वृषभराजाची मखरातून मिरवणूक

    दिनांक :31-Aug-2019
उमरा येथील द्वारका उत्सवाला ३०० वर्षांची प्राचिन परंपरा
अकोट,
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी उमरा येथे साजरा होणारा द्वारका उत्सव विदर्भात प्रसिध्द आहे. या उत्सवात वर्षभर शेतात घाम गाळणा-या वृषभराजाची बैलगाडीसमान रथावर मखरातून मिरवणूक काढून शेतकरी बांधव सारथ्यं करत स्वतः या रथाला ओढतात.हा उत्सव पाहण्यासाठी उम-यात मोठी गर्दी होते. आज हा उत्सव उत्साहात संपन्न झाला. या वर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने उत्सवात सहा शेतकऱ्यांनी त्यांच्या बैलांसह सहभाग नोंदवला.
 

 
अकोटजवळील उत्तर दिशेला सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या उमरा गावातील द्वारका उत्सवाला सुमारे ३०० वर्षांची प्राचिन परंपरा लाभली आहे.या गावातील शेतकरी त्यांच्या बैलांसमोर नवस बोलतात.त्यानंतर ज्या बैलांमुळे शेतक-यांची भरभराट होते,अश्या बैलांची बैलगाडी समान रथातून मखरात मिरवणूक काढण्यात येऊन त्यांचा मोठा सन्मान केला जातो.हा उत्सव वृषभराजाच्या ञृणातून मुक्त होण्यासाठी साजरा केला जातो.या उत्सवात शेतकरी कमीत-कमी पाँच वर्ष त्यांचा बैल मखरातून काढतात, असे सांगितले जाते.
गावांत ग्रामदैवत वाकाजी महाराजांच मंदीर आहे.शनिवारी वृषभराजाला सजवून मंदीरातील समाधीच्या दर्शनासाठी आणण्यात आलं.सर्वप्रथम वाकाजी महाराज संस्थानच्या मानाच्या बैलांची पुजा करण्यात आली.त्यानंतर बैलांच्या पाठीवर प्रतिमांनी सजविलेला मखर ठेवण्यात आला.
या दिवसासाठी बैलगाडीला दोन अतिरिक्त चाके बसविण्यात आली होती.बैलगाडीला हार-फुले,प्रतिमा,सुभाषिते व वस्त्रांनी सजविण्यात आले होते.या बैलगाडीसमान रथामध्ये प्रथम वाकाजी महाराज संस्थानचा मानाचा वृषभराज व नंतर त्यामागील रथांमध्ये इतर बैलांना चढविण्यात आले.या रथाचे सारथ्य स्वतः शेतक-यांनी केले.त्यांनी स्वतः बैलगाडींना ओढत मिरवणूकीत सहभाग घेतला.ढोल-ताश्यांच्या गजरात उत्साहात ही मिरवणूक निघाली.