खेळात ईर्षा, द्वेष नकोच

    दिनांक :04-Aug-2019
मिलिंद महाजन
 
खेळामध्ये ईर्षा, द्वेष भावना असायलाच नको. जिंकायचेच असेल तर अंगात जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत घेण्याची तयारी असावी. एका नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे कोणत्याही लढतीत जय-पराजय हा अटळ असतो. तेव्हा जय-जयकारासाठी अर्थात जिंकण्यासाठी आपल्या अंगी तेवढी शक्ती, सामर्थ्य आणि कौशल्य असायला हवे. तरच आपण कोणत्याही प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवू शकतो. मात्र हरल्यास पराभव पचवण्याचीसुद्धा ताकद खेळाडूंमध्ये असायला हवी. संयम ठेवून विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. स्वतःच्या पराभवाची कारणीमिमांसा करायला हवी आणि आपल्यातील कमतरता, उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्यासमोर येणार्‍या प्रतिस्पर्धीची जमेची बाजू आणि कमकुवत बाजूचा विचार करून जिंकण्यासाठी व्यूहरचना आखावी. प्रत्यक्ष मैदानावर प्रतिस्पर्धीविरुद्ध व्यूहरचना अंमलात आणण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. तरच यश मिळू शकेल. 

 
 
आपला प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षासमोर जात आहे, म्हणून आपल्या मनात त्याच्याविरुद्ध ईर्षा, द्वेष भावना निर्माण करणे चुकीचे आहे. तो पुढे जाऊ नये म्हणून त्याच्यापेक्षा अधिक सरस होण्याचा प्रयत्न करावा. त्याच्याविरुद्ध कुटील डाव, षडयंत्र रचणे चुकीचे आहे. मात्र असा दुर्दैवी प्रकार कुस्तीपटू बजरंग पुनियाबाबत घडला. विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीच्या वेळी बजरंगला दुखापतग्रस्त करण्याचा कुटील डाव रचण्यात आला होता, असे निदर्शनास आले. आशियाड, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी बजावणार्‍या या बजरंगने अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंना मात दिली. त्याने प्रो-रेसिंलग लीगसुद्धा गाजविली. आता तर तो 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकेल अशी आशा नव्हे खात्री आहे. ज्याच्याबद्दल समस्त भारतीयांना अभिमान वाटावा अशा खेळाडूला दुखापतग्रस्त करण्याचा डाव रचणे निंदनीय आहे. जर बजरंग जखमी झाला असता, तर त्याच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले असते. कदाचित तो तंदुरुस्त होईस्तोवर त्याच्या हातातून ऑलिम्पिकची संधी निसटली असती आणि भारताला एका ऑलिम्पिकपदकापासून मुकावे लागले असते.
 
कुस्ती क्षेत्रात असे प्रकार पहिल्यांदाच घडले असे नाही. 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान असाच काहीसा प्रकार कुस्तीपटू नरसिंह यादव घडला होता. त्यावेळीही या ऑलिम्पिकला जाण्यासाठी नरसिंह आणि दोनवेळचा ऑलिम्पिकपदक विजेता सुशील कुमार यांच्यात चुरस निर्माण झाली. शेवटी नरसिंहला संधी मिळाली, परंतु तो डोपिंग चाचणीत दोषी ठरला. नरसिंहला ऑलिम्पिकमध्ये न खेळताच रिओमधून परतावे लागले.
 
तेव्हाही नरसिंह यादवने मला फसविण्यासाठी माझ्या जेवणात कुणीतरी प्रतिबंधित उत्तेजक द्रव्य मिसळविल्याचा आरोप केला होता. 2018च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवड चाचणीदरम्यान सुशील कुमार आणि प्रवीण राणा या दोघांच्याही पाठीराख्यांमध्ये वर्चस्वासाठी हाणामारी झाली. या प्रकरणात पोलिसांनी सुशील कुमार व त्याच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. हे सर्व प्रकार ईर्षा आणि द्वेषभावनेतूनच घडले. तेव्हा खेळात ईर्षा आणि द्वेषभावना नकोच. त्याकरिता विजेत्याने पराभूत खेळाडूचा, तर पराभूत खेळाडूने विजेत्याचा आदर करायलाच हवा.
7276377318