आंबाच नव्हे तर कैरीही गोड

    दिनांक :07-Aug-2019
आंबा पिकल्यानंतर गोड लागतो, हे खरंच. मात्र कोकण राजा या नवीन आंब्याच्या जातीची कैरीही चवीला गोड लागते. डॉ. विजय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली खास सॅलडसाठी कोकण राजा ही आंब्याची जात दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने प्रसारित केली. या अगोदर आंब्याच्या जाती विकसित करताना फळ पिकल्यावर त्याची चव कशी असेल यावर लक्ष केंद्रित केलं जात होतं. 

 
 
त्यामुळे खाण्यायोग्य कच्चा आंबा अशी जात विकसित होऊ शकली नव्हती. आता विकिसित झालेल्या कोकण राजा या जातीच्या कच्च्‌या फळांमध्ये इतर जातींच्या तुलनेनं आम्लतेचं प्रमाण अतिशय कमी आहे. हे प्रमाण सालीसह 1.35 टक्के तर सालविरहित 1.17 टक्के आहे. कच्च्या फळातील एकूण विद्राव्य घटकांचं प्रमाण सालीसह 6.4 अंश ब्रिक्स तर सालविरहित 8.5 अंश ब्रिक्स इतकं आहे. त्यामुळे तो चवीला गोडच लागणार आहे. मातृवाण बंगलोरा आणि पितृवाण हिमायुद्दीन या जातीच्या संकरापासून ही आंब्याची नवीन जात विकसित करण्यात आली आहे.
 
या एका आंब्याचं सरासरी वजन सुमारे 616 ग्रॅम असतं. तयार फळाचा आकार मोठा असतो. या फळाला लालसर छटा असून ती अंड्याच्या आकाराची झाल्यापासून खाण्यास योग्य होतात. विशेष म्हणजे ही जात साकाविरहित असून नियमित फळधारणा होणारी आहे. चव गोड असल्याने या जातीचे कच्चे फळ सॅलड म्हणून आणि पिकल्यावरही खाण्यासाठी उत्तम आहे. मग आता कैरी आंबट लागली म्हणून तोंड वाकडं करण्याचं कारण उरणार नाही. अर्थात, आंबट कैरी खाण्यातील मजा काही औरच असते हेही खरं.