घरी येता तेव्हा तुमच्या आईने, आजीने देवघरांत लावलेला नंदादीप तेवत असतो नि देवघरांत तुमची वाट बघत बसलेला मी ‘दिवार’ मधल्या अमिताभ सारखा तुम्हाला म्हणू पाहतो, ‘‘तू मुझे बाहर ढुंढ रहे हो और मै तुम्हारा यहां इंतजार कर रहा हैुं!’’ मग, तुमच्या देव्हार्‍यात तुम्ही कोणाला बसवलं? माझं अस्तित्व तर सर्वत्र आहे. खरे तर तुम्ही मला या दहा दिवसांत खूप उंचावर बसवून ठेवता. तेवढ्या उंचावरून मला तुम्ही नीट दिसत नाही आणि तुमचं मागणंही माझ्यापर्यंत पोहोचत नाही. तरीही तुम्ही तेच करता.
 
मी तुमच्या किती जवळ आहे, हे तुम्हाला अजून कळलंच नाही. ज्या निसर्गाचा मी पालनकर्ता आहे, त्याच निसर्गाच्या विनाशकाच्या भूमिकेत तुम्ही मला आणून ठेवलंय्‌. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मुर्त्यांमध्ये मला बंधिस्त करता आणि मग मोठ्याला नदींच्या स्वाधीन करून जल दूषित करता. नैसर्गिक आपत्ती आली की माझ्याच नावाने ओरडता! ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या आत मला बंद करून माझ्या पायी कित्येक निष्पाप लेकरांचा जीव जातो. कित्येक जीवजंतू नाहीसे होतात. मग तुमच्या समोर नैसर्गिक संसाधने उपलब्ध असताना का करता निसर्गाची हानी? अशाने मी प्रसन्न होईल का? आणि उत्सवाचे दहा दिवस झाले की अनेक मोठ्या नद्या आणि समुद्राच्या काठचे दृष्य काय असते? प्लास्टर ऑफ पॅरिसच्या या मूर्ती पाणी काठावर फेकून देत असते आणि आपल्या देवतेची असल विटंबना तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघत असता. ज्याला तुम्ही अत्यंत गाजावाजा करून दहा दिवस मखरांत बसविला, आरत्या केल्या, हात जोडले त्याचीच तीच मूर्ती अशी लोळते आहे घाणीत... बघा बरं वाटतं का?
 
आताच बोलतो हे कारण नंतर ऐकू येणार नाही तुम्हाला... माझ्या आगमनाला एकापेक्षा एक गाणी ऐकायला मिळतात. कुठे आवाज वाढवणारा डिजे तर कुठे ‘चिमणी उडाली!’ काही माणसंतर कोण कुठली ती शांताबाई! चक्क बाईचे कपडे नेसून शांताबाईच्या तालावर माझ्याच पुढे वेडे वाकडे नाचतात. असो! अरे बाळांनो, मला मोठे कान प्राप्त झाले ते तुमचे दुःख, वेदना, गार्‍हाणी, प्रार्थना ऐकण्यासाठी! ही तुमची गाणी मला ऐकवतही नाही आणि त्याचा तो आवाजही सहन होत नाही. जेव्हा कुठेतरी कोणी मृदुंगाच्या तालात आणि अभंगाच्या सुरात मिरवणूक निघते तेव्हा मला त्या मिरवणुकीचे अप्रुप वाटते. किती सुंदर दृश्य असतं ते! पण ते आता फारसं बघायला मिळत नाही. तुम्ही फक्त सेल्फीच्या नादात माझी मूर्तीच ओढण्यात तल्लीन असता. माझे अस्तित्त्व तर अभंगाच्या नादात कधीच वाहून गेलेले असते.
 
कधी कधी वाटतं की निघून जावं या भूतलावावरून... पण, काही शहाणे भक्त आहेत. त्यांच्यात उत्साह तर आहे; पण उन्माद नाही. परंपरा पाळतात ते पण त्याचा अभिनिवेश नाही. अनक ठिकाणी आता मूर्ती दरवर्षी विसर्जित करत नाहीत. मिरवणूक काढून केवळ पूजेची छोटी मूर्ती विसर्जित करतात आणि मोठी देखाव्याची मूर्ती सुरक्षित एकांत ठिकाणी ठेवून देतात. पुढील वर्षी मूर्तीकाराकडे नेवून थोडीफार डागडुजी आणि रंगरंगोटी करतात, नवे दागिने घालतात. पूजेची छोटी मूर्ती विकत घेतात, म्हणजे त्या मूर्तीकाराचा व्यवसायही सुरू राहतो आणि पर्यावरणाची हानीही होत नाही... आधी ठीक होतं हो, लोकसंख्या कमी होती आणि गणेशोत्सवाचाही इतका प्रसार झालेला नव्हता. एक गाव, एक गणपती असले आदर्श पाळले जायचे. शुचिता होती. त्यामुळे लाखोनी मूर्ती नव्हत्या. आता विसर्जन करायचे झाले तर आधी पेक्षा जलस्रोत कमी झाले आहेत आणि मूर्तींची संख्या कितीतरी पटींनी वाढली आहे. विसर्जनाचे स्रोत आणि मूर्तींच्या संखेचे गुणोत्तर यांचा विचार करता तुम्ही कुठलाही अभिमान, अभिनिवेश न ठेवता या सार्‍याचा विचार करायला हवा...
 
