पिठोरी अमावास्या

    दिनांक :31-Aug-2019
प्रज्ञा जयंत बापट
एका ब्राह्मणाकडे श्रावणाच्या अमावास्येला श्राद्ध असे. पण, त्याच दिवशी त्याच्या सुनेला मुलगा होई आणि मरून जाई. श्राद्धविधी होतच नसे. असं सातदा झालं. ब्राह्मण रागवला. सुनेला रानात हाकलून दिलं. सून भीतीने झाडाआड बसून राहिली. थोड्या वेळाने तिथे नागकन्या, देवकन्या, अप्सरा आल्या. त्यांनी शंकराची पूजा केली. प्रसाद घ्यायला सुनेने हात पुढे केला. ‘‘बाई, बाई, कोण तू?’’ सुनेने रडत रडत कर्मकहाणी सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्याकडून योगिनींची पूजा करवून घेतली. तिची गेलेली मुलं जिवंत झाली. बाई आनंदली. मुलांना घेऊन घरी आली. सासू-सासर्‍यांनी स्वागत केलं. दरवर्षी मुला-लेकरांच्या आरोग्य-आयुष्यासाठी योगिनींची पूजा होऊ लागली. 

 
 
कांडलेल्या ज्वारीचं पीठ गुळाच्या पाण्यात वैरून पिठोरा शिजवायचा. सारवल्या भिंतीवर चौसष्ट योगिनी, सात माता आणि सात बाळं काढायची. नारळ-काकडीचा नैवेद्य दाखवायचा. गव्हाची पोळी खायची नाही. पिठोराच खाऊन उपवास संध्याकाळी सोडायचा.
 
जुन्या समजुतीनुसार काही योगिनी बालघातिनी होत्या. शकुनी, पूतना, विशिरा अशी त्यांची नावं. त्या लहान बाळांना आजारी पाडून त्रास देत. त्यांनी त्रास देऊ नये म्हणून त्यांची पूजा. काही योगिनी माहेश्वरी, वैष्णवी, चामुंडा- त्या बाळांचं संरक्षण करत. त्यांनी बाळाचं संगोपन करावं म्हणून त्यांची पूजा! अशी भीती आणि भक्ती दोन्ही भावनांतून चौसष्ट योगिनींची पूजा केली जाई. पुढे चौसष्ट योगिनींच्या ‘सप्त मातृका’ प्रतिनिधी ठरल्या. नंतर जिवती किंवा जिवंतिका हीच एक बालसंगोपन करणारी देवता श्रावण महिनाभर पूजिली जाऊ लागली आणि सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर तिचं चित्र रेखाटून ते बाळाच्या गळ्यात, काळ्या दोर्‍यात ओवून घालायची रूढी झाली.
 
दुसरी एक कहाणी बहीण-भावाची. एकदा एका शेतकर्‍याचं बायकोच्या भावाशी मोठ्ठं भांडण झालं आणि रागाच्या भरात शेतकर्‍याने त्याला मारून टाकलं. कुणाला कळू नये म्हणून गवताच्या भार्‍यात बांधून गोठ्याजवळ टाकलं. तो दिवस पिठोरी अवसेचा. बहिणीने शंकराची पूजा केली. दिवसभर उपवास केला. काकडी फोडायला भावाला हाक मारली. भाऊ येईना. शेवटी नंदीसमोर उंबरठ्यावर बहिणीने काकडी फोडली. म्हणाली, ‘‘असेल तिथे भाऊ खुशाल असो. खेळता दिसो हसता दिसो.’’ फोडल्या काकडीच्या बिया अंगणात उडाल्या. गवताच्या भार्‍यावर पडल्या अन्‌ भार्‍यामधून भाऊ हसत हसत उठला. शेतकर्‍याने बायकोची क्षमा मागितली. सगळे शंकराला शरण गेले. आजही अनेक बहिणी पिठोरी अमावास्येला भावाच्या पाठीवर काकडी फोडून त्या काकडीचा प्रसाद वाटतात. तोपर्यंत काकडी खात नाहीत.
 
पिठोरी अमावास्या म्हणजेच पोळा. शेतकर्‍यांच्या बैलांचा सण. बैल- शेतकर्‍याचा जिवाभावाचा सोबती. या कष्टाच्या भागीदाराची शेतकरी खूप काळजी घेतो. त्याला कडबा-कुटार, गवत-वैरण, दाणा-पेंड खाऊ घालून सशक्त ठेवतो. बैलाच्या आणि त्याच्या धन्याच्या प्रेमाच्या जिवाभावाच्या खूप कहाण्या आहेत. सशक्त दणकट बैलजोडी हा शेतकर्‍याच्या अभिमानाचा विषय. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद-लोणी लावून शेकतात. पोळ्याच्या दिवशी सजवतात. संध्याकाळी त्यांची पूजा करून कुड्याच्या पानात पुरणपोळी, काकडी, धोप्याची (अळूची) वडी खाऊ घालतात. कुठेकुठे ते कुड्याचं उष्टं पान वळचणीला खोचतात. त्याला ‘धन’ म्हणतात. ‘नंदी जेवला धन ठेवलं.’
 
पण, आता या धनाला ओहोटी लागली आहे. शेती उद्ध्वस्त झाल्यामुळे, राजा-सर्जा आणि ढवळ्या-पवळ्याचं, लाख्या-धामण्याचं देखणेपण संपत चाललं आहे. पुन्हा कदाचित शेतीला चांगले दिवस आले, तर पुन्हा खिल्लार्‍या जोड्या कुडाच्या पानात घास खातील. शेतकरीण वळचणीला ‘धन’ खोचेल.