शिवाजी नगरातील अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

    दिनांक :31-Aug-2019
वाशीम, 
येथील शिवाजी नगरातील सर्वे नं. 394 मधील नगर परिषदेच्या मालकीच्या खुल्या जागेवर एकाने अतिक्रमण करुन अंदाजे 18000 चौ. मी. फूट खुल्या जागेवर तार कुंपन करुन अतिक्रमण केले आहे. सदर अतिक्रमण काढण्याबाबत येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी, नप मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असले तरी नप प्रशासनाने अद्याप कुठलीच कारवाई केली नसल्याने स्थानीक रहिवाशात रोष व्यक्त होत आहे. 
 
 
जिल्हाधिकारी व नप मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार वार्ड क्र. 1 मधील सर्वे नं. 394/1 मधील प्लॉट खरेदी करतेवेळी ओपन स्पेस 1876.08 चौ.मि. दर्शविण्यात आला होता. जेणेकरुन खुल्या जागेत लहान मुलांना, वृद्धांना आणि सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी ह्या खुल्या जागेचा उपयोग प्लाट धारक करतील. याठिकाणी अनेकांनी प्लॉट खरेदी करुन वास्तव्यास आले आहेत. परंतु, स्थानिक रहिवाशांसाठी खुली जागा सोडण्यात आली होती. परंतु, एका राजकीय पक्षाच्या पुढार्‍याने या करोडो रुपयाच्या खुल्या जागेवर अतिक्रमण केले आहे. एवढेच नाहीतर या खुल्या जागेला चारही बाजूंनी तार कुंपन करुन त्याठिकाणी फलक लावून ही खुली जागा आमच्या मालकीची असून, कोणी ताबा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्या फलकावर लिहून ठेवले आहे. 
 
 
सर्व्हे नं. 394/1 मधील अभिन्यास सहायक संचालक, नगर रचना अकोला यांनी 20 नोव्हेंबर 1993 पत्र क्र. रुपांतरण / स. क्र. 394 / वाशीम /ससंअ / 1809 अन्वये मंजूरीची शिफारस करण्यात आलेली आहे. त्यानूसार जिल्हाधिकारी अकोला यांचे पत्र क्र एनएपी 34/ वाशीम 9/ वाशीम/1993-94 दिनांक 29 एप्रिल 1994 रोजी अकृषक वापर परवाना देण्यात आलेला आहे. त्यामध्ये 1876.08 चौ. मी. खुली जागा ही स्थानिक रहिवाशांना विविध कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र, त्या जागेवर अतिक्रमण झाल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर अतिक्रमीत जागा खुली करुन देण्याबाबत स्थानिक रहिवाशांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांनी नप मुख्याधिकारी यांना स्थळ निरीक्षण करण्याबाबत निर्देशीत केले. त्यानुसार मुख्याधिकार्‍यांनी स्थळ निरीक्षण केले असता त्यामध्ये अतिक्रमण केल्याबाबतचा अहवाल त्यांनी तयार केला असला तरी अतिक्रमण हटविण्याबाबत उदासीन असल्याचे दिसते.
 
सदर अतिक्रमण न काढल्यास स्थानिक रहिवाशी उपोषणाला बसतील, असा इशारा निवेदनातून दिला आहे.