नागमित्र अन्‌ नागासारखे मित्र!

    दिनांक :04-Aug-2019
आता कुठल्या दिवशी कुठला सण यावा हे काही आपल्या हातात नसते... आता ‘आपल्या हातात नाही ना बाबा ते’ हे कळायला लागल्यापासून इतक्यांदा अन्‌ इतक्या संदर्भात ऐकलं आहे की आपल्या हातात काहीच नसते, हे एव्हाना लक्षात आलं आहे. आता बघाना गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिन (हा 15 ऑगस्टलाच येतो) आणि नागपंचमी एकाच दिवशी आले होते. साधारण नागपंचमी नागमोडी वळणाने का होईना पण याच दिवसांत येते. त्यामुळे आष्टी शहीदचा लढा झाला होता त्या दिवशी 9 ऑगस्ट (क्रांती दिन) आणि नागपंचमी एकाच दिवशी आले होते...
 
आता यंदा फ्रेंडशिप डे आणि नाग पंचमी लागोपाठच्या दिवशी आली आहे. सध्याचे दिवस मैत्री वाढवायचे आहेत. विधानसभेच्या निवडणुका अगदी दारात आल्या आहेत. त्यामुळे अनेक नेेते आपल्या घरात आले आहेत. नेते मंडळी ‘ज्यमते तिथे थांबते’ या न्यायाने मैत्री करत आहेत. त्यांना हव्या त्या पक्षात जात आहेत. जे महत्त्वाचे नेते पक्ष सोडून जात आहेत ते ज्यांची साथ सोडली त्यांना सापासारखे वाटू लागले आहेत. मग साहेबांना त्यांच्याच पक्षात उरलेले काही नेते म्हणत आहेत, बघा तुम्ही आतावर नागाला दूध पाजलं... तो तमका तुमच्या अस्तनीतला साप होता, हे केव्हाचे सांगत होतो; पण आजवर तुम्ही लक्ष दिलं नाही. आता बघा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चावून पलटला की नाही?
 
 
 
आता राजकारणांत कधीच कुणी कुणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो. आता हेच बघा, कालपर्यंत अजित दादांची नक्कल करीत खिल्ली उडविणारे राज ठाकरे आता त्यांच्यात सोबत बसले होते काल पत्र परिषदेत. तिकडे युती कायम राहणार, असे सांगितले जात आहे. मैत्री टिकवायचीच असे नाही; पण शत्रू वाढवायचेही नाही. आता मैत्री दिन आणि नाग पंचमी असे लागोपाठ येणे म्हणजे सूचक असे काही आहे, असे वाटू लागले आहे. एकतर नाग हा मित्र असावा; पण मित्र हा नागासारखा नक्कीच नसावा...
 
आता व्हॉटस्‌ॲप अन्‌ समाज माध्यमांवर गोंधळ उडणार आहे. नेमक्या कशाच्या शुभेच्छा द्याव्यात, हा घोळच आहे. एकतर बंधन कशाचे बांधायचे? मैत्री दिनाचा धागा बांधायचा की सापाचे वेटोळे गुंडाळायचे? लोक कशाच्याही शुभेच्छा देतात. काहीतरी कारणच हवे असते. आता सगळेच सण काही शुभेच्छा देण्यासारखेच नसतात. अक्षयतृतियेला कशाच्या शुभेच्छा द्यायच्या? आता त्या दिवशी पितरांना जेवू घालायचे असते. मृतांची आठवण करायची असते. त्यात कृतज्ञता असली तरीही तो क्षण काही आनंदाचा नसतो. तरीही लोक शुभेच्छा देतातच. नाग पंचमीच्या काय शुभेच्छा देणार? अन्‌ कुणाला? नागाकडे स्मार्ट फोन नसतो अन्‌ ज्यांना देता त्यांना काय देणार शुभेच्छा? आज नाग दर्शन होवो? तो दिसला तरीही पाचावर धारण बसणे या वाक्याचा प्रत्यक्षांत प्रत्यय येतो. तरीही लोक नाग पंचमीच्या शुभेच्छा देतात...
 
 
आताच्या पिढीत प्रत्यक्ष नाग पाहिला; म्हणजे खुला नाग पाहिला अशी मुले किमान शहरात तरी नाहीत. माणूस इतका क्रूर आहे की त्याने वाघ अन्‌ नागही खतम करून टाकले. शहरांची संख्या वाढते आहे अन्‌ मग आपण प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासांवर, वसतिस्थानांवर अतिक्रमण केले आहे. त्यात नाग, सापांचा क्रमांक पहिला लागत असतो. निसर्ग कुठलाच अनावश्यक जीव जन्माला घालत नाही. अनावश्यक ठरला तो जीव तर तो संपतो. आता डायनोसॉर संपले नाहीत का? असे अनेक प्राणी आहेत जे अस्तंगत झाले. सर्पयोनी मात्र कायम आहे. याचा अर्थ थेट आहे की सर्पांचा अन्‌ एकुणच निसर्गाचा, पर्यावरणाचा अन्यन्य साधारण असा संबंध आहे. ती सृष्टीची गरज आहे. आपल्या पुराणानुसार असे म्हणतात की, आपली पृथ्वी ही शेषनागाने त्याच्या फण्यावर तोलून धरली आहे... त्या अर्थाने नाग हा मित्र आहे आपला. 
 
