सहकार नेते विजय उगले यांच्या खुनाचा प्रयत्न

    दिनांक :31-Aug-2019

धामणगाव रेल्वे,
जिल्ह्यातील सहकार नेते व आदर्श यशवंत ग्रामपंचायत झाडाचे शिल्पकार विजय उगले यांना पेट्रोल टाकून पेटवून मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील चिंचोली येथे शनिवारी सांयकाळी घडली. या घटनेने संपूर्ण तालुक्यातील सहकार क्षेत्र ढवळून निघाले आहे. सदर प्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक झालेली नाही. 

 
 
मिळालेल्या माहितीनुसार,शनिवारला 31 ऑगस्टला काही वैयक्तिक कामानिमित्त सहकार नेते विजय उगले व त्यांचा वाहन चालक सुनील ठाकरे हे चिंचोली येथे विलास जाधव यांच्या घरी भेटण्याकरिता गेले होते. दरम्यान विलास जाधव यांच्या घरासमोर गाडीमधून उतरताच आरोपी शेख शब्बीर शेख रहीम रा.झाडा हा त्याचा ऑटो घेऊन आला व उगले यांच्या समोर येऊन स्वतः जवळ असलेल्या दोन लिटरच्या प्लास्टिक शिशिमधील पेट्रोल विजय उगले यांच्या अंगावर फेकले. उगले यांच्या डोक्यावर व तोंडावर पेट्रोल पडले. यात उगले यांचे कपडे पेट्रोलने ओले झाले.
 
 
 
त्यानंतर आरोपीने आगपेटीच्या काड्या पेटवून उगले यांच्या अंगावर फेकल्या. हा प्रकार लक्षात येताच उगले मागे सरकले. घटना लक्षात येताच त्यांचा वाहनचालक सुनील ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास जाधव व आदी धावून आले. दरम्यान आरोपी तेथून तात्काळ निघून गेला. या प्रकरणी मंगरूळ दसतगिर पोलिसांनी विजय उगले यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भा.द.वि. 307 अनव्ये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास मंगरूळ दस्तगिर पोलिस करीत आहे.