म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना...

    दिनांक :05-Aug-2019
आजच्या महिला अधिक स्वतंत्र, सक्षम आणि स्वावलंबी बनल्या आहेत. गुंतवणुकीबाबतचे निर्णय त्या अगदी सजगतेने घेतात. सध्याच्या काळात म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय बनला आहे. म्युच्युअल फंडाबाबतच्या जाहिराती आपण टिव्हीवर बघतो. एखाद्या फंडात आपणही गुंतवणूक करावी, असा विचार मनात येऊन जातो. म्युच्युअल फंडात जोखिम असली तरी दीर्घकालीन गुंतवणुकीतून तुम्हाला खूप चांगला परतावा मिळू शकतो. लघुकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठीही तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. मात्र महिलांनी या फंडांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे. त्याविषयी...
 
 
कमी एनएव्ही असणार्‍या फंडांकडे अनेकजण आकर्षित होतात. उच्च एनएव्हीवाल्या फंडांच्या तुलनेत हे फंड बरेच स्वस्त असतात. एनएव्ही म्हणजे फंडाची प्रति युनिट िंकमत. एनएव्ही कमी-जास्त असण्याचा आणि फंडांच्या कामगिरीचा दुरान्वयेही संबंध नसतो. एनएव्हीमुळे फक्त गुंतवणूकदाराकडच्या फंड्‌सची संख्या बदलते. त्यामुळे एनएव्हीवरून फंडाची निवड करू नये. त्याऐवजी फंडांचा गेल्या काही वर्षांमधला परतावा आणि पोर्टफोलिओ यांचा विचार करावा.
 
 
डेब्ट किंवा इक्विटी फंडात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेताना गुंतवणूकदाराने धोका पत्करण्याची तयारी, परताव्याची अपेक्षा आणि गुंतवणुकीचा कालावधी या तीन बाबी लक्षात घ्यायला हव्यात. फारसा धोका पत्कराचा नसेल तसंच एक ते तीन वर्षं इतक्या कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असल्यास शॉर्ट टर्म डेब्ट फंड हा चांगला पर्याय ठरेल. धोका पत्करायची तयारी असेल तर पाच वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करताना इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला हरकत नाही. म्युच्युअल फंडातल्या सिप योजनेत गुंतवणूक करायची का एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवायची याचा विचारपूर्वक निर्णय घ्यावा. सर्वसाधारणपणे आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचा सातत्याने आढावा घेत रहावं. यामुळे आर्थिक उद्दिष्ट साध्य करणं सोपं जातं. त्यामुळे प्रत्येक तिमाहीनंतर म्युच्युअल फंडांच्या कामगिरीचं मूल्यांकन करायला विसरू नये.