कर्ज व्यवस्थापन

    दिनांक :04-Aug-2019
धनंजय तांबेकर
 
मराठीत एक म्हण आहे, ‘चादर पाहून पाय पसरा.’ ही म्हण सी. डी. रेशोकरिता चपखल बसते. ठेवींच्या 60 ते 65% कर्ज वितरण (क्रेडिट-डिपॉझिट रेशो) आदर्श मानलं आहे. त्याला कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. ठेवीदारांना मागताक्षणी ठेवी परत करता याव्यात, याकरिता प्रस्तुत सी.डी. रेशो प्रमाण आपण पाळतो. या एका निकषावर मर्यादा असती तर ठीक, पण खरी गंमत पुढे आहे. एकीकडे सी.डी. रेशोचा मापदंड असतानाच खेळत्या भांडवलाचे (वर्किंग कॅपिटल) 65% इतकी रक्कम आपण कर्जस्वरूपात वितरित करू शकतो. हे प्रकरण इथेच थांबत नाही. त्याही पुढे तिसरा प्रकार अंडर-ओव्हर ट्रेडिंगचा. यात वसूल भागभांडवल राखीव व इमारत (न वापरलेली) निधीच्या 75% व ठेवींच्या 70% येणार्‍या रकमेची बेरीज केल्यावर आपला लोनेबल फंड तयार होतो. प्रत्यक्ष वितरित केलेले कर्ज आणि आपला उपलब्ध लोनेबल फंड याचे प्रमाण (कमी) वा (जास्त) यावर अंडर-ओव्हर ट्रेडिंग आपण ठरवतो. 

 
 
वसूल भाग भांडवल राखीव व इतर निधीचे 10 पर्यंत ठेवी स्वीकारण्याची मर्यादा आपल्याला माहिती आहे.
अर्थात ठेवी स्वीकारण्याकरिता केवळ एक निकष आणि कर्ज वितरणाकरिता तीन-तीन निकष. कारण तसं सोपे आहे. ठेवी ही देयता व कर्ज जिंदगी (संपत्ती) असल्यामुळे व असलेली जिंदगी ही उत्तम असावी (परफॉर्मिंग अॅसेट) ती अनुत्पादक (नॉन परफॉर्मिंग) नसावी, याकरिता आवश्यक ती काळजी आपण घेतो.
 
आपल्याला माहिती आहे की, खेळत्या भांडवलाचे किमान 1% नफा हा आदर्श मानला आहे. नफा विनियोगात 25% राखीव निधी ही वैधानिक बाब मानली आहे. वसूल भागभांडवल राखीव व इतर निधी हा जितका जास्त तितकी ठेवी स्वीकारण्याची मर्यादा वाढणार. ठेवींच्या 65 ते 70% निधी हा कर्ज वितरणाला उपलब्ध होतो. कर्जाद्वारे प्राप्त होणारे व्याज, नफाकरिता साहाय्यभूत ठरते. या सर्व बाबी एकदुसर्‍याशी निगडित आहेत.
 
आपण वार्षिक सर्वसाधारण सभेत वर्षाचे अंदाजपत्रक मंजुरीकरिता ठेवतो. बरेचदा ही औपचारिकता म्हणून आपण मागील वर्षीच्या तुलनेत ढोबळ आराखडे बांधून तयार करतो. इथेच आपली खरी गफलत होते. आपले अंदाजपत्रक हे सायंटीफिक असावे व दरमहा आपण केलेला अंदाज व प्रत्यक्ष झालेला खर्च अथवा उत्पन्न मॉनिटर करावे. ठेवी-कर्ज साईज लहान असो वा मोठा, आपण वरील सर्व निकष दैनंदिन तपासावे, जेणेकरून इयर एन्डला आपली धावपळ-तारांबळ होणार नाही. उलट, आपण सर्व आर्थिक आदर्श निकषांवर खरे ठरू.
 
एनपीएशी झुंजताना...
आज आपल्या पतसंस्था चळवळीसमोरील यक्षप्रश्न एनपीए (नॉन परफॉर्मिंग अॅसेटस्‌) वसुलीचा आहे. मला वाटते की, याचे उत्तर कर्जवितरण प्रक्रियेत आपल्याला निश्चित सापडू शकेल. मुळात आपण ज्या अभिमानाने आपल्या संस्थेच्या ठेवींचा आकडा सांगतो, तेव्हा ठेव ही आपली लाएबिलिटी (देयता) व कर्ज ही अॅसेट (संपत्ती) आहे. आपली संपत्ती (कर्ज) ही परफॉर्मिंग असावी म्हणजेच नॉन परफॉर्मिंग होऊ नये, ही संकल्पना गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
 
