बायकोच्या वाढदिवशी रितेशची पोस्ट

    दिनांक :05-Aug-2019
सेलिब्रिटी जोडप्यांच्या यादीत चाहत्यांना नेहमीच कपल गोल्स देण्यासाठी काही जोड्यांच्या नावाला पसंती देण्यात येते. अशा या यादीत अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे, रितेश देखमुख आणि जेनेलिया डिसूझा. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही कलाविश्वांमध्ये या जोडीवर नेहमीच सर्वांच्या नजरा खिळतात. मग तो या कलाविश्वातील त्यांचा प्रवास असो किंवा मग एखाद्या खास दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणं असो. रितेश आणि जेनेलिया नेहमीच सर्वांचं लक्ष वेधतात. ‘बायको’ जेनेलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेशने ट्विटरवर ‘लय भारी’ पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट वाचताना तुमच्या चेहऱ्यावरही हसू नक्की उमटेल.
 
 
 
“जेव्हा तुमची खास मैत्रीण जोडीदार बनते तेव्हा आयुष्य खूप सुंदर होऊन जातं. माझ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू सर्वांत शक्तिशाली आई आहेस आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवणारा तू धागा आहेस. या जन्मी तू केलेल्या सर्व पुण्यांसाठी देव तुला पुढच्या जन्मीही माझ्यासारखा पती देवो,” अशी पोस्ट रितेशने ट्विटरवर लिहिली. रितेशची विनोदबुद्धी पुन्हा एकदा या ट्विटच्या माध्यमातून चाहत्यांना दिसली.
 
 
रितेशच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनीच जेनेलियावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात सुरुवात केली. रितेश आणि जेनेलिया या दोघांनीही एकाच वेळी अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. ज्यानंतर बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विवाहबंधनात अडकल्यानंतर जेनेलियाने कलाविश्वातून काढता पाय घेतल, कुटुंबाकडे लक्ष देण्यास प्राधान्य दिलं.