वाहन विम्याचं महत्त्व

    दिनांक :05-Aug-2019
 
पावसाळ्यात पावसाचे अंदाज वर्तवत बसण्यापेक्षा आपल्या वाहनाला विमा संरक्षण देऊन तणावमुक्त रहावं. या दिवसांमध्ये अतिवृष्टी, वादळ, पूर अशा नैसर्गिक आपत्ती येत असतात. या आपत्तींमुळे तुमच्या वाहनाचं नुकसान होऊ शकतं. अशा आपत्तींमुळे होणारं नुकसान काही हजार कोटी रुपयांमध्ये जातं. मध्यंतरी फणी नावाच्या चक्रीवादळाने हाहाकार माजवला होता. त्यात जवळपास 12 हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. वाहनविमा असणार्‍यांना नुकसानभरपाई मिळाली पण इतरांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरूवातीलाच वाहनविम्याचं संरक्षण घ्यायला हवं. 
 
 
वाहनविमा पॉलिसीचे दोन भाग असतात. एक म्हणजे ओन डॅमेज(ओडी) आणि दुसरा भाग म्हणजे थर्ड पार्टी लाएबिलिटी (टीपी) यापैकी टीपी विमा पॉलिसी घेणं प्रत्येक वाहनधारकासाठी बंधनकारक असतं तर ओडी घ्यायचं की नाही हे सर्वस्वी वाहनधारकावर अवलंबून असतं. विमा कंपनीच्या नियमांनुसार नैसर्गिक आपत्तींमुळे होणारं वाहनाचं नुकसान ओडी विभागात गणलं जातं. म्हणजे ही पॉलिसी नसेल तर तुम्हाला नुकसानभरपाई मिळत नाही.
 
पावसाच्या पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून गाडी चालवल्यामुळे बर्‍याच विमा कंपन्या इंजिन िंकवा गाडीच्या इतर भागाला झालेल्या नुकसानासाठी करण्यात आलेला दावा नाकारतात. पण वादळाच्या बाबतीत असा फरक करता येत नाही. त्यातच जोरदार वार्‍यामुळे गाडीवर झाड पडून नुकसान झालं तर त्याची भरपाई मिळू शकते. मात्र म्युझिक प्लेअर, पार्किंग कॅमेरा अशा वस्तूंचं नुकसान झालं तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त लाभ असणारी पॉलिसी घ्यावी लागेल. त्यामुळे मान्सूनमध्ये वाहन विमा नक्की घ्या.