कोल्हापुरात गरज पडल्यास एअर लिफ्ट करणार : मुख्यमंत्री

    दिनांक :06-Aug-2019
यवतमाळ, 
 महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री सध्या यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला जात आहे. विशेषतः कोल्हापूरातील स्थितीवर यंत्रणेचे लक्ष आहे. पंचगंगेने धोकादायक पातळी ओलांडली आहे. नदीची ४३ फूट धोका पातळी असून ही पातळी सध्या ५२ फुटांवर गेली आहे. त्यामुळे शिरोळमधील सहा गावे, कोल्हापूर शहर, हातकणंगले हा परिसर प्रभावित झाला आहे. या ठिकाणी बचावासाठी एनडीआरएफच्या दोन टीम तैनात आहेत. लष्कराचे ८० जवान चार बोटिंसह लोकांना सुरक्षित स्थळी नेत आहेत. तसेच ज्या ठिकाणी नागरिकांना एअर लिफ्ट करण्याची आवश्यकता भासेल अशा ठिकाणी एअरलिफ्ट केलं जाईल. जवळजवळ १५०० कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. नौदल आणि कोस्टगार्डचीही बचाव कार्यासाठी मदत घेतली जात आहे.

 
सांगलीमध्ये देखील पुरस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफची एक टीम तेथे पोहोचली आहे. राज्याचे मुख्य सचिव या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत त्यांच्याशी मी सकाळी चर्चा केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील या सर्व भागावर लक्ष ठेऊन आहेत. आज मी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशीही बोलणार आहे. धरणाचा विसर्ग जर त्यांनी वाढवला तर सांगलीतील पूरपरिस्थिती नियंत्रणात येऊ शकते. त्याचबरोबर कोयनेचा विसर्गही जरा कमी करण्याची विनंती संबंधीतांना करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या इतर भागात विशेषतः नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवडच्या काही भागात काल पूरस्थिती निर्माण झाली होती. आज इथली परिस्थिती आटोक्यात येत असून याचाही आढावा घेतला जात असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सर्वच भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीवर सरकार लक्ष ठेऊन आहे. सर्व पूर स्थितीचा आढावा घेतला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.