नाग हा गूढ लावण्य असलेला प्राणी आहे. तो कलांचाही प्रेरक आहे. वेलबुट्टी, वळणांच्या रेषा यांचा उद्गमच मुळी नागामुळे झाला आहे. तुम्ही मोकळा असलेला नाग पाहिला आहे का कधी? तो संमोहित करणाराच असतो. तुम्ही त्याच्यावरून नजर हटवूच शकत नाही. अर्थात आपल्याला त्याची भीतीच वाटते. सगळेच साप विषारी नसतात; पण ते सापांना अन्‌ आपल्यालाही माहिती नसते. आमच्या एका मित्राच्या रूम मध्ये साप यायचे. बॅचलर होता. एकटाच असायचा. त्यावेळी पाचलेगावकर महाराज होते. त्यांच्या आश्रमात तर सर्प असे लोळत असायचे. खुले फिरायचे. ते शंकराचे भक्त होते महाराज. त्यामुळे त्यांचे नाव घेतले तरीही सर्प निघून जातात, त्रास देत नाहीत, असे मानले जायचे. आमच्या या मित्राने मग त्याच्या त्या खोलीत जिथे कुठे छिद्र होती, म्हणजे कोपर्‍यात मोरी होती, त्याचे छिद्र किंवा खिडकी सारखा एक झरोका होता त्याचे छिद्र...अशा सगळ्याच छिद्रांच्या ठिकाणी पाचलेगावकर महाराज प्रसन्न असे लिहून ठेवले होते. तो त्यांच्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या आश्रमातही जाऊन आला होता. महाराजांनी त्याला नागमंत्रही दिला होता, असे तो सांगायचा. मात्र हे जिथे भोकं आहेत अन्‌ साप येऊ शकतो अशा ठिकाणी ‘पाचलेगावकर महाराज प्रसन्न’, असे लिहून ठेवल्यावर मी त्याला विचारले, हे ठीक आहे तू लिहिलेस; पण तुझ्या खोलीत येणारे नाग काय अक्षर मित्र असतात का? त्यांना वाचता येत नसेल तर तू कसा वाचशील?
 
पाचलेगावकर महाराजांनी मात्र नाग-सापांबद्दल बरीच जागृती आणली होती. त्यांच्या आश्रमात अनेक मुले शिकायला होती. म्हणजे शिकणार्‍या गरीब मुलांना त्यांनी आश्रमांत आश्रय दिला होता. आमचा हा मित्र सांगायचा की, आश्रमात कुणा मुलाला ताप आला तर महाराज त्याच्या अंगावर पाण्याच्या पट्‌ट्या ठेवण्यापेक्षा सापच टाकायचे. त्याचा ताप उतरूनच जायचा... आता अंगावर थंड असतात म्हणून सापच टाकले तर माणूस तसाच थंडा पडेल की नाही? अर्थात हा तर्क आमच्या मित्राचा. मधल्या काळात मित्राने साप या विषयावर जवळपास पीएच्‌डीच केली होती. कारण त्याच्या एका मित्राने सापच घरात पाळला होता. आता इतके मित्र असताना आणखी साप पाळण्याची गरज ती काय? एक दिवस हा मित्र अन्‌ त्याचे मानव मित्रांचे टोळके गप्पा मारत बसले होते. त्यात सापाचा विषय निघाला अन्‌ मग त्याच्या या मित्राने सापच विकत आणला एका गारुड्याकडून. गारुडी लोक नागाच्या विषाची ग्रंथी काढून टाकतात. असा एक साप त्याच्या मित्राने विकत आणला गारुड्याकडून. तो त्या सापाला घेऊन वगैरे झोपायचा म्हणे...
 
साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे अन्‌ माणूस सापाचेही मांस खातो. इतर प्राण्यांचे मांस खाल्यावर जडत्व येते, सापाचे मांस खाल्यावर उत्साह येतो, कारण तो थंड रक्ताचा प्राणी आहे...
 
नाग पोसणे या कार्यक्रमात आमच्या या मित्राने सापाच्या संदर्भातली अनेक पुस्तकेही वाचली. तुम्हाला परीक्षीत राजाची गोष्ट माहितीच असेल... ‘इंद्राय तक्षकाय्‌ स्वाहाऽऽ’, जन्मेजयाने सर्पयज्ञ केला त्यावेळचा हा अखेरचा मंत्र. म्हणजेे तक्षक आता आपली या सर्पयज्ञात आहुती पडेल या भीतीने मित्र इंद्राच्या िंसहासनाखाली जाऊन लपला होता. त्यावेळी यज्ञकर्त्या ऋषींनी वरचा आवाहनात्मक मंत्र म्हटला आणि मग इंद्रासह तक्षक स्वाहा व्हायला निघाला होता... मग विष्णू नामक तिसरा मित्र आला नि सगळेच वाचले. म्हणजे सापाची जमात आणि इंद्रही! म्हणून साप माणसाचा मित्र आहे अन्‌ माणूस हा त्याचा शत्रू आहे!