'ई-वन' वाघिणीच्या मुद्यावरून मेळघाट पेटले

    दिनांक :31-Aug-2019
आणखी एका आदिवासीचा बळी
धारणी, 
2 जुलैच्या रात्री केकदाखेडा गावात संगीता डावर नामक आठ वर्षीय बालिकेवर हल्ला करणार्‍या ई-1 वाघिणीने 20 जनावरे फस्त केल्यावर अखेर दादरा गावातील शोभाराम चौहान (58) याला शुक्रवारी ठार केले, तर दिलीप चौहानला जखमी केले. त्यामुळे मेळघाटात वातावरण चांगलेच तापले आहे. शनिवारी घटनास्थळी संतप्त आदिवासींचा मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमाव जमला होता. परिणामी आता कुठे व्याघ्र प्रकल्पाचे डोळे उघडले. खासदार नवनीत राणा यांनी 24 तासात वाघिणीला पकडण्याचे निर्देश व्याघ्र प्रकल्पाला दिले आहेत. त्यामुळे नागपूर व अमरावतीचे दोन पथक वाघिणीच्या शोधात जंगलात रवाना झाले आहेत.
 

 
 
सुसर्दाचे परिक्षेत्र अधिकारी राजेश महल्ले यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळाचा पंचनामा वनपाल पुंडलिक व वनरक्षक मुंडे यांनी केला. आज दुपारी एक हजारावर लोक त्या ठिकाणी पोहचल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी दंगा नियंत्रण पथक तथा धारणी पोलिस पथकाने शांततेने स्थिती हाताळली.
 
दुपारी दोन वाजता मृतकाच्या नातेवाईकांसह मृतदेह धारणीसाठी रवाना झाला. या नंतर एसडीओ कार्यालयात अधिकारी व नागरिक यांची एक सभा घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी राहुल जाधव आणि सहाय्यक वनसंरक्षक शंकर कोलनकर यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत माजी आ. राजकुमार पटेल, केवलराम काळे, पोलिस निरीक्षक कुळकर्णी, रोहित पटेल, वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत भुजाडे व महल्ले उपस्थित होते. शुक्रवार, 30 ऑगस्ट रोजी एकाचा बळी गेल्यावर शनिवारी सकाळी माजी आमदार राजकुमार पटेल, केवलराम काळे, भाजपाध्यक्ष आप्पा पाटील, जि. प. सभापती वनिता पाल यांनी दादरा गावात पोहचून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. वाघाविषयी आदिवासी समाजात प्रचंड रोष दिसून आला. शोभाराम चौहानचा मृतदेह न उचलण्ययावर गावकरी ठाम होते. पण मान्यवरांच्या विनंतीवर मृतकाला धारणी उपजिल्हा रुग्णालयात दुपारी 2 वाजता हलविण्यात आले.
 
दादरा गावात उपविभागीय पोलिस अधिकारी संजय काळे, तहसीलदार आदिनाथ गाजरे तथा पोलिस निरीक्षक विलास कुळकर्णी यांच्या उपस्थितीत गावातील लोकांनी एका सभेचे आयोजन केले. या सभेत राजकुमार पटेल यांनी चौहान कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी, 20 लाख नुकसान भरपाई, शेतीचा मोबदला व मृत जनावराच्या बदल्यात जनावर देण्याची मागणी वन विभागाला केली.
यावेळी राहुल जाधव तथा कोलनकर यांच्या हस्ते मृतकाचा मुलगा अनिल चौहान यांना 5 लाखाचा धनादेश देण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यावर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
 
 
1995 मध्ये चिखली गावात वाघाचा वध
धारणी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या चिखली गावात एका वाघाने एका आदिवासीला ठार केले होते. यानंतर व्याघ्र प्रकल्पाकडून एक पुतळा घटना स्थळावर ठेवून वाघाला ठार करण्यात आले होते. दादरा येथील घटनेमुळे वन्यप्राणी आणि मानवा दरम्यान संघर्षाचा श्रीगणेशा झालेला आहे. दोन दिवसात वाघिणीस ठार करावे किंवा परत ब्रह्मपुरीच्या संग्रहात नेऊन सोडावे, अन्यथा त्रस्त नागरिकच वाघिणीची वाट लावतील, अशी शक्यता आहे. जखमी दिलीप सरदार चौहान (45) ला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.
वाघिणीला पकडण्यास पथक मेळघाटात
दरम्यान, मेळघाटातील नरभक्षक इ -वाघिणी संदर्भात व्याघ्र प्रकल्पाचे प्रधान संचालक श्रीनिवास रेड्डी आणि मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक चव्हाण यांच्या दालनात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खासदार नवनीत राणा यांनी वाघिणीला पकडून इतर कोणत्याही दुसर्‍या जंगलात सोडण्याची मागणी केली. या मागणीची दाखल घेऊन वनाधिकार्‍यांनी तात्काळ इ -वाघिणीला पकडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ वनाधिकारी यांच्यासोबत फोनवरून चर्चाही करण्यात आली. नरभक्षक ई-वन वाघिणीला पकडण्यासाठी खास परवानगी घेऊन नागपूर आणि अमरावतीची बचाव चमू मेळघाटात रवाना झाली. या वाघिणीला पकडून नागपूरच्या महाराज बागेमध्ये पाठविण्यात येणार आहे. वाघिणीच्या हल्ल्यात मरण पावलेल्या शोभाराम चव्हाण यांच्या कुटुंबास 10 ते 15 लक्ष रुपये मदत आणि जखमी झालेल्या दिलीपसिंग चव्हाण यांच्या कुटुंबास 2 ते 3 लक्ष रुपये शासकीय मदत देण्याचीही मागणी नवनीत राणा यांनी केली. तसेच जखमीची जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली.