वास्तुशास्त्र : घरातील देव्हारा

    दिनांक :31-Aug-2019
घरातील देव्हारा ही देवाच्या प्रार्थनेची पवित्र जागा असते. म्हणूनच तिथे सकारात्मक वातावरण आणि शांतता असणे गरजेचे असते. देव्हार्‍याची जागा वास्तुशास्त्राला अनुसरून ठरवली तर घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. घरात स्वतंत्र पूजेची खोली असणे अगदी चांगले असले, तरी मोठ्या शहरांमध्ये जागेच्या उपलब्धतेअभावी ते नेहमीच शक्य होत नाही.
 
देव्हार्‍याची जागा हा घराचा अत्यंत शांत भाग असला तर तेथे दैवीशक्ती भरून राहते. ही अशी जागा आहे जेथे आपण परमेश्वराशी लीन होतो आणि त्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते. देव्हारा ठेवायला स्वतंत्र खोली शक्य नसेल, तर पूर्वेकडच्या भिंतीलगत इशान्य दिशेला एक चौथरा तयार करावा. घराच्या दक्षिणेला, आग्नेय किंवा नैर्ऋत्य दिशेला देव्हारा ठेवणे टाळावे. वास्तूनुसार देव्हारा ठेवण्याची योग्य दिशा गुरू (ज्युपिटर) हा ईशान्येचा-ज्याला ईशान कोन असेही म्हणतात-स्वामी आहे, असे वास्तुशास्त्र आणि ज्योतिष सांगतात. ईशान म्हणजे ईश्वर किंवा देव. म्हणूनच ती दिशा देवाची म्हणजे गुरूची मानली जाते. यासाठी देव्हारा त्या दिशेला असणे चांगले. शिवाय पृथ्वीचा झोक याच दिशेला असतो आणि तिच्या प्रदक्षिणेचे सुरुवात तेथे होते. त्यामुळे ईशान्य कोपरा हा रेल्वे इंजिनासारखा सर्व घर आपल्या ताकदीने पुढे नेतो, देव्हारा घराच्या मध्यभागी ठेवणे (या जागेला ब्रह्मस्थान म्हणतात) पवित्र असते आणि त्यामुळे घरातल्या माणसांसाठी ऐश्वर्य आणि आरोग्य यांचा लाभ होतो.
 
 
 
घरातील देव्हारा वास्तुशास्त्रानुसार कसा बांधवा याबद्दल काही नियम आहेत.
 
घरात देव्हारा करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे देव्हारा थेट जमिनीवर ठेवू नका. त्याऐवजी तो थोड्या उंच चौथार्‍यावर किंवा चौरंगावर ठेवा, असा सल्ला परमार देतात. देव्हारा संगमरवरी किंवा लाकडी असावा, ॲक्रिलिक किंवा काचेचा देव्हारा टाळावा. देव्हार्‍यात मूर्तींची गर्दी करू नये. एकाच देवतेच्या अनेक मूर्ती ठेवू नयेत. देव्हार्‍यात ठेवलेले फोटो अथवा मूर्ती चिरा गेलेल्या किंवा इतर नुकसान झालेल्या नसाव्यात, कारण ते अमंगल समजले जाते.
 
देव्हारा जिथे असेल तिथे बसून पूजा करता आली पाहिजे. काही विशेष पूजांच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमून प्रार्थना करतात. देव्हार्‍यात सतत सकारात्मक ऊर्जा खेळती राहावी यासाठी ती जागा स्वच्छ आणि मोकळी ठेवावी. तिथे धूळ, कोळिष्टके जमू देऊ नये तसेच उपकरणांची गर्दीही करू नये. मुख्य म्हणजे देव्हारा आणि परिसर ही मनाला शांती देणारी जागा असते, याची जाणीव ठेवावी.
 
घरच्या देव्हार्‍याची आणि आसपासची सजावट कशी करावी, याबद्दल सूचना- दिव्याची जागा पूजा करणार्‍या व्यक्तीच्या उजव्या बाजूला असावी.
 
देव्हार्‍याची सजावट करण्यासाठी ताजी फुले वापरावी. वातावरण पवित्र व्हावे यासाठी काही सुवासिक मेणबत्त्या, धूप किंवा उदबत्त्या लावाव्या.
 
निधन झालेल्या व्यक्तींचे किंवा पूर्वजांचे फोटो देव्हार्‍यात ठेवू नये.
 
सुगंधी द्रव्ये, पूजा साहित्य आणि पोथ्या ठेवण्यासाठी देव्हार्‍याजवळ सणासुदीच्या काळात विजेच्या दिव्यांची सजावट करता यावी या दृष्टीने देव्हार्‍याच्या जवळ इलेक्ट्रिक पॉईंट बसवून घ्यावेत.
 
देव्हार्‍याच्या जवळ अनावश्यक वस्तू किंवा कचर्‍याची टोपली ठेवू नये. काही घरात देव्हारा स्वयंपाकघरात किंवा बेडरूममध्ये ठेवतात. असे करायचे असेल तर पूजा झाल्यांनतर देव्हारा पडदा लावून झाकून ठेवावा. ज्या भिंतीच्या मागे टॉयलेट असेल त्या भिंतीवर देव्हारा लावू नये, तसेच वरच्या मजल्यावर जेथे टॉयलेट असेल त्याच्या खालच्या जागी देव्हारा लावू नये. देव्हारा ठेवण्याच्या खोलीत पांढरा, बेज, कोनफळी किंवा फिका पिवळा असे रंग वापरावेत.
 
 
श्रश्र