'त्या' व्यक्तीसोबत काम करण्यास दीपिकाचा नकार

    दिनांक :06-Aug-2019
लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या लव रंजन या दिग्दर्शकासोबत दीपिका चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चेला मध्यंतरी उधाण आले होते. मात्र, एका मुलखतीत लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत कधीही काम करणार नसल्याचं दीपिकाने स्पष्ट केले.

ऑडिशन दरम्यान कपडे काढायला लावल्याचा आरोप एका अज्ञात अभिनेत्रीने लव रंजन यांच्यावर केला होता. काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांना दिग्दर्शक लव रंजन यांच्या ऑफिसबाहेर एकत्र पाहण्यात आलं. त्यामुळे लव रंजन यांच्या नव्या चित्रपटात दीपिका-रणबीर एकत्र स्क्रीन शेअर करणार, अशी चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरु झाल्यानंतर दीपिकाचे चाहते नाराज झाले आणि त्यांनी सोशल मीडियावर #NotMyDeepika हा हॅशटॅग ट्रेण्ड सुरू केला. लव रंजन यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला असल्याने दीपिकाने त्यांच्यासोबत काम करू नये, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती. मात्र, या ट्रेंडवर दीपिकाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
नुकत्याच एका मुलखतीत दीपिकाला या संदर्भात प्रश्न विचारला गेला. लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या व्यक्ती सोबत तू काम करशील का?, असा प्रश्न दीपिकाला विचारण्यात आला होता. तेव्हा अशा व्यक्तीसोबत काम करायला दीपिकाने स्पष्ट नकार दिला.