भाजपाकडून इच्छूक उमेदवारांच्या पक्ष निरीक्षकांनी घेतल्या मुलाखती

    दिनांक :31-Aug-2019
वाशीम, रिसोड, कारंजा विधानसभा मतदार संघासाठी 48 इच्छुक उमेदवार
 
वाशीम,
वाशीम जिल्ह्यातील वाशीम - मंगरुळनाथ, रिसोड - मालेगाव, कारंजा - मानोरा या तीन विधानसभा मतदार संघासाठी भाजपा पक्षनिरीक्षक खासदार अमर साबळे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतली. यामध्ये तिनही मतदार संघातील 48 उमेदवारांनी मुलाखती देवून उमेदवारी मिळण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली.
आगामी ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्कावर भर दिला आहे. ग्रामीण भागात फिरुन इच्छुक उमेदवार मतदारांशी संपर्क साधून पक्षाने आपल्याला संधी दिल्यास आपण काय करणार याबबात मतदारांना पटवून सांगत आहेत. वाशीम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ असून, त्यात वाशीम, कारंजा भाजपाकडे तर रिसोड विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडे आहे. वाशीममधून भाजपाचे आमदार लखन मलिक, कारंजातून राजेंद्र पाटणी तर रिसोड मतदार संघातून काँग्रेसचे अमीत झनक हे विद्यमान आमदार आहेत. आगामी होणार्‍या निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी केली असून, जिल्ह्यातील तिनही मतदार संघात भाजपासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची देखील भाऊगर्दी झाली आहे.
 


पक्षनिरीक्षक खासदार अमर साबळे यांनी इच्छुकांच्या मुलाखती वाशीम येथे घेतल्या. त्यामध्ये वाशीम विधानसभा मतदार संघासाठी आमदार लखन मलिक, माजी आमदार पुरूषोत्तम राजगुरु, मंगरुळनाथचे श्याम खोडे, राहुल तुपसांडे, नागेश घोपे, संगीता वसंत इंगोले, करुणा कल्ले, प्रा. रेखा रमेश शेगोकार, वसंतराव धाडवे, प्रभाकर पद्मने, नितेश मलिक, विवेक माने, प्रभाकर पद्मने, मधुकर कांबळे, राजेश सिसोदीया, रविंद्र पेंढारकर, डॉ. दीपक ढोके, अशोक ढवळे आदीसह 27 इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे. रिसोड विधानसभा मतदार संघासाठी माजी आमदार विजयराव जाधव, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, श्याम बढे, महादेव मुसळे, रत्नप्रभा घुगे, नितिन काळे, गोपाल पाटील राऊत, तानाजी पवार, मारोतराव लादे, सुनील पाटील आदीसह 14 उमेदवारांचा समावेश आहे. तर कारंजा मतदार संघासाठी आमदार राजेंद्र पाटणी, नरेंद्रजी गोलेच्छा, अजय अनंतकुमार पाटील, सुनिल पाटील, सुनिल राठोड आदी उमेदवारांचा समावेश आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीने कोणाला उमेदवारी मिळणारे हे यणारा काळच सांगेल. मात्र, इच्छुक उमेदवार आपलेच नाव पक्षश्रेष्ठीकडे अग्रस्थानी असल्याचे सांगत आहेत.