काँग्रेस नेते नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करा -शिवसेनेची मागणी

    दिनांक :30-Aug-2019
 

 
 
तुमसर,
राष्ट्रीय काँग्रेसचे प्रचार समिती अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तुमसरचे ठाणेदारांना दिलेल्या तक्रारीतून करण्यात आली आहे.
काँग्रेसने काढलेल्या महा पर्दाफाश यात्रेदरम्यान काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीटातून अपघात विम्याच्या नावावर घेतलेले रुपये प्रत्येक दिवशी ६७ लाख रुपये मातोश्रीवर जातात, असा निराधार आरोप करून शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीचा अपमान केला आहे. मातोश्रीबद्दल अपमानजनक आरोप करणार्‍या नाना पटोलेंवर तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी, जनतेचा विश्‍वासघात करणार्‍या कोणताही पुरावा नसताना केलेल्या आरोपाबद्दल गुन्हा दाखल न झाल्यास शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक  मनोज सिडाम यांना दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख नितेश वाडीभस्मे, तरुण बेरोजगार कृती समितीचे संयोजक अमित एच. मेश्राम, युवासेना तालुका प्रमुख संजू डहाके, वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय झंझाड, विभाग प्रमुख ईश्वर भोयर, वामनराव पडोळे, बूथ प्रमुख सचिन मोहतुरे, लंकेश तिजारे, दुर्गेश पोटभरे, विष्णू सोनवणे, सतीश भोयर, काशिनाथ कुंभारे, अनिल मोहिते सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.