वाजती गळ्यांत घुंगरांच्या माळा, सण बैलपोळा, ऐसा चाले

    दिनांक :30-Aug-2019
 चिखली,
पाठीवर नक्षीदार झूल, शिंगांना घुंगरांची छंबी, गोंडे, गळ्यात कवड्याच्या व घुंगराच्या माळा, शिंगांना रंग, नवीन कासरा, म्होरकी, शरीरावर रंगीबेरंगी शिक्के, नवीन झूल अशा आकर्षक पद्धतीने सर्जा-राजाला सजवत आपल्या लाडक्‍या सर्जा-राजाची आज ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीने बैलांना जुन्या गावात व राजाटावर जवळ तोरणा खालून आणून रेणुका देवीच्या मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा देत पोळा सण उत्साहात साजरा झाला.

 
 
पाऊस नसल्यानेे बळीराजा अडचणीत सापडला होता. अशाही परिस्थितीत आपल्या लाडक्‍या सर्जा-राजाचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होताना दिसत होता. सकाळपासूनच बैलांच्या सजावटीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. बैलांना अंघोळ घालत त्यांच्या पाठीवर नक्षीदार झूल चढवण्यात आली.काही बैलांच्या झुलीवर सामाजिक संदेश देण्यात आले होते. शिंगांना रंगीबेरंगी रंग , शिक्के, छंबी, गोंडे, तसेच फुगे, घुंगराच्या-कवड्याच्या माळा व हारांनी नटलेल्या बैलांना ढोल-ताशांच्या गजरात मंदिरराची प्रदक्षिणा घातल्यानंतर पुन्हा वाजत-गाजत घरापर्यंत नेण्यात आले. घरोघरी सुहासिनींनी बैलांचे औक्षण केले. त्यांना धान्य तसेच पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला

 
 
शहरवासीयांचे प्रतीकात्मक बैलपूजनही उत्साहात
दिवसेंदिवस शहरालगतच्या भागात शेती तुकड्यातुकड्यात विभागली गेल्याने बैलांची संख्याही कमी झाली आहे. शहरी भागात बैल कमी असल्याने प्रतीकात्मक मातीच्या बैलांचे पूजन करून पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.