बैल वाचला तर पोळा!

    दिनांक :31-Aug-2019
ग्रामीण भागात पोळा सण उत्साहात साजरा झाला, अशी बातमी वाचून आपण आपल्या दैनंदिन कामाला लागतो. परंतु, पोळ्याच्या निमित्ताने कुणीच बैलांच्या आणि एकूणच ग्रामीण भागातील पशुधनाच्या बाबतीत बोलताना दिसत नाही. खूपच झाले तर बैलाच्या कष्टमय जीवनाविषयी उसासे सोडल्याचे दिसून येईल. एक बाब मात्र सर्व मान्य करतात की, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा बैल हा केंद्रिंबदू आहे. ही वस्तुस्थिती हजारो वर्षांपासून लोकांना माहीत होती, म्हणूनच केवळ बैलांसाठी पोळा हा सण प्रारंभ करण्यात आला. पोळ्याच्या दिवशी बैलांचा जो थाट असतो, जो मान असतो, जी सरबराई असते, ती इतर कुठल्या जनावराच्या नशिबी असेल असे वाटत नाही.
 
 
 
 
खरंच, बैल हा आपल्या कृषी-अर्थव्यवस्थेचा केंद्रिंबदू आहे. त्याच्यावरच सर्व अर्थव्यवस्था फिरत असते. असे जर आहे, तर ग्रामीण भागात बैलांची एकूणच स्थिती काय आहे, याचाही विचार व्हायला नको का? ग्रामीण भागात बैल हा केवळ एक उपयुक्त जनावर नसतो. कुटुंबातील एक सदस्य असतो. घरासमोर उभी असलेली बैलजोडी घराची श्रीमंती असते, समृद्धी असते. रस्त्याने आपली बैलजोडी जाताना लोकांनी मान वळवून पाहावे, असे प्रत्येक शेतकर्‍याला मनोमन वाटत असते. असे कुणी पाहिले की, त्याचा ऊर अभिमानाने भरून येतो, श्रमाचा निरास होतो. परंतु, दुर्दैवाने हे असे दृश्य आता ग्रामीण भागातून झपाट्याने नाहीसे होत असलेले आढळून येईल. म्हातारे बैल गुरांच्या बाजारात विक्रीसाठी उभे असलेले दिसून येतात. त्यांचा खरीददार अर्थातच कसाई असतो. तो बैलाच्या वजनावरून किंमत ठरवितो आणि कसायाने दिलेल्या नोटा मोजत शेतकरी संध्याकाळी गावी परततो. म्हणजे एकेकाळी ‘घरातील एक सदस्य’ म्हणून असलेली भावना जाऊन, निकामी झाला म्हणून याच बैलाला थोड्या पैशांसाठी कसायाला बिनदिक्कत विकण्याची मानसिकता आली आहे. हा रूक्षपणा कसा, कुठून व केव्हा आला?
याला शेतकर्‍याची दयनीय आर्थिक स्थिती कारणीभूत आहे, असेही कुणी म्हणेल. यात तथ्य नाही, असे नाही. परंतु, म्हातारा बैल विकून येणारे पैसे, तुमच्या गरजा किती दिवस भागवणार आहेत? पुढच्या वर्षी पुन्हा अडचण आली तर मग काय करणार? आर्थिक समस्या निश्चितच मनाला सैरभैर करून टाकतात. शेतकर्‍याला तर अधिकच. परंतु, म्हणून घराच्या श्रीमंतीला असे विकून टाकायचे असते का? घरासमोरची बैलजोडी शाबूत राहील असा दुसरा कुठला मार्ग नसतो का? निश्चितच असतो आणि आहे. परंतु, तसा कुणी विचार करताना दिसत नाही. गुरांचा बाजार आटोपला की रस्त्याने शेकडो म्हातारे बैल-गायी कत्तलखान्यांकडे निर्दयपणे नेताना तुम्हाला दिसतील. बैल जर अन्नधान्य पिकवितो, त्या अन्नधान्यावर तुमचे व देशाचे पोट भरते, तर मग त्याला त्याच्या उतारवयात कसायाला विकणे, माणुसकीला शोभते का? की फक्त मी व माझे कुटुंब यांचाच विचार करायचा?
 
