‘मिस्टर परफेक्शनिस्ट’च्या हस्ते ‘मिशन शक्ती’चे उद्घाटन

    दिनांक :04-Aug-2019
*मुनगंटीवारांच्या ‘ड्रिम प्रोजक्ट’चे थाटात प्रकटीकरण
*आमिर खान यांना बघायला प्रचंड गर्दी
चंद्रपूर,
‘मिशन सेवा’, ‘मिशन शौर्य’च्या यशानंतर आता सळसळत्या तरुणाईसाठी ‘मिशन शक्ती’चे प्रकटीकरण रविवार, 4 ऑगस्ट रोजी मोठ्या थाटात पार पडले. या मिशनचे उद्घाटन ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’, ख्यातनाम कलावंत, दिग्दर्शक आमिर खान यांच्या हस्ते आणि राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झाले. सोबत या मिशनला खर्‍या अर्थाने शक्ती देण्यासाठी सज्ज झालेल्या अत्यंत दर्जेदार अशा क्रीडा संकुलाचेही लोकार्पण खान यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांचे आगमन होताच, एक नजर बघण्यासाठी तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती, जी आवरेना आणि म्हणून संकुलाचा कार्यक्रम आटोपता घेत, वनविभागाच्या मैदानावरील ‘मिशन शक्ती’चा उद्घाटन समारंभ पार पडला. हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत आमिर खान यांनी यावेळी व्यक्त केले.
आमिर खान पुढे म्हणाले, एक चेंडू जग बदलू शकतो. खेळातून खूप काही शिकता येतेे. मी स्वत: शाळेत, दोन वर्ष महाविद्यालयात काय शिकलो, ते मला आठवत नाही. पण मी खेळलेल्या खेळांतून मला आजही जीवन जगण्याची प्रेरणा मिळतेे. खेळातून आपण संघभावना, संघर्ष, जिद्द, संघटन कौशल्य शिकतो. कसे जिंकावे आणि हरलोच, तर त्यातूनही काय शिकावे, याची जाण होते. मिशन शक्तीमुळे येथील तरुणांना खूप मोठी संधी मिळेल. मी त्या दिवशीची वाट बघेल, जेव्हा येथील खेळाडू पदक आणतील आणि पदक आले नाही, तरी देशाचे नाव निश्चितपणे उज्ज्वल करतील, कारण ते खेळाचा भाव शिकतील. आमिरने यावेळी त्यांच्याच ‘लगान’ चित्रपटातील ‘बढे चलो, बढे चलो, कोई हमसे जीत न पायें, चले चलो...’ हे गीत गाऊन उपस्थित तरुणांना प्रोत्साहित केले.
 
 
सुधीर मुनगंटीवार यांनी, मिशन शक्तीचे महत्त्व विशद करीत, आमिर खान यांना भविष्यातील उत्तम आणि देशाला दिशा देणार्‍या चित्रपटांसाठी शुभेच्छा दिल्या. तर मिशन शक्तीचे उद्घाटन हे आमच्यासाठी एक कार्यक्रम नाही, उत्सव नाही, तर 2024 च्या ऑलिम्पिकमधून पदक आणण्याचा हुंकार आहे. पदकांच्या यादीत चंद्रपूर-गडचिरोलीचा खेळाडू नक्की असेल, हा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी मंचावर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनिंसग चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना श्यामकुळे, संजय धोटे, पंकज भोयर, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी कुणाल खेमनार, ब्रिजभुषण पाझारे प्रभृती उपस्थित होते.
अशोक उईके यांनी, मिशन शक्तीसाठी जेवढा निधी लागेल, तेवढा आदिवासी विकास मंत्रालयाकडून दिला जाईल, असे आश्वासन दिले. तर प्रास्ताविक जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी केेले. यावेळी ‘सिंहावलोकन’या पुस्तिकेचे प्रकाशन पार पडले. मिशन शौर्यमध्ये यश संपादित केलेल्या मनिषा धुर्वे, प्रणेश आडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, कविदास काढमोडे, सूरज आडे, अंतुबाई कोटनाके तसेच खेळाडू निखिल सरकार, शिरीश कामडी, शेख मोहम्मद, जेईई-आयटीमध्ये देशात प्रथम आलेला कार्तिकेय गुप्ता, नाट्य क्षेत्रातील डॉ. जयश्री कापसे-गावंडे, बकूळ धवने, हेमंत गुहे, नुतन धवने, अंकिता नवघरे आदींचा सत्कार आमिर खान यांच्या हस्ते करण्यात आला. अंकिता नवघरे यांनी, स्क्रूपासून तयार आमिर खान यांचे चित्र त्यांना भेट दिले. तत्पूर्वी, सुधीर मुनगंटीवार यांनी, बांबूपासून तयार धनुष्यबाण, गदा आमिर खान यांना भेट देऊन त्यांचे स्वागत केले. प्रारंभी, रोपट्याला पाणी देऊन या कार्यक्रमाची अभिनव पद्धतीने सुरुवात करण्यात आली.