यासाठी आपली आजची प्रचलित कर्जवितरण पद्धत पाहिली तर निश्चितच त्यात सुधारणांना वाव आहे. कर्जासाठी आपल्याकडे येणारा सभासद हा संचालक मंडळाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परिचित असतो. त्याचा व्यवसाय व तारण या बाबींवरच कर्जमंजुरीचा निर्णय होतो. कर्ज म्हणजे अर्ज वितरण ते कर्जमंजुरी या प्रवासात व्यवस्थापकाची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. आदर्श उपविधीनुसार कर्जमंजुरीचे अधिकार हे संचालक मंडळाचे व कर्जाकरिता आवश्यक दस्ताऐवज प्रक्रिया ही जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. तेव्हा व्यवस्थापनाने कर्तव्यदक्ष राहून कर्जमागणी अर्जवितरणाच्या वेळेस मुलाखत तंत्राचा वापर करणे अपेक्षित आहे. मुलाखतीची वेळही दैनंदिन व्यवहारानंतर साधारणतः दुपारी तीननंतर ठेवावी. सभासदाला समोर बसवून सकारात्मक पद्धतीने चर्चा करावी. चर्चेचा ओघ मुलाखत आहे, असा न वाटता आपली, आपल्या कुटुंबाची समोरची व्यक्ती आस्थेने विचारपूस करीत आहे, असा वाटावा.
 
चर्चेदरम्यान जाणून घ्यावयाच्या काही बाबी- सभासदाचा व्यवसाय, नोकरी असल्यास कर्मचारी पतसंस्थेकडून कर्ज घेतले आहे काय, उत्पन्न, पगार किती आहे, संबंधित पगार पावती, आयकर प्रमाणपत्र पाहणे, मासिक कौटुंबिक खर्च किती, दरमहा होणारी बचत कुठे व कशा स्वरूपात आहे, ही बचत रक्कम व कर्जाकरिता येणारा मासिक हप्ता जुळतो का, हे पाहावे.
घरातील, व्यवसायातील जबाबदार्‍या उदा. घरातील ज्येष्ठ मंडळींचे आजारपण, शस्त्रक्रिया, मुलांचे उच्च शिक्षण, लग्रप्रसंग, व्यवसायातील जोखीम या बाबी आस्थेने समजून घेणे आवश्यक आहे.
 
बर्‍याचदा कर्ज देतेवेळी सभासदाची सांपत्तिक स्थिती चांगली असते, म्हणून जामीनदार घेताना आपण औपचारिकता पाळतो. इथे भावनिक न होता व्यावहारिक राहत कर्जरकमेकरिता सभासदाइतकाच जामीनदार सक्षम असावा, त्याने श्क्यतो कर्ज घेतलेले नसावे.
एकाच परिवाराचे सदस्य जामीनदार घेताना त्यांची स्थावर मालमत्ता व उत्पन्नाचे स्रोत वेगवेळे असावेत. शक्यतो एकाच परिवारातील अर्जदार व जामीनदार असू नयेत.
कर्जाची गरज जाणून घेताना प्रस्तुत कर्जदाराकरिता आवश्यक रक्कम व प्रत्यक्ष मागणी यात तफावत नसावी. उदा. घर बांधकाम असल्यास मूल्यांकनकर्त्याद्वारे (व्हॅल्युअर) प्राप्त अंदाजित खर्च पाहणे. व्यवसाय आरंभ करताना ट्रान्सपोर्ट, टॅक्सेस, इन्स्टॉलेशन हे छुपे खर्च बर्‍याचवेळा नवीन व्यावसायिकाला लक्षात येत नाहीत. तेव्हा सनदी लेखापालातर्फे (सीए) प्रोजेक्ट रीपोर्ट घेण्याबाबत सुचवावे.
 
सभासदाचे व्यावहारिक ज्ञान, पूर्वेतिहास अप्रत्यक्षपणे जाणून घेणे आवश्यक आहे. कर्जाकरिता देऊ केलेले तारण संबंधित वकील मंडळींकडून प्राप्त टायटल व्हेरिफिकेशन रिपोर्ट काळजीपूर्वक वाचावा.
मूल्यांकन प्रमाणपत्रात विक्रीयोग्य किंमत असा उल्लेख असावा. तारण मालमत्ता संयुक्त नावाने असल्यास त्यांना सहआवेदन करावे लागेल, याची कल्पना अर्जदाराला द्यावी. कर्जप्रक्रियेतील बाबींसोबत कर्जाचा कालावधी, व्याजदर, मासिक हप्ता, दंडव्याज व इतर दुर्लक्षित गोष्टी भीड न बाळगता चर्चेदरम्यान सभासदाला लक्षात आणून देणे, हा आपल्या कर्तव्याचा भाग आहे. मुलाखत हे शास्त्र नसून कला आहे. अनुभवाने प्रगल्भ होणार्‍या या तंत्राचा वापर निश्चितच आपल्याला उपयोगी पडेल.
भ्रमणध्वनी : 9657095392