उत्साहाच्या भरांत आपण काय करतोय्‌ याचाही विसर तुम्हाला पडतो. तुम्ही तुमच्या या आराध्याचेच इचगोळे करता. म्हणजे गणपती कशाचाही आणि कुणाचाही करता. अगदी लोकमान्यांच्या मूर्तीला सोंड लावता अन्‌ त्याचा गणपती करता, तुंदीलतनु मी अन्‌ तुम्ही महात्मा गांधींच्या मूर्तीचाही गणेश करता. अगदी चित्रपटातील नायकांच्याही मूर्तीला सोंड लावून गणेश करता. सुपार्‍या, नारळ, दोरी, बदाम, शेंगदाणे, लाडू, केळी, कणीस, चमचे, वाट्या... कशाकशाच्या तुम्ही मूर्ती करता. यात नेमकं काय साध्य होतं? पूजा? पूज्यभाव की ही विटंबना माझी? थोडा विचार करा.
 
असं वाटतं की परत येऊच नये; पण जसे असे आहेत, तसे तसेही आहेत. शुचिता पाळणारे आहेत. विवेकी आहेत. शांतपणे शुचिर्भूत हा उत्सव साजरा करणारेही आहेत. सुश्राव्य गाण्याचे, विद्वत्तापूर्ण व्याख्यानांचे असे अनेक कार्यक्रमही या काळांत घेतले जातात. अन्नादान केले जाते. अनेक समाजपयोगी आणि सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम घेतले जातात. समाजाची एक चांगली घुसळण होते. म्हणून वाटतं की या निमित्ताने समाजाने एकत्र बसावे आणि या दहा दिवसांचे स्वरूप ठरवावे. त्यात शिरलेले राजकारण आणि गुंडगिरी थांबविली जावी. तुम्ही समोर आलात ना की हे सहज शक्य आहे.
 
तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल पण माझं वास्तव्य तर तुमच्याच अवतीभोवती आहे. रांगेत उभा असणार्‍या तुमच्यापैकी एक ‘मी’ आहे. तुमची तिथे काळजी घेणारा पोलिसात मी आहे. रस्त्यावर भुकेलेला भिकारी मी, तर त्याच्या हाती लागलेला प्रसादही मी! श्रोत्यांमध्येही मी! दर्शन मिळालेल्या सुखात मी, तर दर्शन न मिळालेल्यांमध्येही मीच. तरी सुद्धा तुम्ही माझाच शोध विविध ठिकाणी घेता. आवरा रे स्वत:ला आणि ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून मला मुक्ती द्या. स्वतःची आणि पर्यावरणाची काळजी घ्या. प्रत्येक घरी माझ्या आगमनाला एक झाड लावा.
 
चला आता, मी तुमची रजा घेतो. कारण मलाही तयारी करायची आहे. अहो कसली काय विचारताय्‌? चतुर्थी जवळ आली. तुमच्याकडे येण्याची तयारी नको का करायला! माझं नाव सांगायचं तर राहूनच गेलं. तुम्हीच नाही का ठेवली माझी वेगवेगळी नावं! कोणी म्हणे- ‘चाळीतला राजा’ नवसाला पावतो तर कोणी म्हणे ‘राजाची कीर्ती महान- लाल बागचा राजा!’ माझं गणपती, गणेश, विनायक, हे मूळ नावं सोडून तुम्ही मला अनेक नावांनी माझं बारसच घातलं. प्रत्येक वर्षी माझे नाव वेगळे. बघा, आता सरकारने प्लास्टिक बंदी केली म्हणून थर्माकोलचे आसनं तुम्ही बंद केली. आता प्रत्येक गोष्टीत सरकारने डोकावलेच पाहिजे का? जरा स्वत:चा नाही, तर पुढच्या पिढीचा विचार करा. भविष्यात तुमची लेकरं प्रदूषणापासून दूर राहायला हवीत, म्हणून तुम्हीच या गणेशचतुर्थीपासून पुढाकार घेतला पाहिजे. एक वेळ माझी आरती केली नाही तरी चालेल. पण, आपले संस्कार, संस्कृती सांभाळत निसर्गही सांभाळा. भक्तांनो, म्हणून तुम्हाला हे काळजीचं पत्र! बघा, तुम्हाला शक्य झाले तर पर्यावरणयुक्त गणेशोत्सव साजरा करा आणि निसर्ग सांभाळा. देवत्व त्यातच पहा!
तुमचाच
श्रीगणेश महादेव पार्वतीनंदन