आज, यांत्रिकी पद्धतीने शेती करायची टूम निघाली आहे. सरकारही त्याला अनाकलनीय कारणास्तव प्रोत्साहन देत आहे. घरची बैलजोडी विकून ट्रॅक्टर िंकवा इतर उपकरणे विकत घ्यायचे आणि थोड्या अवधीत शेतीची कामे संपविण्याकडे वेगाने कल वाढत आहे. या शिल्लक वेळाचे शेतकरी काय करतात, संशोधनाचा विषय आहे. हे निश्चित की, बैलाचे काम यंत्र करतात. परंतु, या कामांपलीकडेही बैल जसा उपयोगी पडतो, तसे यंत्र उपयोगी पडत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे बैलांपासून मिळणारे शेणखत, जे ट्रॅक्टर किंवा इतर कुठलेही उपकरण देत नाही. शेणखताशिवाय शेती म्हणजे मुठीवाचून तलवार, प्रत्यंचेवाचून धनुष्य. परंतु, रासायनिक खतांच्या प्रेमापोटी आम्ही हे सत्य विसरलो. वेड्यासारखे रासायनिक खतांच्या मागे लागलो. परिणाम असा झाला की, आमची शेतजमीन वांझ होत गेली. आत्ता कुठे तज्ज्ञमंडळी शेणखताच्या महत्त्वाविषयी बोलायला लागले आहेत. फक्त बोलतच आहेत. शेणखत आणायचे कुठून, हे सांगतच नाहीत. इकडे कत्तलखान्यात दररोज लाखो जनावरे कापली जात आहेत. त्यावर बंदी नाही. निकामी बैलांना पोसण्याचा खर्च शेतकर्‍यांना झेपत नाही, असली कारणे देत, या देशातील अर्धवट कृषी-पत्रकार, कत्तलखाने किती आवश्यक आहेत आणि कत्तलखान्यांवर बंदी किती नुकसानकारक आहे, यावर लेखच्या लेख लिहीत असतात आणि त्यांच्या लेखांवर व युक्तिवादांवर आम्ही माना डोलवत असतो. शेतकर्‍यावर कितीही आर्थिक संकट आले तरीही, अगदी घरात खायला दाणे नसले तरीही त्याने घरासमोरील गोधन विकता कामा नये, असे ठणकावून का नाही सांगितले जात? 2014 झाली झालेल्या पशुगणना अहवालानुसार भारतात 2007 साली 199 कोटी गाई-बैल होते. ते 2012 साली 190 कोटी उरले. म्हणजे 9 कोटी कमी. यात नैसर्गिक मृत्यू हेही कारण असेलच. परंतु, त्याहून कितीतरी अधिक संख्येने गाई-बैल कत्तलखान्यात कापले गेले आहेत.
पूर्वी खूप पिकायचे, असे सांगणारे खूप भेटतात. पण का पिकत होते, हे नाही सांगत. शेणखतामुळे पिकत होते. शेणखत परिपूर्ण खत आहे. त्याला थोडी रासायनिक खताची मात्रा मिळाली की उत्पन्न चांगलेच वाढते. पण, त्यासाठी शेणखत हवे. पूर्वी दर तीन वर्षांनी शेत शेणखताने भरून काढत. आता शेणखतच इतके थोडे असते की, शेताचा कोपराही भरून निघत नाही. भारतीय शेती तोट्यात जाण्याचे, ग्रामीण अर्थव्यवस्था दयनीय होण्याचे, शेतकर्‍यांनी हाय खाऊन आत्महत्या करण्याचे प्रमुख कारण म्हणजे, देशातील गुराढोरांची वेगाने कमी होणारी संख्या हे आहे आणि ही संख्या कत्तलखान्यात गुरे कापली जात असल्यामुळे कमी होत आहे, हे आम्ही समजून घेतले पाहिजे.
 
आजकाल गिधाडांची संख्या कमी झाली म्हणून ओरडा सुरू आहे. त्याला कुठलेतरी औषध कारणीभूत आहे म्हणतात. असेलही. परंतु, गिधाडांना मेलेली गुरे खायलाच मिळाली नाहीत तर ते तरी कसे जगणार? सर्व म्हातारी गुरे कत्तलखान्यात जात असतील, तर गावाबाहेर टाकून दिलेली मेलेली गुरे या गिधाडांना कशी खायला मिळणार? खरेतर उपासमारीमुळे गिधाडे मेली आहेत. सर्व कत्तलखाने बंद करा आणि प्रत्येक गावाच्या बाहेर मेलेल्या ढोरांना पडून राहू द्या. मग बघा, काही वर्षांतच गिधाडांची संख्या, काहीही न करता कशी झपाट्याने वाढते ते!
 
घरातील बैल म्हातारा होऊन खुंट्यावरच मेला पाहिजे, हे आता शेतकर्‍यांच्या मनात बिंबविले पाहिजे. गावाबाहेरील गोठाण गुराढोरांनी गजबजून गेले पाहिजे. ही हजारो गुरेढोरे दिवसभर गावाभोवती असलेल्या पडीत जमिनीवर चरली पाहिजे. तिथे त्यांचे शेणमूत पडले पाहिजे. या शेणमुतामुळे तिथे प्रचंड गवत उगवले पाहिजे. याचा आता आत्यंतिक आग्रह धरण्याची वेळ आली आहे. असे झाले तर, हळूहळू रासायनिक खतांचाही वापर कमी होईल. अन्न कमीतकमी विषाक्त होईल. देशातील जनतेचे आरोग्य तुलनेने सुधारेल. लोकांची स्वप्रतिकारशक्ती वाढेल. नवनव्या आजारांच्या साथीने सर्वसामान्य जनता होरपळणे थांबेल. हे सर्व एकट्या बैलाने होणार आहे. त्याला वाचविण्याने होणार आहे. सरकार काही मार्ग काढणार नाही. शेतकर्‍यांनाच पुढे यावे लागणार. कारण प्रश्न त्यांचा जीवनमरणाचा आहे. पोळ्याच्या निमित्ताने शेतकर्‍यांच्या मनात तसेच त्यांना अक्कल शिकविणार्‍या कृषिपंडितांच्या मनात या विचारांचे बीज पडले तरी पुरे आहे...